Home » Blog » Women’s Hockey : भारतीय महिलांची विजयी सलामी

Women’s Hockey : भारतीय महिलांची विजयी सलामी

चुरशीच्या सामन्यात इंग्लंडवर ३-२ने मात

by प्रतिनिधी
0 comments
Women’s Hockey

भुवनेश्वर : भारतीय महिला संघाने शनिवारी प्रो-हॉकी लीग स्पर्धेमध्ये इंग्लंडला ३-२ असे पराभूत करून विजयी सलामी दिली. नवनीतने अखेरच्या मिनिटास केलेल्या गोलच्या जोरावर भारताला हा सामना जिंकण्यात यश आले. (Women’s Hockey)

प्रो-हॉकी लीग स्पर्धेच्या भारतातील टप्प्यास शनिवारी भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियमवर सुरुवात झाली. जागतिक क्रमवारीमध्ये इंग्लंड सातव्या, तर भारत नवव्या स्थानावर आहे. सामन्याच्या सहाव्याच मिनिटास भारताला मिळालेला पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावत वैष्णवी फाळकेने संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. परंतु, ही आघाडी अवघी ६ मिनिटे टिकली. १२ व्या मिनिटास इंग्लंडच्या डार्सी बॉर्नने गोल करून संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. (Women’s Hockey)

दुसऱ्या सत्रामध्ये भारताच्या दीपिकाने २५ व्या मिनिटास गोल केला. त्यानंतर दोन्ही संघांनी प्रतिस्पर्ध्यांच्या गोलजाळ्यावर वारंवार आक्रमणे रचली. परंतु, सामन्यातील अर्ध्या तासाहून अधिक काळ दोन्ही संघांना गोल करण्यात यश आले नाही. या कालावधीत भारताची गोलरक्षक सविता पुनियाने काही महत्त्वाचे ‘सेव्ह’ केले. ५८ व्या मिनिटास इंग्लंडच्या फिओनाने गोल करून २-२ अशी बरोबरी साधली. त्याच्या पुढच्याच मिनिटास नवनीतने भारताचा तिसरा गोल केला. या सामन्यात भारताने वेगवान पास करण्यावर भर दिला. त्याचा फायदा त्यांना इंग्लंडवरील दडपण वाढवण्यास झाला. (Women’s Hockey)

या विजयामुळे भारताच्या खात्यात ३ गुण जमा झाले आहेत. भारताचा इंग्लंडविरुद्धचा पुढील सामना रविवारी होणार आहे. दरम्यान, शनिवारी झालेल्या अन्य सामन्यात स्पेनने जर्मनीवर २-१ अशी मात केली.

 

हेही वाचा :

भारतीय संघ दुबईला रवाना
यानिक सिनरवर तीन महिन्यांची बंदी

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00