नवी दिल्ली : भारताची लांब पल्ल्याची धावपटू अर्चना जाधववर डोपिंग प्रकरणात दोषी आढळल्याबद्दल चार वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या उत्तेजक द्रव्य चाचणीत अर्चना दोषी आढळली होती. (Archana Jadhav)
मागील वर्षी डिसेंबर महिन्यात पुण्यातील अर्धमॅरेथॉनदरम्यान अर्चनाचे नमुने घेण्यात आले होते. या नमुन्यांची चाचणी करता तिच्या शरीरात ऑक्झँड्रोलोन या बंदी असणाऱ्या उत्तेजक द्रव्याचे अंश आढळून आले. या उत्तेजक द्रव्यामुळे शरीरातील प्रथिननिर्मितीला चालना मिळत असून स्नायूबांधणीस मदत होते. उत्तेजक द्रव्य चाचणीच्या निकालांनंतर ७ जानेवारीपासून तिच्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. (Archana Jadhav)
या तात्पुरत्या बंदीला विरोध करण्यासाठी वर्ल्ड ॲथलेटिक्स ॲथलिट इंटेग्रिटी युनिट (एआययू) या संस्थेने तिला ३ मार्चपर्यंतची मुदत दिली होती. २५ फेब्रुवारी रोजी अर्चनाने एआययूला पाठवलेल्या ई-मेलमध्ये ‘मी क्षमा मागते… तुमच्या निर्णयाचे मी स्वागत करते,’ असे लिहिले होते. (Archana Jadhav)
एआययूने २८ फेब्रुवारी रोजी भारतीय ॲथलेटिक्स महासंघाला (एएफआय) ई-मेल पाठवून अर्चनाच्या दाद मागण्याची मुदत संपत असल्याची आठवण करून दिली होती. त्यानंतरही, अर्चनाकडून याबाबत कोणताही प्रतिसाद आला नाही. त्याचप्रमाणे तिने ब नमुने तपासण्याची विनंतीही केली नाही. परिणामी, तिला आपली चूक मान्य असल्याचे गृहीत धरून एआययूने चार वर्षांच्या बंदीची कारवाई केली. अर्चनाच्या बंदीचा कालावधी ७ जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे, मागील वर्षी १५ डिसेंबरपासून तिने नोंदवलेले विक्रम व तिला मिळालेली पदकेही रद्द करण्यात येतील. (Archana Jadhav)
अर्चनाची १०,००० मीटर शर्यतीतील सर्वोत्तम कामगिरी ३५ मिनिटे ४४.२६ सेकंद अशी आहे. तिने १ ता. २०.२१ सेकंदांमध्ये अर्धमॅरेथॉन पूर्ण केले असून ३००० मी. शर्यत १० मि. २८.८२ सेकंदांमध्ये पूर्ण केली आहे.