सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड दहा नोव्हेंबरला निवृत्त होणार असून त्यांनी पुढील सरन्यायाधीशपदासाठी न्या. संजीव खन्ना यांची शिफारस केली आहे. न्या. खन्ना हे ११ नोव्हेंबर २०२४ रोजी सरन्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेणार असून ते देशाचे ५१ वे सरन्यायाधीश असतील. १८ जानेवारी २०१९ रोजी न्या. खन्ना यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती मिळाली होती. ते १३ मे २०२५ रोजी निवृत्त होणार आहेत. सरन्यायाधीश म्हणून त्यांना जेमतेम सहा महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.
न्या. संजीव खन्ना यांच्या मातोश्री सरोज खन्ना या लेडी श्रीराम कॉलेजमध्ये अध्यापक होत्या आणि वडिल देवराज खन्ना वकील होते, जे नंतर दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश बनले. वकिलीच्या व्यवसायात खूप कष्ट आणि संघर्ष आहे, त्यामुळे संजीव खन्ना यांनी वकिलीच्या फंदात न पडता चार्टर्ड अकौंटंट बनावे, अशी त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा होती. परंतु आपले काका आणि प्रख्यात न्यायमूर्ती हंसराज खन्ना यांच्यापासून प्रेरणा घेऊन संजीव खन्ना यांनी वकिलीचा मार्ग निवडला. त्याच मार्गावरून मार्गक्रमण करीत ते आता सरन्यायाधीशपदी विराजमान होत आहेत.
दिल्ली विद्यापीठातून १९८० साली पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्याच विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटर येथून त्यांनी कायद्याची पदवी मिळवली. १९८३ मध्ये खन्ना यांना दिल्ली बार कौन्सिलची सनद मिळाली. दिल्लीच्या तीसहजारी संकुलातील जिल्हा न्यायालयात त्यांनी वकिली करायला सुरुवात केली. न्या. संजीव खन्ना यांनी चौदा वर्षे दिल्ली उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम केले. १८ जानेवारी २०१९ मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून बढती मिळाली. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालय आणि न्यायाधिकरणांमध्ये त्यांनी घटनात्मक कायदा, प्रत्यक्ष कर आकारणी, लवाद कार्यवाही अशा विविध क्षेत्रांमध्ये कारकीर्द घडवली.
न्या. हंसराज खन्ना दिलेल्या एका निकालामुळे तत्कालीन तत्कालीन इंदिरा गांधी सरकार नाराज झाले होते. त्यामुळे न्या. हंसराज खन्ना यांचे ज्येष्ठत्व डावलून न्या. एच. एम. बेग यांना जानेवारी १९७७मध्ये सरन्यायाधीश बनवण्यात आले होते. त्यावेळी स्वाभिमान दुखावलेल्या न्या. हंसराज खन्ना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. न्या. संजीव खन्ना गेली दोन वर्षे सर्वोच्च न्यायालयात दुस-या क्रमांकाचे न्यायमूर्ती आहेत. आपल्या काकांच्या प्रतिमेला वंदन करून ते आपल्या कामकाजाला सुरुवात करतात. न्या. संजीव खन्ना यांनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती म्हणून १८ जानेवारी २०१९ ला शपथ घेतली आणि ज्या कोर्टरूममधून काका न्या. हंसराज खन्ना निवृत्त झाले होते, तिथूनच आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती.
सर्वोच्च न्यायालयातील आतापर्यंतच्या कारकीर्दीमध्ये संजीव खन्ना यांनी विविध महत्त्वाचे निर्णय देणाऱ्या घटनापीठांचे आणि खंडपीठांचे कामकाज पाहिले आहे. निवडणुकांमध्ये मतदानयंत्रांचा वापर कायम राखण्याचा निर्णय, निवडणूक रोखे योजना रद्द करण्याचा निर्णय, अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय कायम ठेवण्याचा निकाल, अरविंद केजरीवाल यांना जामीन अशा महत्त्वाच्या खटल्यांमध्ये त्यांचा सहभाग होता. न्या. खन्ना यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीचे अध्यक्ष म्हणून १७ जून २०२३ ते २५ डिसेंबर २०२३ या कालावधीत काम पाहिले. सध्या ते राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष आणि भोपाळच्या राष्ट्रीय न्यायिक अकादमीच्या प्रशासकीय परिषदेचे (गव्हर्निंग कौन्सिल) सदस्य आहेत.