Home » Blog » कमकुवत पंतप्रधानामुळेच पेपरफुटी : उदय भानू चिब

कमकुवत पंतप्रधानामुळेच पेपरफुटी : उदय भानू चिब

by प्रतिनिधी
0 comments
Congress holds protest march in Mumbai against paper leaks

जमीर काझी : मुंबई :  नीट आणि सीबीएसई  परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि घोटाळ्यांच्या निषेधार्थ तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने मंगळवारी दादर येथे  “युवा आक्रोश मोर्चा” काढण्यात आला. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी आयोजिलेल्या  मोर्चाचे नेतृत्व युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांनी केले. आंदोलनादरम्यान विद्यार्थी आणि युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात  घोषणाबाजी केली. “पेपरफुटी बंद करा”, “विद्यार्थ्यांना न्याय द्या”, “धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या” या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. (Congress holds protest march in Mumbai against paper leaks)

 चैत्यभूमी, दादर येथून शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आलेला हा मोर्चा पोलिसांनी अडवला आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या मोर्चात  माजी मंत्री नसीम खान, आमदार भाई जगताप, सचिन सावंत यांच्यासह शेकडो विद्यार्थी, युवक आणि काँग्रेस कार्यकर्ते सहभागी  होते. (Congress holds protest march in Mumbai against paper leaks)

यावेळी  उदय भानू चिब यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य आज धोक्यात आले असून परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे. वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांच्या अपेक्षा धुळीस मिळत आहेत. केंद्र सरकार या गंभीर प्रश्नावर अपयशी ठरले असून पंतप्रधान कमकुवत असल्यानेच देशभरात पेपरफुटीचे रॅकेट फोफावत आहेत. शिक्षण व्यवस्थेतील या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

आमदार भाई जगताप सरकारवर टीका करताना म्हणाले की, एकीकडे सरकार युवकांना मोठमोठी स्वप्ने दाखवत आहे, तर दुसरीकडे त्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या घोटाळ्यांवर कारवाई करण्यात अपयशी ठरत आहे.   सचिन सावंत म्हणाले की देशातील परीक्षा व्यवस्था ही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आधारित असली पाहिजे. मात्र आज पैशांच्या आणि गैरव्यवहारांच्या जोरावर काही जण विद्यार्थ्यांचे भविष्य हिरावून घेत आहेत.  विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करून परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणावी, अशी मागणी करून मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन म्हणाल्या की, देशातील विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आणि पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे. (Congress holds protest march in Mumbai against paper leaks)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00