कोल्हापूर; प्रतिनिधी : ख्रिसमस, वर्षाअखेरच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्यांचा हंगाम सुरू असून कोल्हापूर शहर भाविक आणि पर्यटकांनी फुलुन गेले आहे. आज (दि.२७) अंबाबाई मंदिरात एक लाख २७ हजार ३६१ भाविकांनी सायंकाळपर्यंत दर्शन घेतल्याची नोंद झाली आहे. गेल्या आठ दिवसात करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराला पाच लाख ६४ हजार ११३ भाविकांनी भेट दिली आहे. पर्यटकांच्या गर्दीमुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र पहायला मिळाले.
राज्यातील सर्व धार्मिक स्थळे आणि पर्यटन स्थळावर भाविकांनी गर्दी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीरनिवासिनी अंबाबाई, दख्खनचा राजा जोतिबा मंदिर, नृसिंहवाडी दत्त मंदिर, किल्ले पन्हाळा, दाजीपूर अभियारण्य, गगनबावडा या पर्यटनस्थळावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. शहरातील रंकाळा चौपाटीवर पर्यटकांची पावले वळू लागली आहे. चौपाटीवरील रात्रीची विद्युत रोषणाई पाहण्यासाठी पर्यटकांची तोबा गर्दी होत आहे. न्यू पॅलेस येथील वास्तुसंग्राहालयाला पर्यटकांनी मोठ्या संख्येने भेट दिली.
करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. आज देवीचा वार शुक्रवार असल्याने सायंकाळपर्यंत एक लाख २७ हजार भाविकांनी दर्शन घेतले होते. दर्शनाची मुख्य रांग भरुन भवानी मंडपाच्या कमानीच्या बाहेर गेली होती. मंदिराचा परिसर फुलुन गेला होता. दर्शनाच्या मुख्य रांगेबरोबर मुख दर्शनासाठीही मोठी रांग लागली होती. मंदिराच्या परिसराच्या चारही बाजूला असलेल्या रस्त्यांवर दिवसभर सातत्याने वाहतूकीची कोंडी होत होती. वाहतूक शाखेच्या पोलिसांची गर्दीची कोंडी फोडताना तारेवरची कसरत करावी लागत होती.
सात दिवसातील भाविकांची संख्या अशी,
- २१ डिसंबर : ७२ हजार ६४८
- २२ डिसेंबर : ८९ हजार १०५
- २३ डिसेंबर : ५९ हजार ८७५
- २४ डिसेंबर : ६९ हजार ८२६
- २५ डिसेंबर : ६३ हजार १०५
- २६ डिसेंबर : ८२ हजार १९३
हेही वाचा :
- ‘सौर कृषी पंप योजने’त महाराष्ट्र अव्वल
- ज्येष्ठ पत्रकार बी.आर. पाटील यांचे निधन
- ‘सायकलिंग’मधील ‘जीवन गौरव’ प्रताप जाधव यांना