Home » Blog » बाळासाहेब ठाकरे यांचा प्रस्ताव उद्धवनी अडवला

बाळासाहेब ठाकरे यांचा प्रस्ताव उद्धवनी अडवला

भाजपचे नेते आशिष शेलार यांचा गौप्यस्फोट

by प्रतिनिधी
0 comments
Ashish Shelar file photo

विशेष मुलाखत : विजय चोरमारे

मुंबई महापालिकेत मी सुधार समितीचा अध्यक्ष असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक काम सांगितले होते. ते काम आम्ही मार्गी लावत असताना उद्धव ठाकरे यांनी मात्र ते काम अडवले होते, असा गौप्यस्फोट भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाराष्ट्र दिनमानला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये केला. ज्याच्याशी संबंधित हे काम होते त्यांचे नाव मी आता सांगणार नाही, पण शिवसेनेकडून कुणी याला आव्हान दिले तर मी संबंधित व्यक्तीचे नावही सांगू शकतो, असे शेलार म्हणाले. (Ashish Shelar)

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये आशिष शेलार यांनी भाजपचे शिवसेनेसोबतचे संबंध, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेला संवाद, उद्धव ठाकरे यांचे राजकारण, भारतीय जनता पक्षाची भूमिका अशा विविध प्रश्नांना उत्तरे दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेल्या व्यक्तिगत संबंधांबाबत आशिष शेलार म्हणाले, बाळासाहेब ठाकरे म्हणजे दिलदारपणा, प्रामाणिकपणा, नेतृत्व, वक्तृत्वकला. ते हजरजबाबी होते. महापालिकेच्या कामात माझा नेहमी संपर्क यायचा. एखादी बातमी त्यांनी वाचली, जी मुंबईच्या हिताची नसेल, तर थेट फोन करून सांगायचे, शेलारमामा, काहीही असेल तरी मुंबईकरांच्या हिताचं काम झालं पाहिजे.

एक आठवण सांगताना ते म्हणाले, बाळासाहेब शिवसेनाप्रमुख होते. उद्धवजी कार्याध्यक्ष.  बाळासाहेबांनी एका कामासाठी सुधार समितीचा अध्यक्ष म्हणून मला फोन केला. त्यांचे एक मित्र होते. त्यांचे नियम, कायद्यात बसणारे काम होते. मी त्यांचे नाव सांगणार नाही, पण शिवसेनेतल्या कुणी आव्हान दिलं, तर मी त्या व्यक्तीचं नावही सांगेन. उद्धवजी तेव्हा भारतात नव्हते. मी सुधार समितीचा अध्यक्ष होतो. युतीत असताना आणि भाजप छोटा पक्ष असतानाही तुम्ही मला कसे काम सांगता, असे विचारण्याची माझी हिंमत नव्हती. मी महापालिकेतील शिवसेना नेत्याला ते काम सांगितले. त्यांनी खात्री करून घेतली. आवश्यक कार्यकाल देऊन आम्ही विशेष बैठक लावली. त्याआधी तो उद्धवजींनी अडवला. त्यांचे दूत संबंधित व्यक्तीच्या घरी गेले आणि म्हणाले, आम्ही नसताना काम करून घेताय काय? अब करके दिखाव, शिवसेनेशी असलेल्या संबंधांचाबत ते महणाले, शिवसेनेसोबतच्या संबंधांचे मी दोन टप्पे करेन. (Ashish Shelar)

एक प्रत्यक्ष बाळासाहेब ठाकरे यांचे पूर्णपणे नियंत्रण होते तेव्हाचा. आणि बाळासाहेब असतानाही उद्धवजी बचत होते तेव्हाचा. बाळासाहेब बघत होते तेव्हा नंदू साटम यांनी विधान परिषदेचा अर्ज भरला, ते अर्ज भरण्यासाठी कलेक्टर ऑफिसपर्यंत गेले. आम्ही बाळासाहेबांना सांगितले की, तुमचा एक उमेदवार निवडून आल्यावर जास्तीची मते आहेत, तुमची जादाची मते आमच्यापेक्षा जास्त मते असली तरी युतीधर्मात तुम्ही दुसरा उमेदवार आमचा पुरस्कृत करा. त्यांनी ते ऐकले होते. दिलदारपणा, मैत्री, आनंदी, सहजता हा बाळासाहेबांच्या स्वभावाचा भाग होता आणि याच्या नेमका उलटा स्वभाव उद्धय ठाकरेंचा आहे. कधीतरी सत्य बाहेर येईल की, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, शरद पवार ही मंडळी माझ्या मताशी सहमत होतील. उद्धवजींचा स्वभाव महणजे, माझे कुटुंब माझी जबाबदारी हे नंतर आले, पण त्यांनी स्वतःच्या हातात सूत्रे घेतली तेव्हापासून मी आणि माझे जवळचे हे सोडून कधी ते बघत नाहीत. महापालिकेत आम्ही एकत्र सत्तेत असतानाही त्यांचे आमचे खटके उडालेत. क्रॉफर्ड मार्केटचा पुनर्विकास, मुंबई महापालिकेचे संगणकीकरण, मुंबईतल्या भूखंडांचे श्रीखंड, पाणी शुद्धीकरणाच्या तुरटीची खरेदी अशा अनेक विषयांवर मतभेद झाले. उद्धवजींची मित्रपक्षांचे ऐकण्याबाबतची भूमिका हष्ट्टी आहे. ते बदलले नाहीत. आत्मचिंतन करायला हवे, त्या ठिकाणी ते आत्मप्रौढी मिरवतात.

शेलार पुढे म्हणाले, लोकसभेला आम्ही हरलो, तर आत्मचिंतन केले. त्यांचे अठराचे नऊ झाले. चिंतन न करता आत्मप्रौढी मिरवतात की, शरद पवारांचा पक्ष आमच्यामुळे वाढला, काँग्रेस आमच्यामुळे वाढली. अरे पण तुम्ही का वाहला नाही? उद्धव ठाकरे महणजे एकांगीपणा, अहंकारी स्वभाव, त्यांच्या या स्वभावामुळेच त्यांनी सूत्रे घेतल्यानंतर राणेसाहेब गेले, राज ठाकरे गेले, गणेश नाईक गेले, एकनाथ शिंदे गेले, पन्नास आमदार गेले, खासदार गेले. सरकार गेले. मी म्हणजेच महाराष्ट्र असे मानणा-यांना पवारसाहेब आणि काँग्रेस यांच्या आधाराशिवाय चालता येत नाही. आम्ही मात्र त्यांना त्यावेळीही सांगत होतो, मित्रांशी दगा करू नका. आजही सांगतोय किमान तिकडे सुखाने राहा.

भाजपने शिवसेनेला संपवण्याचा डाव आखल्याच्या आरोपावर शेलार म्हणाले, जगात असा कुठला पक्ष आहे जो मर्यादित यश मागतो? शंभरपैकी साठ गुण द्या म्हणतो. देशात कुठेही शिवसेना नसताना संजय राऊत म्हणू शकतात की उद्धव ठाकरे पुढचे पंतप्रधान आहेत. आणि आम्ही सर्वात मोठा पक्ष असूनही शतप्रतिशत महणू शकत नाही. असे कसे चालेल?

विधानसभा निवडणुकीनंतरच्या राजकीय परिस्थितीबाबतचा अंदाज व्यक्त करताना शेलार म्हणाले, भारतीय जनता पक्ष नंबर एकचा पक्ष राहील. निवडून आलेल्यांमध्ये सर्वाधिक आमदार भारतीय जनता पक्षाचे असतील. लोकसभा निवडणुकीवेळी असेच दावे केले होते, हे निदर्शनास आणून दिल्यावर ते म्हणाले, लोकसभेवेळी आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही. हवे असलेले आकडे आले नाहीत. चुका झाल्या. आत्मचिंतन केलं. लक्षात असं आलं की फेक नरेंटिक, एक इकोसिस्टिम दोन्ही गोष्टी वेगळ्या त्या त्यांचं काम करत होत्या. आमचा चारशे पारचा नारा, त्यातून मतदारांना, कार्यकत्यांना निर्धास्त ठेवलं. या सगळ्या चुकांची पुनरावृत्ती आता आम्ही करीत नाही. त्या चुकांपासून शिकलो आहोत. त्या दुरुस्त करून पुढं चाललोय. आज पाच महिन्यांत महायुतीच्या सरकारनं केलेले कार्यक्रम राबवलेल्या योजना, त्यांची अंमलबजावणी यामुळे वातावपण बदललंय. मधे हरियाणाच्या विजयामुळे मतदार आणि कार्यकत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आपला मतदार, आपला मुद्दा, आपली रचना, आपली संघटना आणि समोरच्यांचे नरेटिव्ह सेट होण्याआधी सत्य लोकांपर्यंत पोहोचवणं या बळावर आम्हाला ही खात्री आहे. फेक नरेटिव्ह आणि झूठ की दुकान एक बार चल सकता है बार बार नही चल सकता.

केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून भाजप विरोधकांना छळते, आपल्याकडे घेते, भ्रष्टाचा-यांना पावन करून घेते, या आरोपाबाबत ते म्हणाले, आमच्याकडं बोर्ट दाखवणा-यांनी स्वतःकडं पाहावं. अडीच वर्षांत उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीत एबीपीच्या पत्रकाराला अटक झाली, संपादकाला घरातून उचलून नेलं, सोशल मीडियावर कार्टून फॉरवर्ड केलं म्हणून माजी नेव्ही अधिका-याचा डोळा फोडला, हिरॉइनचं घर तोडलं, केंद्रीय मंत्र्यांना जेवणाच्या थाळीवरून उचलून नेलं हे काय होतं? आमच्याकडं बोटं दाखवणा-यांनी  याचं उत्तर द्यावं भ्रष्टाचाराचं बोलताना आम्ही हर्षवर्धन पाटलांबद्दल कुणाला विचारायचं? आमच्याकडे आला तर वॉशिंग मशीन, तुमच्याकडं निरमा आहे का? माझ्याकडं आला तर आरोप. तुमच्याकडं आला तर लोकशाही, याची सार्वत्रिक चर्चा झाली पाहिजे. आमच्याकडं बोटं दाखवणारांना जास्ती प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. काळजावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं, असं चंद्रकांतदादा माणाले होते, ही भाजपच्या कार्यकत्यांची भावना आहे का? या प्रश्नावर ते म्हणाले, चंद्रकांतदादांनाच याचा अर्थ काय विचारावा लागेल. महायुती महणून एकत्र आलो. त्यांनी बंड केलं. आमदारांनी बंड केलं. त्या पाश्र्वभूमीवर युती झाली. स्वाभाविकपणे सरकार येण्यात एकनाथ शिंदेचं बंड महत्त्वाचं होतं. महत्त्वाचं का तर वैचारिक भूमिकेसाठी केलं होतं. म्हणून शिंदे साहेबांना मुख्यमंत्रिपद दिलं. काही कार्यकत्यांच्या मनात येणं स्वाभाविक आहे. पण लोकशाहीत अशा पद्धतीनं सरकार बनतात. ती टिकतात. अस्थिरतेपेक्षा अशी सरकारं महत्त्वाची ठरतात. (Ashish Shelar)

विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा काळजावर दगड ठेवण्याची वेळ आली तर?

या प्रश्नावर ते म्हणाले, आम्ही संघटना शरण लोक आहोत. आम्ही लहाणपणापासून संघगीत शिकलोय, ‘असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच आमचे शील असा विचार करणारे स्वयंसेवक आहोत. त्यामुळे तशी परिस्थिती आली तर आनंदाने स्वीकारू, पण झालेल्या चुका येणा-या काळात करून चालणार नाही, महामंडळे, मंडळांवर कट्टर कार्यकत्यांना स्थान मिळाले पाहिजे, याचा आग्रह मी धरेन, महायुतीतही शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या भूमिकांत वैचारिक अंतर असल्याकडे लक्ष वेधले असता शेलार म्हणाले, देवेंद्रजींनी सांगितलंय की, भाजप- शिवसेना ही नैसर्गिक युती, तर राष्ट्रवादीशी राजकीय चुत्ती आहे. राजकीय युतीमध्ये आम्ही एकत्र असताना काही गोष्टी आम्हाला तर काही त्यांनाही सोडाव्या लागतील. सध्याच्या अनेक भाजप नेत्यांपेक्षा तुम्ही वेगळे आहात, उदारमतवादी आहात, ही तुमची जडणघडण कशी झाली, या प्रश्नावर शेलार सांगू लागले, जो भाजप मला कळला त्या कळलेल्या भाजपप्रमाणे मी वागतो. अन्य लोकांना काय कळला हे मी सांगू शकत नाही. मी गरीब परिस्थितीतून आलो. बांद्रघात छोटं घर होतं. त्यामुळे शेजारधर्माचं महत्त्व मला जास्त वाटतं. तुमचा शेजारी कुठल्या जातीचा, भाषेचा, धर्माचा यापेक्षा शेजारधर्म महत्त्वाचा हे मी आई- वडिलांकडून शिकलो. ईद, दिवाळी आम्ही शेजा-यांसोबत एकत्र साजरी केली. बाजूला गमरेंचं घर होतं त्यांच्याकडं बौद्ध पौर्णिमेला एकत्र जमायचो. त्यांच्याकडून मी बाबासाहेबांची पुस्तकं वाचली. मला हे करण्यापासून नंतरही भाजपमध्ये कुणी रोखलं नाही. मी स्वतः वकील आहे. संविधान आणि संविधानांतर्गत अधिकार याच्या वर देशात काही असतं असं मानणारा मी नाही. विरोधक म्हणजे शत्रू नाही. विरोधक आहेत. राजकीय विरोधकांशी शत्रूप्रमाणे वागणे योग्य नाही, असे माझे मत आहे.

महाराष्ट्राच्या पातळीवर काम करायचं आहे

मुंबई भाजपचा अध्यक्ष म्हणून काम करताना समाधानी आहात, की राज्याच्या पातळीवर काम करण्याची इच्छा आहे? या प्रश्नावर शेलार म्हणाले, मुंबईत काम करताना आनंद असतोच. पण एक पाऊल पुढे जायला पाहिजे, असं वाटणं स्वाभाविक आहे. राज्याच्या पातळीवर काम करावं असं मला वाटतं. पण माझ्याबद्दल विचार करणारांना हे का वाटत नाही याची खंत वाटते.

शरद पवार यांच्याशी संबंध

शरद पवारांशी असलेल्या संबंधांबावत विचारता ते म्हणाले, वय, अनुभव, कर्तृत्व, समाजकारण, राजकारण, क्रीडा क्षेत्रात पवारसाहेबांचा अनुभव प्रदीर्घ आहे. मी कुठेच नाही  इतकं अंतर असतानाही त्यांनी माझ्याशी मित्रत्वाचे संबंध ठेवलेत. मला लाख वाटेल, पण पवारसाहेबांनीही ती मोकळीक, तो संबंध ठेवला. त्याचे श्रेय मी त्यांनाच देईन. क्रिकेटच्या राजकारणात एकत्र राहिलो, राहणार आहोत. मुंबई क्रिकेट, महाराष्ट्र क्रिकेट, बीसीसीआयमध्ये त्यांनी दिलेलं योगदान मोठे आहे. आपण शिकत राहिलं पाहिजे, शिकण्याचा भूमिकेतून अनेक नेत्यांशी माझे संबंध टिकून आहेत. (Ashish Shelar)

कॅन्सर हॉस्पिटलची उभारणी

मी २३ वर्षे वांद्रे भागातून निवडून आलेला कार्यकर्ता आहे. एका गल्लीतून जाताना एकदा एका लहान मुलाचे रडणे मी ऐकले. त्याला कॅन्सर झाला होता. ट्रीटमेंटला वेळ लागणार होता. टाटा कॅन्सर रुग्णालय चांगले, पण जाण्या-येण्याची अडचण होती. त्या दिवशी ठरवलं, मतदारसंघात कैन्सर हॉस्पिटल उभारायचं. सांगायला आनंद वाटतो की, १७६ बेडचं कॅन्सर हॉस्पिटल सर्व परवानग्यांनिशी बीएमसीच्या सहकार्यानं उभं राहायला तयार आहे. पुढच्या अडीच वर्षांत उभं राहील. तिर्थ मुंबईतल्या, महाराष्ट्रातल्या कॅन्सर पेशंटना मोफत उपचार मिळतील, मोफत राहण्याची सोयही होईल.

ही मुलाखत @ Dinman Marathi (दिनमान मराठी) यू ट्यूब चॅनलवर पाहू शकता.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00