कोल्हापूर : प्रतिनिधी : स्थापत्य कलेचा अद्भूत आविष्कार असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात किरणोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सूर्यकिरणे देवीच्या मुखावर प्रकाशमान झाली. पहिल्याच दिवशी किरणोत्सव झाल्याने भाविकांनी देवीची आरती करुन आनंद साजरा केला. (Ambabai kiranotsav)
अंबाबाई मंदिरात दरवर्षी ३१ जानेवारी, एक फेब्रुवारी, दोन फेबुवारी तर नऊ, दहा आणि अकरा नोव्हेंबरला किरणोत्सव होतो. पहिल्या दिवशी सूर्यकिरणे देवीच्या पायावर, दुसऱ्या दिवशी मध्यावर तर तिसऱ्या दिवशी मुखावर पडतात. गेले काही वर्षे अभ्यासक पारंपरिक किरणोत्सवाच्या अगोदर दोन दिवस आणि नंतर दोन दिवस किरणोत्सवाचा अभ्यास करतात. (Ambabai kiranotsav)
असा झाला किरणांचा प्रवास
शुक्रवारी (दि. ३१जानेवारी) रोजी पूर्णक्षमेतेने किरणोत्सव झाला. सूर्यकिरणांनी देवीचा पदस्पर्श करणे अपेक्षित असताना किरणांचा प्रवास मूर्तीच्या पायावरुन देवीच्या मुखकमलावर मळवटापर्यंत पोचला. सायंकाळी पाच वाजून २५ मिनिटांनी किरणांनी महाद्वारात प्रवेश केला. त्यानंतर पाच वाजून ५५ मिनिटांनी किरणांचा प्रवास गणपती मंदिर चौकातून सुरू झाला. किरणे कासव चौकात आली तेव्हा पाच वाजून ५९ मिनिटे झाली होती. सहा वाजून दोन मिनिटांपासून पुढच्या सहा मिनिटात किरणांनी पितळी उंबरा, चांदीचा उंबरा आणि संगमरवरी तिसरी पायरी ओलांडली. यावेळी मंदिरातील दिवे मालवण्यात आले. सहा वाजून १२ मिनिटांनी किरणांनी अंबाबाईला चरणस्पर्श करताच गाभारा उजळून निघाला. त्यानंतर किरणे मूर्तीच्या वरच्या दिशेने सरकत गेली. सहा वाजून १६ मिनिटांनी मावळतीच्या किरणांनी अंबाबाईच्या मुखापर्यंत पोचली. तर सहा वाजून १७ मिनिटांनी किरणे देवीच्या मळवटावर पोहोचली. पुढचा एक मिनिट किरणे स्थिर होती. प्रखर किरणांमुळे गाभारा सोनेरी किरणांनी उजळून गेला होता. किरणे थेट अंबाबाईच्या मुखापर्यंत पोहोचल्यानंतर भाविकांनी अंबाबाईचा जयघोष केला. त्यानंतर अंबाबाईची आरती झाली. (Ambabai kiranotsav)
स्क्रीनची व्यवस्था
गेल्या तीन दिवसांपासून अंबाबाई मंदिरात उत्तरायण पर्वातील किरणोत्सव सोहळा सुरु आहे. पहिल्या दिवशी किरणे अंबाबाईच्या कमरेपर्यंत तर दुसऱ्या दिवशी किरणे अंबाबाईच्या किरीटापर्यंत पोहोचली होती. शुक्रवारी किरणोत्सव सोहळा पाहण्यासाठी सायंकाळी पाच वाजल्यापासूनच भाविकांनी गर्दी करायला सुरुवात केली. कासव चौकात दोन्ही बाजूला भाविक बसले होते. मंदिराच्या आवारातील स्क्रिनवरही किरणोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. (Ambabai kiranotsav)
किरणांची प्रखरता ७५ लक्स
सध्याच्या उत्तरायण पर्वातील किरणोत्सव विनाअडथळा सुरु आहे. हवेतील धुलिकणांचे प्रमाणही कमी आहे. तसेच गेल्या दोन दिवसात मावळतीच्या किरणांची प्रखरता ४५ लक्स इतकी होती. शुक्रवारी, तिसऱ्या दिवशी ही प्रखरता ७५ लक्स इतकी तीव्र झाली. त्यामुळे किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होणार असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला होता. अभ्यासक डॉ. मिलींद कारंजकर यांच्या निरीक्षणानुसार, हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही कमी असल्याने किरणांचा प्रवास अंबाबाईच्या गाभाऱ्यापर्यंत सुकर झाला.
हेही वाचा :
कुंभमेळ्याचा ४५ कोटी भाविकांचा आकडा कुठून आला?