क्वालालंपूर : भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयला मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत विचित्र समस्येला सामोरे जावे लागले. प्रणॉयने कॅनडाच्या ब्रायन यँगविरुद्ध एका गेमची आघाडी घेतली असताना कोर्टचे छत गळू लागले. अखेर २५ मिनिटांच्या खेळानंतर हा सामना स्थगित करून बुधवारी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. (Badminton)
क्वालालंपूरच्या अक्सियाटा अरिनामध्ये ही स्पर्धा सुरू आहे. प्रणॉयचा सलामीचा सामना ‘कोर्ट-३’वर होता. या सामन्याचा पहिला गेम २१-१२ असा जिंकून प्रणॉयने सामन्यात आघाडी घेतली होती. दुसऱ्या गेममध्ये प्रणॉय ६-३ने आघाडीवर असताना छतामधून पावसाचे पाणी कोर्टवर गळण्यास सुरुवात झाली. तासाभराच्या विलंबानंतर हा सामना पुन्हा सुरू झाला. परंतु, यँगने ११-९ अशी आघाडी घेतल्यानंतर पुन्हा गळती सुरू झाल्यामुळे हा सामना दुसऱ्या दिवशी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. बुधवारी हा सामना होणार असल्याचे भारताचे प्रशिक्षक आरएमव्ही गुरुसाईदत्त यांनी सांगितले. प्रणॉयने प्रथम गळतीची माहिती पंचांना दिली. त्यानंतर, आयोजकांनी कोर्टची पाहणी करून सामना स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यावेळी ‘कोर्ट २’वरील सामनेही याच कारणामुळे रद्द करण्यात आले. (Badminton)
ट्रिसा–गायत्रीची विजयी सलामी
महिला दुहेरीच्या सलामीच्या सामन्यात भारताच्या ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपिचंद या जोडीने विजयी सलामी दिली. त्यांनी पहिल्या फेरीमध्ये थायलंडच्या ऑर्निचा जाँग्साथापोर्नपार्न आणि सुकिता सुवाचाई या जोडीचा २१-१०, २१-१० असा सरळ गेममध्ये पराभव केला. सहाव्या मानांकित ट्रिसा-गायत्रीने हा सामना अवघ्या ३० मिनिटांत जिंकला. दुसऱ्या फेरीत ट्रिसा-गायत्री जोडीचा सामना चीनच्या यी फान जिया-शू शिआन झँग या जोडीशी होईल.
Prannoy match was halted due to water leak from the roof in Malaysia Open S1000 👀pic.twitter.com/mWp9xgZsGE
— The Khel India (@TheKhelIndia) January 7, 2025