Home » Blog » Bawankule : शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी दाखल करा

Bawankule : शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी दाखल करा

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

by प्रतिनिधी
0 comments
Bawankule

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यातील सर्वच शिव पाणंद आणि शेतरस्त्यांची हद्द निश्चित करून त्यांची कामे दर्जेदाररित्या पूर्ण करा अशी सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिली. तसेच शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर महसूल प्रशासनामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट आदेश दिले. (Bawankule)

शिव पाणंद आणि शेत रस्ते समृद्ध करण्याबाबत पब्लिक डोमेनच्या माध्यमातून नागरिकांच्या सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. (Bawankule)

यावेळी बावनकुळे म्हणाले, नागपूर जिल्ह्यात प्रती किलोमीटर केवळ आठ ते दहा लाख रुपये खर्चामध्ये उत्कृष्ट पाणंद रस्ते बनविण्यात आले आहेत. या कार्यपद्धतीचा सर्व जिल्ह्यांनी अभ्यास करून इतर जिल्ह्यांमध्येही याप्रमाणे कार्यवाही करावी. तसेच ग्रामस्तरीय शेतरस्ता समिती स्थापन करून त्याचा अहवाल शासनास सादर करावा. रस्त्यांचे काम दर्जेदार होईल, याची दक्षता घ्यावी. पाणंद रस्त्यांबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे एका महिन्यात निकाली काढावीत. (Bawankule)

पाणंद रस्ते, शेतरस्ते, सार्वजनिक वहीवाटीच्या रस्त्यांच्या मोजणी आणि पोलीस संरक्षणासाठी असलेली फी बंद करण्याचा विचार करण्यात येईल असे सांगून मंत्री बावनकुळे म्हणाले, अशा रस्त्यांच्या नंबरिंगचे सर्वेक्षण करुन नंबरिंग हटवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. रस्त्यांच्या प्रकरणी तहसीलदारांच्या निर्णयावर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील केल्यानंतर त्यांनीच अंतिम निकाल देण्याबाबत शासन सकारात्मक आहे. शेतरस्त्यांचा उल्लेख झाल्याशिवाय वाटप पत्र मंजूर करण्यात येऊ नये यासाठीही शासन सकारात्मक असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

हेही वाचा :

भारतीयांची अमेरिकेतून हद्दपारी आणि नेतृत्वहीन जग
महाराष्ट्राच्या लोकसंख्येपेक्षा मतदार संख्या अधिक
आरबीआय’कडून रेपो दरात कपात

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00