जमीर काझी : मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्ध चित्रपट परंपरेचा गौरव करणारा ६२ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा बुधवारी (दि.९) सायंकाळी ६ वाजता प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिर येथे होणार आहे. या सोहळ्यात चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव तर ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. (Lifetime Achievement Awards for Hridaynath Mangeshkar and Salim Khan)
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात येईल. यावेळी अभिनेते-दिग्दर्शक प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार, ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार, तर अभिनेत्री राणी मुखर्जी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थितीत तर महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची विशेष उपस्थिती या सोहळ्यास लाभणार आहे. (Lifetime Achievement Awards for Hridaynath Mangeshkar and Salim Khan)
महाराष्ट्राच्या चित्रपटसृष्टीतील कलावंत, तंत्रज्ञ आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याला यंदा विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गेली ६१ वर्षांहून अधिक काळ सातत्याने मराठी चित्रपटकर्मींच्या कलात्मक योगदानाचा गौरव करणारा हा पुरस्कार सोहळा एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. या पुरस्कार सोहळ्याची जय्यत तयारी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
पुरस्कारातून कलाकारांना प्रेरणा
राज्याच्या समृद्ध चित्रपट आणि सांस्कृतिक परंपरेला आकार देणाऱ्या दिग्गजांच्या योगदानाचे स्मरण करत, नव्या पिढीतील कलाकारांना प्रेरणा देण्याचे काम या पुरस्कारांच्या माध्यमातून केले जाते. या सोहळ्यात यशस्वी संयोजनासाठी सं आवश्यक तयारी करण्यात येत आहे.,
– स्वाती म्हसे-पाटील (व्यवस्थापकीय संचालक,
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ)
(Lifetime Achievement Awards for Hridaynath Mangeshkar and Salim Khan)