कोल्हापूर; प्रतिनिधी : मी अनेक वर्षे कोल्हापूर महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केले आहे. तुमच्या समस्यांची माहिती आहे. या समस्या निश्चितच सोडवू, आमदार झाल्यावर माझ्याकडून कोणत्याही घटकाला कसलाही त्रास होणार नाही, असे प्रतिपादन कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील इंडिया आघाडी व महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांनी केले. शहर भकास करून स्वतःचा आणि कुटुंबीयांचा विकास करणाऱ्या विरोधी उमेदवाराला पराभूत करू. कोल्हापूर शहरातील दहशतीचे वातावरण संपवूया, असे आवाहनही लाटकर यांनी केले.
लाटकर यांच्या प्रचारार्थ राजारामपुरी येथे ‘मिसळ पे चर्चा’ आयोजित करण्यात आली होती. माजी महापौर कांचन कवाळे, शिवाजीराव कवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही चर्चा आयोजित करण्यात आली.
लाटकर म्हणाले की, ‘महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना दरमहा तीन हजार रुपये, महिला सुरक्षितता, जातीनिहाय जनगणना, आरक्षणाच्या मर्यादेत वाढ, शेतकऱ्यांना सवलती अशा विविध योजना जाहिरनाम्यातून जाहीर केल्या आहेत. महाविकास आघाडीचा हा जाहीरनामा म्हणजे विकासाची पंचसूत्री आहे. महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी माझ्या प्रेशर कुकर या चिन्हासमोरचे बटन दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करा.’
माजी महापौर कांचनताई कवाळे म्हणाल्या, राजेश लाटकर यांच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला आमदारकीची उमेदवारी मिळाली हा लोकशाहीच्या दृष्टीने आणि कोल्हापूरसाठी शुभशकुन आहे. जनसामान्यांच्या सेवेत कायम कार्यरत असलेल्या या कार्यकर्त्याला आमदार करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्टा करावी. शिवाजीराव कवाळे यांनी, सर्वसामान्य मतदारांच्या आशीर्वादाने राजेश लाटकर नक्की विजय होतील अशी आशा व्यक्त केली.
यावेळी देवयानी कवाळे, राजश्री भोसले, अरविंद माने, शकुंतला दाभाडे, अंजना भंडारे, जयश्री चव्हाण, संजीवनी भंडारे, अलका कांबळे, मालन शिंदे, सारिका कवाळे, राणी कवाळे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.