प्रियदर्शन
गांधीजींना मारणाऱ्या गोडसेचे कितीही पुतळे उभारा, ते गोडसेच्या पुतळ्यामध्ये प्राण नाही भरू शकत. गांधीजींवर त्यांनी कितीही गोळ्या झाडल्या तरी गांधींचा श्वास आजही सुरू आहे…
एनसीईआरटीचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळलेले प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ कृष्णकुमार यांनी ‘शांती का समर’ या पुस्तकात एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे – राजघाट हे आपल्यासाठी गांधीजींच्या स्मृतींचं राष्ट्रीय प्रतीक का आहे? जिथं गांधीजींनी अखेरचे दिवस व्यतीत केले आणि जिथं एका माथेफिरुनं गोळ्या झाडून त्यांचा खून केला, ते बिर्ला भवन का नाही ? बाहेरच्या देशातून कुणी आलं तर त्याला राजघाट दर्शनासाठी का नेलं जातं ? बिर्ला भवनमध्ये का नाही?
कृष्णकुमार या प्रश्नाचं उत्तरही शोधतात. त्यांच्यामते आधुनिक भारतात राजघाट शांततेचं असं प्रतीक आहे, जे भूतकाळातल्या कोणत्याही हिंसक कृतीची आठवण करून देत नाही. बिर्ला भवन मात्र स्वातंत्र्यलढ्याच्या त्या इतिहासाशी डोळे भिडवायला मजबूर करतं, ज्यामध्ये गांधीजींच्या हत्येचाही समावेश आहे – हा प्रश्नही त्यात आहे की गांधीजींची हत्या का झाली?
गांधीजींची हत्या अशासाठी झाली की, धर्माचं नाव घेणारी सांप्रदायिकता त्यांना घाबरत होती. भारत मातेची मूर्ती तयार करणारी, राष्ट्रवादाचे धार्मिक ओळखीच्या आधारे तुकडे करणारी विचारधारा त्यांच्यामुळं बेचैन होती. गांधीजी धर्माच्या कर्मकांडाला फाटा देऊन त्याचं मर्म शोधत होते. धर्म, मर्म आणि राजकारणही साध्य होईल आणि एक नवा देश, नवा समाज घडेल अशा प्रकारे मांडणी करीत होते.
गांधीजी आपल्या धार्मिकतेबाबत नेहमीच निर्मळ आणि हिंदुत्वाबाबत स्पष्ट राहिले. राम आणि गीतेसारख्या प्रतिकांना त्यांनी जातीयवादी शक्तींच्या विळख्यापासून दूर ठेवलं, त्यांना नवे, मानवी अर्थ दिले. त्यांचा परमेश्वर स्पृश्यास्पृश्यतेवर विश्वास ठेवत नव्हता, उलट तसा विश्वास ठेवणाऱ्यांना शिक्षा करत होता. त्यांच्या अशा या धार्मिकतेपुढं धर्माच्या नावावर चालणारी आणि देशाच्या नावावर दंगली करणारी सांप्रदायिकता हतबल बनत होती, गुदमरुन जात होती. गोडसे या घुस्मटीचं प्रतीक होता, ज्यानं धर्मनिरपेक्ष नेहरू किंवा जातीयवादी जिना यांना नाही, तर धार्मिक वृत्तीच्या गांधीजींना गोळी घातली.
परंतु मृत्यूनंतरही गांधीजी मेले नाहीत. सर्वसाधारणपणे हे एक गुळगुळीत झालेलं वाक्य आहे, जे कशाच्याही समर्थनार्थ बोललं जाऊ शकतं. परंतु काळजीपूर्वक पाहिलं तर आजचं जग गांधीजींपासून सर्वाधिक तत्त्वं ग्रहण करतं. ते जितके पारंपरिक होते, त्याहून अधिक उत्तर आधुनिक असल्याचं सिद्ध होत आहे. ते आमच्या काळातील तर्कवाद विरुद्ध श्रद्धेचा आवाज घडवतात. आमच्या काळातले सर्वात महत्त्वाचे मुद्दे त्यांच्या विचारधारेच्या कुशीतूनच निपजतात. मानवाधिकाराचा मुद्दा असो, सांस्कृतिक बहुलतेचा प्रश्न असो किंवा पर्यावरणाचा – हे सगळे गांधीजींच्या चरख्याशी, त्यांनीच कातलेल्या सुताने बांधल्यासारखे आहेत.
चंगळवादाच्या विरोधात गांधीजी एक वाक्य तयार करतात – ‘ही धरती सगळ्यांच्या गरजा पूर्ण करू शकते, परंतु एका माणसाच्या लालसेपुढं छोटी आहे.’ जागतिकीकरणाच्या विरोधात ग्रामस्वराज्याची त्यांची संकल्पना तिच्या मर्यादा गृहित धरूनही एकमेव राजकीय-आर्थिक पर्याय वाटते. बाजारातल्या डोळे दिपवणाऱ्या झगमगाटापुढं ते माणुसकीची तेवणारी ज्योत आहेत, ज्यात आपण आपली साधेपणाची मूल्यं ओळखू शकतो.
गांधीजींना मारणाऱ्या गोडसेंचे कितीही पुतळे उभे केले, तरी ते गोडसेमध्ये प्राण नाही भरू शकत. गांधीजींना त्यांनी कितीही गोळ्या घातल्या तरी गांधीजी आजही हलतात-डुलतात, श्वास घेतात, त्यांच्या खट खट करणाऱ्या खडावा आपल्याला रस्ता दाखवतात.
(प्रियदर्शन हे एनडीटीव्ही इंडियाचे कार्यकारी संपादक आहेत.)