मुंबई : विशेष प्रतिनिधी : भाजपाची हुकूमशाही व दहशत संपवण्यासाठी आणि महाराष्ट्राला स्वावलंबी बनवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी बरोबर एकत्र आहोत. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी महाराष्ट्र मोदी, शहा व अदानीचा होऊ देणार नाही, असा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिला. (Uddhav Thackeray)
बीकेसीच्या मैदानावर महाविकास आघाडीची जाहीर सभा झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उध्दव ठाकरे म्हणाले, ‘पराभव डोळ्यासमोर पराभव दिसत असल्याने देवेंद्र फडणवीस हे धर्मयुद्धाची भाषा करत आहेत. निवडणूक आयोगाला हा शब्द कसा चालतो?, या महाराष्ट्रात त्यांची किंमत २३ तारखेला दाखवून द्या. ही निवडणूक दोन आघाडी विरोधात नाही तर दोन प्रवृत्तीत होत आहे एकीकडे सर्वसामान्यांचा आयुष्यात अंधकार करून केवळ मूठभर दोस्तांना भले करणारे मोदी, शहा सरकार आहे. तर दुसरीकडे सर्वसामान्यांच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणारी महाविकास आघाडी आहे. गद्दार फोडून शिवसेना संपणार नाही जी पान पिकलेली होती ती निसर्ग नियमानुसार संपून गेली. राजकारणात भाजपाला मूल होत नाही त्यामुळे ते असे इतरांकडून घेतात, पूर्णपणे असे घेत असाल तर त्यांनी घ्यावे हा तुमचा प्रॉब्लेम आहे. ज्या सरदार वल्लभभाई पटेल यांनी आरएसएस वर बंदी घातली होती त्यांचा पुतळा मोदी यांना बनवावा लागला हा तुमच्यावर काळाने उगवलेला सूड आहे.
मोदी तुम्हाला निवडणुकीची वाट बघायची गरज नाही. तुम्ही तिथेच हारलेला आहात तुमच्याकडे कोणताही चेहरा नाही, बोलायला मुद्दा नाही. म्हणून ‘ बाटेंगे तो कटोगे, एक है तो सेफ है अशा घोषणा करत आहात मात्र बेरोजगार तरुण महिलांची सुरक्षा याबाबत काही उत्तर नाही. तिघे भाऊ सगळे मिळून खाऊ सूरू आहे. देवा भाऊ, जॅकेट भाऊ, दाढी भाऊ यांनी लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीसाठी ५०० कोटीहून अधिक रक्कम खर्च केली. तितक्या रकमेत एखादी दुसरी योजना पूर्ण झाली असती. भाजपाच्या हुकूमशाही व दहशतीमुळे राज्यात सगळीकडे अंधार पसरलेला आहे तो आपल्याला संपवायचा आहे. त्यासाठी महाविकास आघाडी म्हणून मी काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबर एकत्र आलो आहे. (Uddhav Thackeray)
आम्हाला आमचा महाराष्ट्र स्वावलंबी, सामर्थ्यवान पाहिजे आहे. मुंबईकर नेहमी शिवसेनेसोबत राहिला आहे. लोकसभेला गेल्या वेळेस सहापैकी एक जागा त्यांनी ढापली. देवेंद्र फडणवीस मतांचे धर्मयुद्ध करा म्हणत आहेत तर त्यांनी एकदा जाहीर करावी की या देशांमध्ये मुस्लिमांना मताचा अधिकार आहे की नाही. एका बाजूला मोहन भागवत जामा मशिदीत जातात. नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथ बरोबर जातात. मी विकासाच्या विरोधात नाही. मात्र महाराष्ट्राचा विनाश होऊ देणार नाही. मी कोणत्याही परिस्थितीत मोदी शाह किंवा अन्य कुणालाही लुटायला देणार नाही. मी शपथ घेतोय छत्रपती शिवाजी महाराज, शाहू ,फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र मोदी शहा अदाणीचा होऊ देणार नाही. व्यासपीठावर महानगरातील महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार ,वरिष्ठ नेते उपस्थित होते.