वृत्तसंस्था : गेल्या काही काळापासून भारतीय क्रिकेट संघाला ग्रहण लागले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ३-० ने पराभव स्वीकारावा लागला होता. यामुळे भारतीय संघाला टीकांना सामोरे जावे लागत आहे. यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतील अव्वल स्थानही धोक्यात आले. यानंतर भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. परंतु, याआधीच ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय अ संघाला मोठा दणका बसला आहे. या मालिकेत भारतीय अ संघाचा ऑस्ट्रेलियाने मोठा पराभव केला आहे.
न्यूझीलंडने ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला क्लीन स्वीप देत ऐतिहासिक कामगिरी केली होती. या मालिकेत किवी संघाने भारताचा ३-० ने पराभव केला होता. या पराभवामुळे भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा फटका बसला. टीम इंडियाला गुणतालिकेत अव्वल स्थान गमवावे लागले. भारताला आता २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळायची आहे. या ट्रॉफीमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे, परंतु सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय अ संघाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
मेलबर्न येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया अ संघाने भारत अ संघाचा ६ गडी राखून पराभव केला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय अ संघाचा पहिला डाव अवघ्या १६१ धावांवर आटोपला. यात ध्रुव जुरेलने एकाकी झुंज दिली. त्याच्या व्यतिरिक्त एकाही खेळाडूला विशेष कामगिरी करता आली नाही. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या अ संघाने २२३ धावा केल्या. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. परंतु भारताचा दुसरा डाव २२९ धावांवर आटोपला. यातही ध्रुव जुरेलने सर्वाधिक ६८ धावांची मोलाची खेळी केली.
सामन्यात विजय मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियासमोर १६८ धावांचे आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारत अ संघाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलिया अ संघाला सुरुवातील धक्का दिला. परंतु ऑस्ट्रेलियाच्या सॅम कोन्स्टासने केलेल्या नाबाद ७३ आणि ब्यू वेबस्टरच्या नाबाद ४६ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सहा विकेट राखून सामन्यात विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलिया अ संघाने २ अनधिकृत सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा २-० ने पराभव केला. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ७ विकेट राखून पराभव केला होता.