शिराळा : प्रतिनिधी : पाच वर्षांत आमदार मानसिंगराव नाईकांनी २ हजार २७५ कोटींची विकासकामे केली. त्यामुळे खुद्द देशाच्या गृहमंत्र्यांना शिराळा मतदारसंघात सभा घ्यावी लागली, अशी टीका करून मानसिंगराव प्रचंड मोठ्या मताधिक्याने विजयी होणार हे स्पष्ट आहे, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
सागाव (ता. शिराळा) येथे महाविकास आघाडीचे उमेदवार आ. मानसिंगराव नाईक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, प्रचितीचे अध्यक्ष राजेंद्र नाईक, माजी सभापती सम्राटसिंग नाईक, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक, राजारामबापू दूध संघाचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील प्रमुख उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष म्हणाले, राज्यातील बहुतांशी मोठे प्रकल्प भाजप सरकारने गुजरातला स्थलांतरित केले आहेत. त्यामुळे राज्यातील तरुणांना मिळणारा रोजगार बुडाला आहे. उत्पन्नात महाराष्ट्रात घट होत आहे. हे सर्व रोखून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळण्यासाठी, तरुणांना रोजगार निर्मिती करण्यासाठी व अन्य प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महाविकास आघाडी सत्तेवर येणे गरजेचे आहे. लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धडा शिकवला आहे. तसाच तो विधानसभेला आपण मिळून शिकवायचा आहे.
आ. नाईक म्हणाले, मतदारसंघाची प्रगती साधण्यात कमी पडलो नाही. हजारो कोटींचा निधी आणून अनेक महत्त्वाची विकासकामे मार्गी लावली आहेत. तरीही विरोधकांना केलेली विकास दिसत नाहीत. विरोधकांच्या भ्रमाचा भोपळा त्यांच्या दारुण पराभवानंतर फुटणार आहे. यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक यांचेही भाषण झाले. उदय पाटील यांनी स्वागत केले. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बी. के. नायकवडी, आदींनी मनोगत व्यक्त केले.