मुंबई : एअर इंडियाचे मुंबईहून न्यूयॉर्कला जाणारे विमान सोमवारी अर्ध्यातून माघारी फिरवून पुन्हा मुंबईमध्ये उतरवण्यात आले. आकाशात असताना या विमानामध्ये बॉम्ब असल्याची खोटी माहिती मिळाल्यामुळे हे विमान माघारी आणण्यात आल्याचे समजते. (Air India)
एअर इंडियाच्या एआय-११९ या विमानाने सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मध्यरात्री २ वाजता न्यूयॉर्कच्या दिशेने उड्डाण केले. या बोईंग ७७७ प्रकारच्या विमानामध्ये ३०३ प्रवासी आणि १९ क्रू मेंबर्स होते. १५ तासांच्या उड्डाणानंतर हे न्यूयॉर्कच्या जॉन एफ. केनडी विमानतळावर उतरणार होते. तथापि, हे विमान अझरबैजानवरून जात असताना विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर, हे विमान पुन्हा मुंबईच्या दिशेने वळवण्यात आले आणि सकाळी १०.२५ वाजता मुंबईमध्ये उतरवण्यात आले. विमान उतरल्यानंतर बॉम्ब तपासणी पथकाने संपूर्ण विमान व सामानाची तपासणी करण्यात आली. त्यावेळी, बॉम्बची अफवा खोटी असल्याचे निष्पन्न झाले.(Air India)
आता हे विमान मंगळवारी पहाटे ५ वाजता पुन्हा न्यूयॉर्ककडे उड्डाण करणार आहे. या विमानातील प्रवाशांची एका दिवसाची राहण्याची व निवासाची व्यवस्था करण्यात आल्याची माहितीही एअर इंडियाने दिली आहे. सुरक्षा दलांकडूनही या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असून एअर इंडियातर्फे तपाससंस्थांना पूर्ण सहकार्य करण्यात येत असल्याचेही प्रवक्त्यांनी सांगितले. सोमवारी उड्डाण करण्यापूर्वी, सुरक्षेच्या दृष्टीने सर्व तपासण्या करण्यात येतील. प्रवाशांचा व क्रूच्या सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असेही प्रवक्त्यांनी म्हटले आहे. (Air India)
हेही वाचा :
माजी मुख्यमंत्र्यांच्या १४ ठिकाणांवर ईडीचे छापे
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ५७ कोटींवर डल्ला मारण्याचा प्रयत्न