मुंबई : विशेष प्रतिनिधी : अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्लाप्रकरणात पहिल्यांदा ताब्यात घेतलेल्या तरुणाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. संशयावरून ताब्यात घेतल्यामुळे बदनामी झाली. त्यामुळे नोकरी गेली आणि ठरलेले लग्नही मोडले. आकाश कनौजिया असे त्याचे नाव आहे. आकाशनेच तसा दावा केला आहे. रेल्वे पोलिसांनी झारखंड येथून त्याला ताब्यात घेतले होते.(Akash Kanaujia)
१६ जानेवारीला सैफच्या घरात शिरून जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी ठाण्यातून मोहम्मद शहजाद या बांगलादेशी तरुणाला अटक केली. मात्र त्यापूर्वी मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून आकाश कनोजिया या ३१ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले होते. हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांसमोर आरोपीला अटक करण्याचे मोठे आव्हान होते. २० हून अधिक पथके आरोपीच्या शोधात तयार केली होती. पोलिसांनी संशयिताचे छायाचित्र आणि दिलेल्या माहितीवरून रेल्वे पोलिसांनी आकाशला झारखंडमध्ये दुर्ग येथे ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमध्ये ताब्यात घेतले. नंतर त्याचे फोटो सर्वत्र व्हायरल झाले. (Akash Kanaujia)
आकाशने घडलेल्या प्रकाराबद्ल सांगितले,‘माझ्याबद्दल ऐकून आणि बातम्यांमध्ये पाहून माझ्या कुटुंबीयांना धक्का बसला. मला संशयित आरोपी म्हणून विविध वाहिन्यांवर दाखवण्यात येऊ लागले. मात्र सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेल्या व्यक्तीला मिशी नव्हती आणि माझी मिशी आहे. तरीही पोलिसांनी मला ताब्यात घेतले. पकडून मुंबईला आणले.’ (Akash Kanaujia)
पोलिसांचा मला फोन आला होता. त्यांनी मला कुठे असल्याची विचारणा केली होती. त्यावेळी मी घरी असल्याचे सांगितलं आणि काही वेळातच पोलिसांनी ताब्यात घेतले. मी माझ्या होणाऱ्या पत्नीला भेटण्यासाठी निघालो होतो. मात्र त्याआधीच मला ताब्यात घेण्यात आले. शहजातला अटक केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. मात्र काही तासातच वाहिन्या आणि सोशल मीडियावर माझे छायाचित्र प्रसिद्ध झाले. त्यामुळे माझी बदनामी झाली. माझे ठरलेले लग्न मोडले आणि चालकाची नोकरीही गमवावी लागली. पोलिसांनी चौकशीदरम्यान मला मारहाण केल्याचा आरोपही त्याने केला.
हेही वाचा :
सैफवर हल्ला प्रकरणाला नवे वळण