इस्लामाबाद; वृत्तसंस्था : सीमापार दहशतवादी कारवाया आणि फुटीरतावादामुळे दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय व्यापार आणि संबंध सुधारण्यात अडथळा ठरत आहे, अशा शब्दांत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आज (दि.१६) पाकिस्तानचा समाचार घेतला. इस्लामाबाद येथे आयोजित ‘शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन’ (एससीओ) शिखर परिषदेत ते बोलत होते. दशकभरानंतर भारतीय परराष्ट्रमंत्र्यांचा हा पहिलाच पाकिस्तान दौरा होता. या वेळी जयशंकर यांनी पाकिस्तान आणि चीनचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. (S. Jaishankar)
दरम्यान, जयशंकर यांचे भाषण सुरू असतानाच पाकिस्तानच्या दूरचित्रवाणीने शिखर परिषदेचे थेट प्रक्षेपण बंद केले. विकास आणि वाढीसाठी शांतता आणि स्थैर्य आवश्यक आहे. सध्याच्या काळात दहशतवाद आणि अतिरेक्यांशी मुकाबला करणे अधिक महत्त्वाचे आहे. ‘एससीओ’मधील सहकार्य, परस्पर आदर आणि सार्वभौम समानतेवर आधारित असले पाहिजे. प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्व ओळखले पाहिजे. ती खऱ्या भागीदारीवर बांधली गेली पाहिजे आणि एकतर्फी अजेंडांवर नाही, असेही जयशंकर यांनी सुनावले.
परस्पर विश्वास, मैत्री आणि चांगले शेजारी संबंध दृढ करणे हा ‘एससीओ’चा मुख्य उद्देश आहे. विविध क्षेत्रात विशेषतः प्रादेशिक स्तरावर सहकार्य वाढवणे. समतोल विकासाला चालना देणे आणि संघर्ष टाळण्यासाठी सकारात्मक शक्ती निर्माण करणे हे त्याचे ध्येय आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
आत्मपरीक्षणही केले पाहिजे
प्रामाणिकपणे संवाद साधणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. विश्वासाचा अभाव असेल, पुरेसे सहकार्य नसेल किंवा मैत्री कमकुवत असेल किंवा चांगले शेजारी संबंध कुठेतरी लोप पावले असतील, तर आपण स्पष्टपणे आत्मपरीक्षण करून या समस्यांवर उपाय शोधण्याची गरज आहे, असा सल्ला जयशंकर यांनी पाकिस्तानला दिला. (S. Jaishankar)
हेही वाचा :
- बंगळुरू कसोटीत वरूण राजाची दमदार फलंदाजी
- बिग बॉस फेम धनंजयला (डीपी) भेटायला आली परदेसी गर्ल
- ओमर अब्दुल्ला यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ