Home » Blog » शाहू महाराजांशी चर्चा करून ‘उत्तर’चा निर्णय

शाहू महाराजांशी चर्चा करून ‘उत्तर’चा निर्णय

सतेज पाटील : सोमवारच्या घटनेवर पडदा

by प्रतिनिधी
0 comments
MVA

कोल्हापूर; प्रतिनिधी : ‘कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांची माघार आणि त्यानंतर झालेल्या घटनांवर मी पडदा टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जे घडले ते विसरून पुढे कसे जायचे हे ठरवायचे आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत खासदार शाहू छत्रपती यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि सर्वांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे,’ असे विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी मंगळवारी स्पष्ट केले. इंडिया आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, ‘सोमवारी झालेल्या घटनेबद्दल कुणावरही टीका-टिपणी करणार नाही. आम्ही सगळे एकत्र बसून निर्णय घेणार आहोत. खासदार शाहू छत्रपती यांच्याबद्दल नितांत आदर आहे. यापूर्वी आणि यानंतरही कोल्हापूरच्या गादीचा मानसन्मान ठेवणार आहोत.’ जिल्ह्यात बंडखोरी रोखण्यात कमी-अधिक प्रमाणात यश आले आहे. कोल्हापूर उत्तर, शिरोळ या मतदारसंघांत वंचित बहुजन आघाडीने माघार घेतली आहे. चंदगडमध्ये थोडेफार यश आले. पुढचे पंधरा दिवस महत्त्वाचे आहेत.

सर्वांशी चर्चा करून पुढची वाटचाल करण्यात येईल, असे आ. पाटील म्हणाले. लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने ताकदीने इंडिया आघाडी उतरली होती, त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडी पूर्ण ताकदीने एकत्रित लढण्याचा निर्धार इंडिया आघाडीच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीला आमदार जयंत आसगावकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, शिवसेनेचे विजय देवणे, प्राचार्य टी. एस. पाटील, शेकापचे बाबासाहेब देवकर, माकपचे चंद्रकांत यादव, जनता दलाचे वसंतराव पाटील, शिवाजीराव परुळेकर, दगडू भास्कर, सुभाष जाधव, बबनराव रानगे, आदी उपस्थित होते.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00