Home » Blog » अमेरिकी लोकशाहीची लक्तरे

अमेरिकी लोकशाहीची लक्तरे

अमेरिकी लोकशाहीची लक्तरे

by प्रतिनिधी
0 comments
Donald Trump

-डॉ. मोहन द्रविड

२०१६ साल आलं आणि नवीन निवडणुकींची गिरण चालू झाली. ट्रंपची लफडी असतील या गोष्टीची सर्वांना खात्री होती, पण किती असतील याची अंधुकशीही कल्पना कुणाला नव्हती. त्यांतील काही भानगडी हळूहळू बिळाबाहेर यायला लागल्या. काही ट्रंप निवडणुकीपूर्वी, तर काही ऐन निवडणुकीच्या तोंडावर. त्या दबवायला नवीन भानगडी असं चक्र चालू झालं. खऱ्या खोट्याची सरसकट गफलत व्हायला लागली. या सर्वांवर कायद्याचा प्रकाश पडण्याऐवजी अंधारच पडायला लागला. यातील सर्व बारकावे ससंदर्भ समजण्यासाठी ट्रंप भानगडींचं तो राष्ट्राध्यक्ष होण्याआधीचे, तो राष्ट्राध्यक्ष असतानाचे, आणि नंतरचे असं विभाजन करणं इष्ट आहे… 

१९७२ सालची गोष्ट. तेव्हाचे अमेरिकन अध्यक्ष निक्सन यांचा होणाऱ्या निवडणुकीतील विजय शंभर टक्के नक्की असताना त्यांना अवदसा आठवली, आणि त्यांनी ‘वॉटरगेट’ नावाच्या इमारतीत असलेल्या विरुद्ध पक्षाच्या मुख्य कचेरीत कागदपत्रे पळवण्यासाठी हेर पाठवले. त्यांत क्यूबाचे अध्यक्ष कॅस्ट्रो यांची हत्या करण्याच्या कामी अमेरिकेने नेमलेले क्यूबन अमेरिकन होते. कॅस्ट्रो यांची हत्या करण्याचे २०० प्रयोग अयशस्वी झाले असल्याने वॉटरगेटच्या कामात ते कितपत यशस्वी होणार याबद्दल शंका होतीच. पूर्वेतिहासाप्रमाणे हे शूरवीर पोलिसांच्या तावडीत सापडले. काही महिन्यांनी निवडणूक झाली, निक्सन हे ५० पैकी ४९ राज्ये जिंकून विक्रमी विजयी झाले. 

कैदेतले क्यूबन पोपटासारखे बोलू लागले. दोन वर्षांत कटाचे धागे निक्सनसाहेबांपर्यंत पोचले. पुढची कारवाई होण्याच्या आधी शरमिंद्या अध्यक्षांनी राजीनामा दिला. त्या घटनेनंतर वॉटरगेट या शब्दाची इंग्रजी शब्दकोशात भरती झाली, एवढेच नाही तर गेट या प्रत्ययाचा भानगड अशा अर्थी जातिगत उपयोग होऊ लागला. काळ किती बदलला आहे बघा! निक्सन यांनी एवढ्या चटकन राजीनामा दिला म्हणून आज ट्रंप किंवा बायडन यांनी त्यांची टिंगलच केली असती. निक्सनवर पैशाच्या अफरातफरीचे आरोप नव्हते. बायकांशी लफडी नव्हती. पन्नास वर्षांपूर्वीचा काळ हा अतिपुरातन असा वाटावा, अशी आजची परिस्थिती आहे. त्या काळात अध्यक्ष हा घटस्फोटीतसुद्धा चालायचा नाही. १९८० साली निवडून आलेले रेगन हे पहिले घटस्फोटीत अध्यक्ष. हल्लीच्या काळातल्या ट्रंप यांचे दोन घटस्फोट आणि अगणित लफडी झाली आहेत.  

क्लिंटन यांचे प्रकरण

रेगन आणि ट्रंप हे दोघेही सनातनी म्हणून समजल्या जाणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष. याच पक्षाने नैतिकतेचा आव आणून अध्यक्ष क्लिंटन यांना त्यांच्या ऑफिसमधल्या मुलीबरोबर त्यांचं लफडं होतं, या नावाखाली काढायचा प्रयत्न केला आणि देशाची थोडथोडकी नाही पण चार वर्षं फुकट घालवली. पण क्लिंटन हेही नव्या मुशीतले, कंबरेचं सोडून डोक्याला गुंडाळणाऱ्या राजकारण्यांपैकी होते. संसदेत त्यांचा त्या मुलीबरोबरच्या संबंधांचा अतिशय तपशिलवार खल झाला, ऐकणाऱ्याला लाज वाटावी इतकी चर्चा झाली. तरी क्लिंटन यांच्यात ढिम्म चलबिचल झाली नाही. निर्लज्जपणाचं कवच असल्यावर आणखी काय पाहिजे?

ट्रम्प यांच्या भानगडी

२०१६ साल आलं आणि नवीन निवडणुकींची गिरण चालू झाली. ट्रंपची लफडी असतील या गोष्टीची सर्वांना खात्री होती, पण किती असतील याची अंधुकशीही कल्पना कुणाला नव्हती. त्यांतील काही भानगडी हळूहळू बिळाबाहेर यायला लागल्या. काही ट्रंप निवडणुकीपूर्वी, तर काही ऐन निवडणुकीच्या तोंडावर. त्या दबवायला नवीन भानगडी असं चक्र चालू झालं. खऱ्या खोट्याची सरसकट गफलत व्हायला लागली. या सर्वांवर कायद्याचा प्रकाश पडण्याऐवजी अंधारच पडायला लागला. यातील सर्व बारकावे ससंदर्भ समजण्यासाठी ट्रंप भानगडींचं तो राष्ट्राध्यक्ष होण्याआधीचे, तो राष्ट्राध्यक्ष असतानाचे, आणि नंतरचे असं विभाजन करणं इष्ट आहे. 

ट्रंप राष्ट्राध्यक्ष होण्याआधीच्या सध्या गाजत असलेल्या तीन मोठ्या भानगडी अशा: (१) २००६ सालाच्या आसपास ट्रंपचे स्टॉर्मी डॅन्यल्स आणि कॅरन मॅक्डूगल या दोन सुंदरींशी संबंध आले. २०१६ सालच्या निवडणुकीच्या हंगामात त्या मुलींना साहजिकच या गोष्टीचं भांडवल करायची स्फूर्ती आली. त्यातल्या मॅक्डूगलने आपले हक्क लोकांच्या भानगडींवर उदारनिर्वाह करणाऱ्या नॅशनल  इन्क्वायरर या साप्ताहिकाला दीड लाख डॉलरना विकले. असल्या भानगडी निपटायला ट्रंपने आपला मायकल कोन नावाचा एक खास वकील मित्र नेमला होता. त्याने भरपाई म्हणून ट्रंपच्या निवडणूक निधीतले पैसे काढून तिला दिले.

भानगडबाज ट्रंप

स्टॉर्मी डॅन्यल्सला गप्प करण्यासाठीसुद्धा (म्हणून hush money हा शब्दप्रयोग) तिला कोनतर्फे एक लाख तीस हजार डॉलर दिले. त्या पैशाची भरपाईसुद्धा निवडणूक निधीतूनच झाली. या दोन्ही कृत्यांबद्दल ट्रंप यांच्यावर न्यूयॉर्क राज्यातील न्यायसंस्थेने ३४ आरोप ठेवले आणि १२ जणांच्या ज्युरींनी नऊ तासांच्या चर्चेनंतर एकमताने सर्वच्या सर्व आरोप मान्य करून ट्रंपना गुन्हेगार म्हणून दोषी ठरवले. अमेरिकेतल्या आजी किंवा माजी राष्ट्राध्यक्षाला न्यायालयाने गुन्हेगार ठरवण्याची ही पहिलीच वेळ. अमेरिकेतले ज्यूरर सर्वसामान्य लोकांतून दोन्ही बाजूंच्या संमतीने निवडले जातात. त्यामुळे ट्रंपचं म्हणणं, हा खटला आणि निकाल डेमोक्रॅटिक पक्षाने घडवून आणला, ही नेहमीची अमेरिकन धाटणीतील अपप्रचाराची राळ कुणालाही पटण्यासारखी नाही. ट्रंपवरील प्रत्येक आरोपाला ४ वर्षांची शिक्षा आहे. न्यायाधीश ११ जुलैला शिक्षा सुनावणार होता. पण अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यात खो घातला आहे.       

(२)न्यूयॉर्कमधील घरबांधणीच्या व्यवहारात बँकेकडून कर्ज घेताना ट्रंपनी आपल्याकडील मालमत्तेची किंमत अव्वाच्या सव्वा फुगवून सांगितली, आणि कमी दरात कर्ज मिळवलं. त्यांच्यावर फसवणुकीचा आरोप आला आणि न्यूयॉर्क राज्य सरकारने खटला भरला. न्यायाधीशाने तो आरोप मान्य केला आणि ४५ कोटी डॉलरची  शिक्षा ठोठावली. ट्रंप त्यावर अपीलमध्ये गेले आहेत आणि तो खटला सप्टेंबर २०२४ मध्ये सुनावणीस येईल.    

(३) ई. जीन कॅरल या लेखिकेने ट्रंपने तिच्यावर १९९६ साली बलात्कार केल्याचा आरोप केला. असा आरोप एका विशिष्ट कालावधीतच करावा लागतो. पण योगायोगाने न्यूयॉर्क राज्याने उत्तरजीवी प्रौढ कायदा लागू केला होता. त्याप्रमाणे बलात्काराच्या घटनेला कितीही वर्षं झाली असली तरी २०२२ ते २०२३ या एका वर्षाच्या काळात जर तो दाखल केला, तर वेळेच्या बंधनाचा कायदा डोक्याआड करता येईल, अशी त्यात मुभा होती. त्याप्रमाणे तो खटला सुनावणीस येऊ शकला. ट्रंपचं म्हणणं न्यूयॉर्क राज्यानं केलेला नवा कायदाच मुळात घटनाबाह्य आहे. दुसरं म्हणणं असं की मी असल्या कुरूप बाईवर बलात्कार करणं शक्यच नाही. कॅरलने बदनामीचा खटलासुद्धा पहिल्या खटल्याला जोडला, आणि त्यातही ती यशस्वी ठरली. तिला एकूण १० कोटी डॉलरची नुकसान भरपाई मिळाली आहे. ट्रम्पवर लैंगिक अत्याचाराचे अजून २५ स्त्रियांचे आरोप आहेत. त्यात आश्चर्य काही नाही. निर्लज्जपणा  हा द्विपक्षीय अंगभूत गुणधर्म आहे. आश्चर्य एवढंच की सर्वसामान्य जनतेला यात काही गैर वाटत नाही.

राष्ट्राध्यक्ष असताना केलेल्या गुन्ह्याच्या आरोपांपैकी मुख्य म्हणजे त्यांनी गोपनीय कागदपत्र घरी नेले. आणि सरकारने मागणी करूनही ते कागदपत्र परत केले नाहीत. शेवटी पोलिसांना त्यांच्या घरावर धाड टाकून त्यांतील असंख्य कागद जप्त करावे लागले. ट्रम्प  यांचं म्हणणं हे की राष्ट्राध्यक्ष अशी कागदपत्रं घरी नेऊ शकतात. याउपर म्हणजे याबद्दल झालेल्या पोलीस चौकशीत ते अनेक वेळा खोटं बोलले आणि कोर्टाने पाठवलेले समन्स त्यांनी फेटाळून लावले, असे आणखी आरोप या प्रकरणी त्यांच्यावर आले आहेत.

डेमोक्रॅटिक चलाखी

राष्ट्राध्यक्ष म्हणून मुदत संपल्यानंतर केलेल्या दोन गुन्ह्यांचे स्वरूप आणि त्याच्यावरील आरोप असे: प्रथम, निवडणूक हरल्यानंतर समर्थकांना दंगा घडवून आणण्यासाठी त्याने लावलेली फूस. यावर संसदीय सुनावणी झाली. सुनावणीच्या समितीतील नऊ सभासदंपैकी सात डेमोक्रॅटिक पक्षाचे होते आणि दोन रिपब्लिकन पक्षातील पण ट्रंपविरोधी गटाचे होते. (अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष डिक चेनी यांची मुलगी त्यामधली एक. या सत्कार्याबद्दल तिच्या पक्षाने तिला निवडणुकीत पाडलं. तेव्हा डेमोक्रॅटिक पक्षाने तिला मोबदला म्हणून कोलंबिया या सुप्रसिद्ध विद्यापीठात ताबडतोब प्रोफेसरची नोकरी दिली. (ऐकावं ते नवल!) समितीने अमेरिकन सरकारविरुद्ध कट (हा देशद्रोह म्हणून धरला जातो), संसदीय कार्यात अडथळा, असत्य विधानं आणि सरकारविरुद्ध बंडाला फूस, अशा चार कलमांखाली ट्रंप यांच्यावर खटला भरायची सूचना केली. घटनेप्रमाणे यातील पहिल्या आरोपाला फाशीची शिक्षा आहे, तर बाकीच्या आरोपांना कमीत कमी २० वर्षांचा तुरुंगवास आहे. २०२३ च्या ऑगस्ट महिन्यात ट्रंपवर या आरोपांवरून खटला भरायचा निर्णय सरकारने घेतला. आपण (एके काळी) राष्ट्राध्यक्ष असल्याने आपल्याला सगळे फौजदारी गुन्हे माफ आहेत, अशी ट्रंपने भूमिका घेतली आहे. ट्रंप खटल्यांना शक्यतो विलंब लावण्याच्या मागे आहेत. त्यांची सगळी मदार येणाऱ्या निवडणुकीवर आहे. त्यात निवडून आलो तर सगळे खटले रद्द करता येतील, असा त्यांचा इरादा आहे.   

दुसरा गुन्हा हा की जॉर्जिया राज्यातील फुल्टन जिल्ह्यातील मतांमध्ये हेराफेरी करून बायडन यांना निवडून आणलं असा आरोप ट्रंप यांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर केला. (राज्याची राजधानी अॅटलँटा या जिल्ह्यात आहे.) त्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी तक्रार केली. त्यानंतर त्यांनी त्या राज्यातील डेमोक्रॅटिक पक्षाचे इलेक्टर्स फोडायचे उघडउघड प्रयत्न केले. (ते अयशस्वी ठरले.) ट्रंप आणि त्यांच्या अनेक साथीदार आणि वकील यांच्यावर खटला भरला गेला. ट्रंप सोडून बाकीचे बहुतेक माफीचे साक्षीदार झाले आहेत. म्हणजे त्यांनी गुन्हा मान्य केला एवढेच नव्हे तर गुन्ह्याविषयी अधिक माहिती पुरवली. 

ट्रंपना झाका, बायडनना उघड करा

रिपब्लिकन पक्ष हा कायदा व सुव्यवस्था यांचा जप करणारा पक्ष, आणि ट्रंप त्यांचा मेरुमणी. बारीकसारीक गुन्ह्यांबद्दलसुद्धा निग्रो तरुणांना कसलाही विचार न करता तुरुंगात डांबून टाका, असं प्रतिपादन करणारा हा स्पष्टवक्ता पक्ष आणि त्यांचा नेता. याउलट, डेमोक्रॅटिक पक्षाला जगातील सुव्यवस्थेची काळजी. ती आपल्या मनासारखी व्हावी म्हणून लोकशाहीच्या नावाखाली वाटेल तेवढ्या दंगली घडवून आणायची तयारी! सांप्रतचे अध्यक्ष बायडन हे त्या पक्षाचे. २००८ ते २०१६ काळात ते उपाध्यक्ष होते आणि २०२०च्या अध्यक्षीय निवडणुकीतील ट्रंप यांचे प्रतिस्पर्धी होते. २०१४ साली त्यांनी युक्रेनच्या निवडून आलेल्या अध्यक्षांविरुद्ध बंड घडवून आणले आणि नवीन सरकारचं पालनपोषण करण्यात आतापर्यंत माहीत असलेल्या हिशेबानुसार त्यांनी देशाचे एक हजार अब्ज डॉलर खर्च केले आहेत. त्यातील काही धन परत येऊन त्यांच्या खिशात पडलं आहे, असं त्यांच्या बेजबाबदार मुलाच्या बेजबाबदार विधानांवरून कळतं. बायडन यांची वैयक्तिक संपत्ती कित्येक कोटी डॉलर्स आहे. ती सर्व काही त्यांच्या पगारातून आलेली नाही. त्यांनीसुद्धा अमेरिकेचे उपाध्यक्ष असताना सरकारी गोपनीय कागद घरी नेली होती. ती त्यांच्या गॅरेजमध्ये इतस्तत: पडलेल्या अवस्थेत सापडली. अर्थातच ती चौकशी दाबली गेली. मुलगा व्यसनी, विषयांध असा आहे आणि परवान्याशिवाय बंदूक   बाळगतो. हा शेवटचा आरोप त्यातल्या त्यात सौम्य. तेव्हा मुलावर फक्त त्याच एका आरोपावरून खटला भरला आहे, आणि तो चालूच आहे. ट्रंपसाहेब जर निवडून आले तर बायडन पिता-पुत्रांची खैर नाही. चार वर्षं तो तमाशा चालेल आणि मग पुढची निवडणूक येईल.

सर्वोच्च खुमखुमी आणि ट्रंपची सौदेबाजी

हे सगळं नाटक चालू असताना अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाला त्यात भाग घ्यायची लहर आली. सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची संख्या इतिहासकाळात बदलली असली तरी गेली अनेक दशके नऊ आहे. घटनेप्रमाणे राष्ट्राध्यक्ष न्यायाधीशाची नेमणूक करतो आणि सेनेट ती बहुमताने मंजूर करतं. राष्ट्राध्यक्ष आणि सिनेट एकाच पक्षाचे असतील तर त्या पक्षाची चांदी होते. नेमलेला न्यायाधीश हा त्या पक्षाचा असतो आणि त्याचे निर्णय त्याला नेमणाऱ्या पक्षाला अनुरूप असेच असतात. ट्रंप राष्ट्राध्यक्ष असताना अशी संधी त्यांच्याकडे चालून आली. आजच्या कोर्टात तीन डेमोक्रॅट आणि सहा रिपब्लिकन आहेत. त्यांतले तीन ट्रंपनी नेमलेले आहेत. त्यांनी आल्या आल्या गर्भपातासंदर्भात असलेले आणि तत्सम पूर्वी प्रस्थापित झालेले कायदे बदलले. आतापर्यंत तरी बालमजुरीविरुद्ध १९३० साली केलेला कायदा त्यांनी बदललेला नाही. पण रिपब्लिकन पक्षाच्या अनेक नेत्यांनी त्याविषयी आपली नाराजी व्यक्त केली आहे. तेव्हा तो कायदा केव्हाही समाजवादविरोध या सबबीखाली सुप्रीम कोर्टासमोर आणला जाईल आणि उलथला जाईल.

न्यायाधीशाची मुदत तो मरेपर्यंत असते. गैरवर्तणुकीबद्दल त्याला काढता येते, पण त्याला काढायची पद्धत इतकी लंबीचौडी आहे की न्यायाधीशाला नोकरीवरून काढणं जवळजवळ अशक्यच आहे, आणि आतापर्यंत ते केव्हाही साधलेलं नाही. रिपब्लिकन पक्षाच्या एकमेव निग्रो न्यायाधीशावर असंख्य गैरव्यवहाराचे आरोप झाले. पण तो निर्लज्जासारखा खुर्चीला चिकटून बसला. तर अशा या कोर्टाने सांप्रत किंवा माजी राष्ट्राध्यक्षावर खटला भरता येणार नाही असा निकाल दिला आहे. 

हे सगळं लक्षात घेता ट्रंपसाहेबांनी २०२४ मधल्या निवडणुकीत कोणतीही गोष्ट दैवयोगावर न सोडायचा निर्णय घेतला आहे. त्यांनी नुकतीच एक्सॉन, मोबाइल, शेव्रॉन, ऑक्सिडेंटल पेट्रोलियम यासारख्या तेल आणि वायू कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची भेट घेतल्याची बातमी आहे. त्यात ट्रंपसाहेबांनी त्यांच्याकडे निवडणुकीसाठी उघडउघड एक अब्ज डॉलरची मागणी केली. त्याच्या बदली निवडून आलो तर पर्यावरणाचे सर्व नियम आणि कायदे धाब्यावर बसवायचं आश्वासन त्यांना दिलं आहे. असा उघडउघड राजकीय सौदा करण्याची ही पहिली वेळ. ट्रंपसाहेबांच्या नावावर असे विक्रम भरपूर आहेत. त्यात आणखी एक.

प्रसिद्ध अमेरिकन क्रांतिकारक टॉम पेन यांनी म्हटले आहे की, “राजेशाहीमध्ये राजा हा कायदा असतो, लोकशाहीमध्ये कायदा हा राजा असतो.” सध्याच्या बेबंदशाहीत कायदा सत्ताधाऱ्यांची बटीक झाली आहे. 

(डॉ. द्रविड यांचे राजकारण, विज्ञान, इतिहास या विषयांवरील लिखाण वेगवेगळ्या मासिकांतून प्रसिद्ध होते. त्यांचे वास्तव्य अमेरिकेत असून त्यांचे ‘मुक्काम पोस्ट अमेरिका’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00