मुंबई : प्रतिनिधी : अनियमित पावसाच्या वेळा आणि ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पावसाने माडलेली दडी यामुळे राज्यात दुष्काळ पडला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळाच्या उपाययोजनांचे त्यांनी आदेशही दिले आहे. राज्यात ७५ टक्के भागात दुष्काळ पडल्याचे चित्र समोर आले आहे. (Drought declared in 265 talukas of the state)
संभाजीनगर, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर विभागात पावसाची तूट
राज्यात दोन महिन्याहून अधिक काळ बहुतांशी भागात पाऊस पडलेला नाही. काही ठिकाणी अनियमित स्वरुपाचा पाऊस सुरू असला तरी त्याचा फटका पीकांना बसला आहे. जुलै महिन्यात अतिप्रमाणात पाऊस पडल्याने अनेक धरणे भरली आहेत पण मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात पाऊस न पडल्याने पीकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, अमरावती आणि नागपूर या विभागात पावसाची मोठी तूट नोंदवली आहे. भात, कडधान्ये, सोयाबीन, कापूस, भुईमुग, नाचणी या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना ताबडतोब मदत करावी, अशी मागणी शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
विरोधी पक्ष थेट बांधावर
विरोधी पक्षातील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, शशिकांत शिंदे यांच्यास विरोधी पक्षातील आमदार, खासदारांनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. त्यांनी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केल्याने सरकारवर दबाव वाढला. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह, अनेक मंत्री आणि आमदारांनी दुष्काळग्रस्त भागात भेट देऊन शेतकऱ्यांची संवाद साधला. (Drought declared in 265 talukas of the state)
विरोधी पक्षांकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
केंद्र सरकारची वाट न पाहता राज्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विरोधी पक्षाने केली होती. तसेच तातडीने शेतकऱ्याच्या बँक खात्यात मदत जमा करावी अशी मागणी केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी यासंदर्भात सरकारच्या घोषणा केली जाईल असे सांगितले होते. त्यानुसार आज राज्य सरकारने राज्यातील ३५८ तालुक्यापैकी २६५ तालुक्यात अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केला.
दुष्काळ निवारण्यासाठी सरकारचे आदेश
सरकारने दुष्काळ निवारण्यासाठी मदत आणि उपायोजनाचे आदेशही दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी २४ तास वॉर रुम स्थापन कराव्यात असे आदेश दिले आहेत. पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी टँकर सुरू करावेत, वीज बिलात सवलत आणि विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचे आदेश दिले आहेत. (Drought declared in 265 talukas of the state)