Home » Blog » युनेस्को पथकाकडून पन्हाळा किल्ल्याची पाहणी

युनेस्को पथकाकडून पन्हाळा किल्ल्याची पाहणी

UNESCO : युनेस्को पथकाकडून पन्हाळा किल्ल्याची पाहणी

by प्रतिनिधी
0 comments
Panhala

कोल्हापूर; प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पुनीत झालेल्या किल्ले पन्हाळागडाची युनिस्कोच्या शिष्टमंडळाने आज शनिवारी पाहणी केली. जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेशासाठी नामांकनाच्या मुल्यांकन प्रक्रियेचा एक भाग म्हणून युनेस्कोच्या शिष्टमंडळाने पन्हाळा किल्ल्याला भेट दिली. (UNESCO)

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय), महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग, वन विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्या अधिकाऱ्यांसह युनेस्कोच्या पथकाने किल्ल्याची सखोल पाहणी केली. या पथकाने धर्मकोठी, सज्जाकोठी, अंबरखाना, तीन दरवाजा या महत्त्वपूर्ण ठिकाणांसह विविध ऐतिहासिक खुणांना भेट दिल्या. या पथकाने किल्ल्याचा इतिहास आणि सद्यस्थितीबद्दल उपस्थित अधिकाऱ्यांकडून तपशीलवार माहिती घेतली. या पथकामध्ये आंतरराष्ट्रीय तज्ञ हेवान्ग ली, अतिरीक्त महानिर्देशक जागतिक वारसा (एएसआय) जानवीश शर्मा, महाराष्ट्र शासन पुरातत्व विभाग संचालक सुजित उगले, उपसंचालक हेमंत दळवी, सहायक संचालक डॉ.विलास वाहणे, डॉ.शुभा मजुमदार यांचा समावेश होता.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सोबत झालेल्या चर्चे दरम्यान त्यांनी किल्ल्यातील हवामान, वनस्पती आणि इतर संबंधित पर्यावरणीय घटकांवर चर्चा केली. तसेच या किल्ल्याच्या संवर्धनासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने घेतलेले निर्णय, सुरु असलेली कार्यवाही तसेच पर्यटन विकासासाठी केलेल्या उपाययोजना याबाबत माहिती दिली. यावेळी स्थानिक नागरिकांनी पन्हाळा संवर्धनासाठी स्वच्छता व प्रशासनाने दिलेल्या सूचनांबाबत सहाय्य केले असून यापुढेही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

युनेस्कोने नामांकनाच्या यादीमध्ये पन्हाळा किल्ल्याचे नाव समाविष्ट केल्याबद्दल जिल्हाधिकारी येडगे यांनी आभार व्यक्त केले. तसेच गडाच्या जतनामध्ये एकूणच प्रशासन, स्थानिक नागरिकांचा असलेला सहभाग याविषयी माहिती दिली. यावेळी पथकातील मान्यवरांनी पन्हाळा किल्ल्याविषयक केलेल्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले. भेटीदरम्यान, शिष्टमंडळाने स्थानिक प्रतिनिधी आणि गावकऱ्यांशी देखील संवाद साधला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पन्हाळा- शाहूवाडी उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली मडकर, मुख्याधिकारी चेतन माळी आदींनी चर्चेत सहभाग घेतला. पन्हाळा किल्ला पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांशी, स्थानिक नागरिकांशीही या पथकाने संवाद साधला.

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00