अॅडलेड (ऑस्ट्रेलिया) : अॅडलेडमधील चरणप्रीत सिंग या २३ वर्षीय भारतीय विद्यार्थ्यावर क्रूरपणे हल्ला करण्यात आला. त्याला बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली. कार पार्किंगच्या वादातून काही तरूणांनी वर्णद्वेषी शिवीगाळ करत त्याच्यावर हल्ला केला. (Indian student assaulted)
९ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, श्री. सिंग याला उद्देशून ‘‘इंडियन, इंडियन,’’ असे कथितपणे ओरडत त्याला बेदम मारहाण करण्यात आला. त्याला तशाच अवस्थेत रस्त्याच्या कडेला सोडून देण्यात आले. ही घटना शनिवारी (१९ जुलै) रात्री शहराच्या मध्यभागी असलेल्या किंटोर अव्हेन्यूजवळ घडली. (Indian student assaulted)
श्री. सिंग गाडीत बसला होता. त्यावेळी काही तरुण त्याच्याकडे आले. त्यांनी वंशावरून शिवीगाळ केली. सिंगने कसलेही प्रत्युत्तर दिलेले नसतानाही त्याच्यावर हल्ला करण्यात आला.
‘‘मी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली,’’ असे सिंगने सांगितले.
या मारहाणीत त्याच्या मेंदूला दुखापत झाली आहे. तसेच चेहऱ्यावर अनेक फ्रॅक्चर झाले आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करून रात्रभर वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले. (Indian student assaulted)
या प्रकरणी दक्षिण ऑस्ट्रेलिया पोलिसांनी रविवारी (२० जुलै) एनफिल्ड येथून एका २० वर्षीय तरुणाला अटक केली आहे. त्याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. तथापि, उर्वरित हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले आणि त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी जनतेची मदत मागितली आहे.
या हल्ल्यामुळे अॅडलेडमधील भारतीय समुदायात संतापाची लाट उसळली आहे. ऑस्ट्रेलियातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि स्थलांतरितांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
श्री. सिंग याला ऑनलाइन पाठिंबा मिळत आहे. अनेकांनी वांशिक हिंसाचारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या हल्ल्याने त्यांना खूप हादरवून टाकले आहे, असे सिंग याने रुग्णालयात बोलताना सांगितले.
‘‘”अशा गोष्टी घडतात तेव्हा तुम्हाला परत जावे असे वाटते. तुम्ही तुमच्या शरीरात काहीही बदलू शकता, पण रंग बदलू शकत नाही,’’ असे तो म्हणाला. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत.