Home » Blog » Abhishek Nayar : अभिषेक नायर यांना डच्चू

Abhishek Nayar : अभिषेक नायर यांना डच्चू

बीसीसीआयने केला सहायक प्रशिक्षकपदाचा करार रद्द, टी. दिलीपही बाहेर

by प्रतिनिधी
0 comments
Abhishek Nayar

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे सहायक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्यासोबतचा करार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रद्द केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या मागील काही महिन्यांतील निराशाजनक कामगिरीमुळे नायर यांना डच्चू देण्यात आल्याचे बोलले जात आहे. भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांनाही डच्चू देण्यात आला आहे.  (Abhishek Nayar)

मागील वर्षी जुलैमध्ये गौतम गंभीर संघाचे मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर नायर यांची सहायक प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर, भारताला मायदेशात न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ०-३ असा, तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत १-३ असा पराभव पत्करावा लागला. या दोन पराभवांमुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्याचे भारताचे स्वप्न भंगले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर मुंबईमध्ये बीसीसीआयतर्फे आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीस गंभीर, कर्णधार रोहित शर्मा, निवड समितीप्रमुख अजित आगरकर आणि बीसीसीआयचे सचिव देवाजित सैकिया उपस्थित होते. (Abhishek Nayar)

विशेष म्हणजे गंभीर यांनी स्वत: नायर यांची सहायक म्हणून निवड केली होती. गंभीर आणि नायर यांनी यापूर्वी, आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्सच्या प्रशिक्षकवर्गामध्ये एकत्र काम केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोलकात्याने २०२४ च्या आयपीएल मोसमाचे विजेतेपदही पटकावले होते. नायर यांनी काही खेळाडूंसोबत वैयक्तिक प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. यांमध्ये, दिनेश कार्तिक श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, आंग्क्रिश रघुवंशी आदी खेळाडूंचा समावेश आहे. अलीकडेच लोकेश राहुलने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याला गवसलेल्या फॉर्मचे श्रेय नायर यांना दिले होते. बीसीसीआयने जानेवारीमध्ये सितांशू कोटक यांना सहायक प्रशिक्षकपदी नियुक्त केल्यानंतरच नायर यांच्या गच्छंतीविषयी चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर आता बीसीसीआयने त्यांच्यासोबतचा करार रद्द केला. दरम्यान, दिलीप यांच्या गच्छंतीनंतर भारताच्या आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी सहायक प्रशिक्षक रायन डॉएश्ट यांच्याकडे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणूनही कार्यभार सोपवण्यात आला आहे. (Abhishek Nayar)

ॲड्रियन ले रॉक्स भारतीय संघाचे नवे ट्रेनर
भारतीय पुरुषक्रिकेट संघाचे नवे ट्रेनर म्हणून ॲड्रियन ले रॉक्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ले रॉक्स यांनी यापूर्वी २००० च्या दशकामध्ये भारतीय संघासोबत ट्रेनर म्हणून काम केले होते. सध्या ते आयपीएलमधील पंजाब किंग्ज संघासोबत काम करत आहेत. भारतीय संघाचे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच सोहम देसाई यांच्याजागी ले रॉक्स यांनी नियुक्ती करण्यात येणार आहे. देसाई २०१९ पासून भारतीय संघासोबत होते.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00