Home » Blog » AIUFC: शिवाजी विद्यापीठाचे फुटबॉल खेळाडू रेल्वेतून पळाले

AIUFC: शिवाजी विद्यापीठाचे फुटबॉल खेळाडू रेल्वेतून पळाले

अखिल भारतीय सामन्यात विद्यापीठावर नामुष्कीची वेळ

by प्रतिनिधी
0 comments
AIUFC

कोल्हापूर : प्रतिनिधी : कानपूर येथे अखिल भारतीय विद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघ रेल्वेने रवाना झाला. पण त्या संघातील पाच ते सहा खेळाडूंनी प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांना न सांगता पलायन केले. हे खेळाडू स्थानिक संघाच्या प्रेमापोटी पळून आल्याची चर्चा कोल्हापूर फुटबॉल वर्तुळात सुरू झाली आहे.(AIUFC)

वेस्ट झोन फुटबॉल स्पर्धेत दिमाखदार कामगिरी करुन शिवाजी विद्यापीठ अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरल्याने खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव झाला. या स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ संघ मोठी मजल मारेल, असा विश्वासही अनेकजण व्यक्त करत होते. विद्यापीठाच्या संघात कोल्हापुरातील स्थानिक फुटबॉल संघातील खेळाडूंचा मोठा भरणा आहे. (AIUFC)

अखिल भारतीय स्पर्धेसाठी वेस्ट झोनमध्ये जो संघ होता तोच संघ मैदानात उतरावा लागतो. वेस्ट झोन स्पर्धेसाठी निवड झालेले सहा खेळाडू खासगी नोकरी करतात. त्यांनी वेस्ट झोन स्पर्धेसाठी रजा काढली होती, पण अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेसाठी सहा खेळाडूंना रजा न मिळाल्याने त्यांनी स्पर्धेत उतरण्यासाठी असमर्थता दर्शवली. त्यामुळे विद्यापीठाचा १६ जणांचा संघ कानपूरसाठी रेल्वेने रवाना झाला. कोल्हापूरचे खेळाडू विद्यापीठ स्पर्धेसाठी जात असल्याने कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनने केएसए अ गट वरिष्ट गटातील काही संघाचे सामने स्थगित केले आहेत.

उत्तरप्रदेशात सध्या कुंभमेळा सुरू असल्याने रेल्वेचे आरक्षण जवळजवळ संपले आहे. त्यापैकी फक्त ११ खेळाडूंचे आरक्षण पक्के झाले होते. तरीही मान्यवरांची पत्रे घेऊन आणि रेल्वेमध्ये काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फुटबॉलवरील प्रेमामुळे तीन खेळाडूंचे आरक्षण पक्के केले. ११ जागांवर १६ खेळाडूंनी प्रवास करण्याचे पक्के झाले. त्यानंतर खेळाडूंनी कोल्हापूरहून कानपूरकडे रेल्वेने प्रवास सुरू केला. (AIUFC)

दरम्यान जे सहा खेळाडू कानपूरला गेले नाहीत ते खेळाडू स्थानिक संघांकडून खेळतात. त्या स्थानिक संघाचे सामने केएसए लिगमध्ये घेणार असल्याची अफवा कोल्हापुरातील काही महत्त्वाच्या संघांत पसरली. सध्या केएसएस वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेतील दोन फेऱ्यातील सामन्यांना मोठे महत्व आल्याने स्थानिक संघाच्या व्यवस्थापनातील काहीजणांनी खेळाडूंचे कान भरल्याचे वृत्त पुढे आले आहे.  त्यातील काही संघांच्या व्यवस्थापकांनी आपल्या तालमीच्या, क्लबच्या संघासाठी कानपूरला जाऊ नका, असे चुकीचे सल्ले दिल्याने ते खेळाडू वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर उतरले. त्यांनी संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांना याबाबत काहीच कळवले नाही. त्याचा फटका शिवाजी विद्यापीठ संघाला बसणार आहे. या संदर्भात शिवाजी विद्यापीठ संघाचे व्यवस्थापक डॉ. अभिजीत वणिरे, प्रशिक्षक प्रा. अमर सासने, शिवाजी विद्यापीठ क्रीडा विभागाच्या प्रमुख राजेंद्र बनसोडे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. (AIUFC)

सध्या शिवाजी विद्यापीठाचे ११ खेळाडू कानपूरला गेले आहेत. त्यामध्ये एक रहिमतपूरचा गोलरक्षक असून एक खेळाडू जखमी आहे. ज्यावेळी शिवाजी विद्यापीठाचा संघ मैदानात उतरणार आहे त्यावेळी २२ खेळाडूऐवजी ११ खेळाडू मैदानावर दिसणार असल्याने विद्यापीठाची प्रतिष्ठा धुळीस मिळणार आहे.  एखादा खेळाडू जखमी झाला तर मैदानावर संघाची अवस्था अत्यंत बिकट होणार आहे. संघात राखीव खेळाडूच नसल्याने प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

दरम्यान शिवाजी विद्यापीठ संघातील पाच ते सहा खेळाडू जाणार नसल्याची वार्ता फुटबॉल वर्तुळात पसरल्याने फुटबॉल शौकिनांना धक्का बसला आहे. शिवाजी विद्यापीठाकडून खेळण्याचा मान मिळाला असताना मैदान सोडून रणछोडदासवृत्ती स्वीकारलेल्या खेळाडूंबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या संदर्भात शिवाजी विद्यापीठ आणि केएसए या खेळाडूवर कोणती कारवाई करणार याकडे फुटबॉल शौकिनांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :
बुमराह ‘क्रिकेटर ऑफ दि इयर’
 विराट कोहलीचा दिल्ली संघासोबत सराव
भारत उपांत्य फेरीत

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00