सिडनी : भारताचा वेगवान गोलंदाज आकाश दीप पाठीच्या दुखण्यामुळे बॉर्डर-गावसकर मालिकेतील सिडनी येथे रंगणाऱ्या अखेरच्या कसोटीत खेळू शकणार नाही. त्याच्याजागी हर्षित राणा किंवा प्रसिध कृष्णा यांच्यापैकी एका गोलंदाजास अंतिम संघात स्थान मिळेल. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने या कसोटीसाठी संघ जाहीर केला असून त्यामध्ये मिचेल मार्शच्या जागी नवोदित ब्यू वेबस्टरला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. (Akash Deep)
आकाशदीपला मेलबर्न कसोटीदरम्यान पाठीचे स्नायू दुखावल्यामुळे काही काळ मैदानाबाहेर जाऊन उपचार घ्यावे लागले होते. त्याची दुखापत बळावू नये, यासाठी त्याला सिडनी कसोटीतून विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच्याजागी हर्षित किंवा प्रसिध यांपैकी एकाची निवड करण्यात येईल. हर्षितने या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी खेळल्या आहेत. प्रसिध मात्र मागील वर्षभरापासून आंतरराष्ट्रीय कसोटी खेळलेला नाही. मागील वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेली कसोटी ही त्याची अखेरची कसोटी होती.
ऑस्ट्रेलिया संघामध्ये मिचेल मार्शच्या जागी ब्यू वेबस्टरची निवड करण्यात आली. यंदाच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियातर्फे आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण करणारा वेबस्टर हा तिसरा क्रिकेटपटू ठरणार आहे. आतापर्यंत, नॅथन मॅकस्विनीने पर्थमध्ये, तर सॅम कॉन्स्टसने मेलबर्न कसोटीत पदार्पण केले होते. अष्टपैलू वेबस्टरने ऑस्ट्रेलियातील शेफिल्ड शिल्ड या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेच्या मागील मोसमामध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने ५८.६२ च्या सरासरीने ९३८ धावा करतानाच ३० विकेटही घेतल्या होत्या. (Akash Deep)
हेही वाचा :
- मनू भाकर, डी. गुकेश यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर
- परेराच्या शतकाने श्रीलंकेचा विजय
- रोहित शर्मा संघाबाहेर?