नागपूर : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यामध्ये यशस्वी जैस्वाल मुंबई संघाकडून खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यशस्वीच्या पायाच्या घोट्याला दुखापत झाल्यामुळे त्याला उपांत्य सामन्यासाठी विश्रांती देण्याचा निर्णय मुंबई संघाने घेतला आहे. (Yashasvi Jaiswal)
रणजी स्पर्धेमध्ये मुंबई आणि विदर्भ यांच्यातील उपांत्य लढतीस नागपूरमधील व्हीसीए स्टेडियमवर सोमवारपासून सुरुवात होणार आहे. या सामन्याकरिता रविवारी मुंबईचा संघ जाहीर करण्यात आला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघामध्ये सूर्यकुमार यादव, शिवम दुबे या भारतीय संघातील खेळाडूंना कायम ठेवण्यात आले आहे. हरियाणाविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात सूर्यकुमारने ७०, तर शिवमने ४८ धावांची खेळी केली होती. यशस्वीऐवजी मुंबईने अन्य कोणत्याही खेळाडूचा संघात समावेश केलेला नाही. त्यामुळे, उपांत्यपूर्व फेरीप्रमाणेच आयुष म्हात्रे आणि आकाश आनंद हे मुंबईचे सलामीवीर असतील. (Yashasvi Jaiswal)
यशस्वीने या महिन्याच्या सुरुवातीस इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी निवडलेल्या प्राथमिक संघामध्येही त्याचा समावेश होता. परंतु, ऐनवेळी त्याला राखीव खेळाडूंमध्ये स्थान देऊन त्याच्याजागी वरुण चक्रवर्तीला अंतिम संघात निवडण्यात आले. आता दुखापतीमुळे यशस्वी नागपूरहून पुन्हा मुंबईला परतणार आहे. रणजी स्पर्धेच्या मागील मोसमात मुंबई आणि विदर्भ हे संघ अंतिम फेरीत आमनेसामने आले होते. त्यावेळी, मुंबईने विदर्भाचा पराभव करून ४२ व्यांदा रणजीचे विजेतेपद पटकावले होते. दरम्यान, यंदाच्या मोसमातील दुसरा उपांत्य सामना केरळ आणि गुजरात या संघांमध्ये अहमदाबाद येथे रंगणार आहे. (Yashasvi Jaiswal)
मुंबई संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष म्हात्रे, अंग्क्रिश रघुवंशी, अमोघ भटकळ, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, शिवम दुबे, आकाश आनंद, हार्दिक तामोरे, सूर्यांश शेडगे, शार्दुल ठाकूर, शम्स मुलाणी, तनुष कोटियन, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसूझा, रॉयस्टन डायस, अथर्व अंकोलेकर, हर्ष तन्ना.
हेही वाचा :
Yashasvi Jaiswal : जैस्वाल उपांत्य सामन्यास मुकणार
पायाच्या दुखापतीमुळे मुंबई संघाकडून विश्रांती देण्याचा निर्णय
70