मुंबई: विशेष प्रतिनिधी : आपल्या संपूर्ण आयुष्यात शिक्षणाला महत्त्व देणारे घटनाकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना वह्या,पेन पुस्तकांची शैक्षणिक मानवंदना देवून अभिवादन करावे, असे आवाहन महामानव प्रतिष्ठान आणि एक वही, एक पेन अभियानचे अध्यक्ष पत्रकार राजू झनके यांनी केले आहे. (Mahaparinirvan Day)
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले. अखेरपर्यंत ते विद्यार्थी म्हणून शिकतच होते. शिक्षणाच्या बळावर त्यांनी अनेक विषयांवर त्यांची ग्रंथसंपदा निर्माण केली. लाखो विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर डॉक्टरेट केली आहे. स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला शिक्षणाचा मूलमंत्र दिला होता. त्यामुळे ६ डिसेंबरच्या महापरिनिर्वाण दिनी हार, फुले, मेणबत्ती, अगरबत्ती या नाशवंत वस्तूंऐवजी त्यांना वह्या पेन पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्याचे अभिवादन केल्यास तीच त्यांना खरी मानवंदना राहील. जमा झालेले सर्व शैक्षणिक साहित्य समाजातील गोरगरीब, आदिवासी व गरजू विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे. दादर चैत्यभूमीवर येताना सोबत शैक्षणिक साहित्य घेवून यावे. चैत्यभूमी येथे हे साहित्य महामानव प्रतिष्ठान व भारतीय बौद्ध महासभा आयोजित एक वही, एक पेन अभियानच्या स्टॉल वर जमा करावे. अधिक माहिती तसेच सहभाग नोंदविण्यासाठी 9372343108 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन झनके यांनी केले आहे.
बाबासाहेबांवरील माहितीपट आणि चित्रपटाचे उद्या सोशल मीडियावरून प्रसारण!
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘महापरिनिर्वाण दिनानिमित्त’ ६ डिसेंबरला त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित दोन माहितीपटांसह आणि चित्रपटाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरून प्रसारण करण्यात येणार आहे. त्याद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखी मानवंदना देण्यात येणार आहे. (Mahaparinirvan Day)
‘महापुरुष डॉ.आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण सकाळी ११ वाजता आणि ‘बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण दुपारी १ वाजता तसेच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे प्रसारण दुपारी ४ वाजता करण्यात येणार आहे. महासंचालनालयाच्या सोशल मीडियावरून प्रसारण होणार आहे..
या सोशल मीडिया लिंकवर चित्रपट, माहितीपट पाहता येतील
एक्स : https://x.com/MahaDGIPR
फेसबुक : https://www.facebook.com/MahaDGIPR
यू ट्यूब : https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
हेही वाचा :
- अखेर ठरलं…एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री
- भाजपच्या जाहिरातीमधून राजर्षी शाहूंना वगळले
- ३१ वर्षे तुरुंगवास आणि १५४ फटक्यांची शिक्षा, कोण आहेत नरगिस मोहम्मदी?