मुंबई : जमीर काझी : दणदणीत महाविजयामुळे एकीकडे सत्ताधारी महायुतीचे नवनिर्वाचित आमदार शनिवारी दिवाळी, दसरा सणासारखे विशेष पेहराव, गुलाबी आणि भगवे फेटे परिधान करून विधानभवनात आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद ओसडून वाहत होता. तर दुसरीकडे विरोधी महाविकास आघाडीचे सदस्य हताश चेहऱ्याने वावरत होते. ईव्हीएम मशीनबाबतची साशंकता आणि मारकरवाडी ग्रामस्थांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ त्यांनी सभात्याग करीत शपथविधीवर बहिष्कार टाकला. सत्ताधारी आमदारांच्या जयजयकाराची नारेबाजी आणि विरोधकांची घोषणाबाजी अशा गदारोळातच विशेष अधिवेशनचा पहिला दिवस गाजला. (Maharashtra Assembly)
तीन दिवसाच्या या अधिवेशनात पहिल्या दिवशी नवनिर्वाचित ८७ आमदारांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यामध्ये समाजवादी पक्षाचे अबू आझमी व माकपचे विनोद निकोले या विरोधी सदस्यांचा समावेश होता. हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. उद्या उर्वरित सर्व आमदारांचा शपथविधी तर सोमवारी विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदारांनी भगवे फेटे घालून तर अजित पवारांच्या आमदारांनी गुलाबी फेटे घालून विधानभवनात घोषणाबाजी करत एन्ट्री केली. सत्ताधारी आमदारांचा शपथविधी सुरु असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे विधिमंडळ नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे गटनेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह विरोधकांनी सभात्याग केला. ईव्हीएमचा गैरवापर झाल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या आमदारकीची शपथ घेत असताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मोठा जल्लोष केला. यावेळी त्यांनी ‘जय श्रीराम,’ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय,’ ‘जय भवानी जय शिवाजी,’च्या जोरदार घोषणा दिल्या. विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेताना अनेक आमदारांनी मराठी भाषा टाळून इतर भाषांमध्ये आपली शपथ घेतली. भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन, नीतेश राणे, राम कदम, सीमा हिरे यांनी संस्कृतमधून तसेच अबु आझमी यांनी हिंदीमधून शपथ घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी अल्लाह साक्ष घेत शपथ घेतली. (Maharashtra Assembly)
७८ नवे आमदार
विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच निवडणूक लढवत ७८ आमदारांनी विधानसभेत प्रवेश केला आहे. महायुतीचे ६२ आमदार आहेत. ठाकरे गटामधून १०, काँग्रेसचे सहा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधून प्रत्येकी ६ आमदार पहिल्यांदाच निवडून आले आहेत.
भगवद्गगीता घेऊन शपथ
मिरज विधानसभेचे आमदार सुरेश खाडे यांनी हातामध्ये भगवद्गीता घेऊन शपथ घेतली. यावेळी काँग्रेसने विरोध नोंदवला. हे सभागृह असून धर्म बाजूला ठेवून सहभागी व्हायला हवे, असे म्हणत यांनी जोरदार विरोध केला.
शिंदेंचा आमदार पायऱ्यांवर नतमस्तक
विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेण्याआधी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे हे विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाले.
२५ ते ४५ वयोगटातील ५७ आमदार
नव्या विधानसभेत २५ ते ४५ वर्ष वयोगटातील ५७ आमदार आहेत. १९७० च्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच ही संख्या सर्वांत कमी आहे.
आज विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनासाठी जाण्यापूर्वी महायुतीतील सहकाऱ्यांसह सर्वप्रथम विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. pic.twitter.com/mjUzfePmwF
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 7, 2024
हेही वाचा :
- नितिशकुमार अलर्ट मोडवर !
- ईव्हीएमचा विषय काढून महाविकास आघाडी रडीचा डाव
- सरकारचा निषेध! विधानसभा सदस्यपदाची शपथ न घेण्याचा निर्णय : नाना पटोले