मुंबई : भारतीय कसोटी संघातील डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वालने देशांतर्गत क्रिकेटमध्ये धक्कादायकरीत्या मुंबई संघास सोडचिठ्ठी दिली आहे. २०२५-२६ च्या मोसमासाठी गोवा क्रिकेट संघटनेने यशस्वीला करारबद्ध केले असून त्यासाठीचे ना-हरकत प्रमाणपत्र मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) त्याला दिले आहे. (Yashasvi)
जीसीएचे सचिव शंभू देसाई यांनी यशस्वीला करारबद्ध केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. “आम्ही गोव्यासाठी चांगला संघ तयार करत आहोत. त्यासाठी आम्हाला सर्वोत्तम गुणवत्ता असणाऱ्या खेळाडूंची आवश्यकता असून आम्ही अलीकडेच यशस्वीशी संपर्क साधला होता,” असे देसाई म्हणाले. २३ वर्षीय यशस्वीने आपल्या १९ वर्षांखालील कारकिर्दीची सुरुवातच मुंबई संघाकडून केली होती. मुंबईकडूनच त्याने २०१९ मध्ये प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत तो प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये फक्त मुंबई संघाकडूनच खेळला आहे. त्याने मुंबईतर्फे प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये ५३.९३ च्या सरासरीने ८६३ धावा केल्या असून त्यामध्ये ४ शतके व २ अर्धशतकांचा समावेश आहे. (Yashasvi)
रणजी क्रिकेट स्पर्धेमध्ये २०२१-२२ च्या मोसमात त्याने सलग तीन शतके झळकावली होती. त्याचप्रमाणे, २०२३-२४ मध्ये ४२ व्यांदा रणजी चषक उंचावणाऱ्या मुंबई संघामध्ये त्याचा समावेश होता. त्याने मुंबईकडून २५ लिस्ट-ए सामन्यांमध्ये ५८.९० च्या सरासरीने १२९६ धावा जमवल्या आहेत. या वर्षी जानेवारीमध्ये रणजी स्पर्धेत तो मुंबईकडून अखेरचा सामना जम्मू आणि काश्मीरविरुद्ध खेळला होता. यापूर्वी, मुंबईचे सिद्धेश लाड आणि अर्जुन तेंडुलकर हे क्रिकेटपटू गोवा संघात दाखल झाले आहेत.
गोव्याचा संघ रणजीच्या प्लेट लीगचा २०२४-२५ च्या मोसमाचा विजेता आहे. यशस्वी सध्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळतो आहे. (Yashasvi)
हेही वाचा :
सॅमसनच्या नेतृत्वाचा मार्ग मोकळा
न्यूझीलंडची विजयी आघाडी