Home » Blog » West Indies : फिरकीपटूंनी साकारला पाकचा विजय

West Indies : फिरकीपटूंनी साकारला पाकचा विजय

पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजचा १२७ धावांनी पराभव

by प्रतिनिधी
0 comments
West Indies

मुलतान : फिरकीपटूंच्या प्रभावी कामगिरीमुळे पाकिस्तानने मालिकेतील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात रविवारी वेस्ट इंडिजला १२७ धावांनी पराभूत केले. तिसऱ्या दिवशीच संपलेल्या या सामन्यात विजयासाठी २५१ धावांचे लक्ष्य असताना विंडीजचा दुसरा डाव अवघ्या १२३ धावांत आटोपला. या विजयासह पाकने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. (West Indies)

कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच पाकने दुसऱ्या डावामध्ये ३ बाद १०९ धावा करून आपली आघाडी २०२ धावांपर्यंत वाढवली होती. रविवारी सुरुवातीच्या पंधरा षटकांमध्येच पाकचा डाव १५७ धावांत संपुष्टात आला. विंडीजच्या जोमेल वॉरिकनने ३२ धावांत ७ विकेट घेऊन कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. पाकच्या पहिल्या डावातील ९३ धावांच्या आघाडीमुळे विंडीजसमोर विजयासाठी २५१ धावांचे आव्हान होते. तथापि, विंडीजच्या फलंदाजांना हे आव्हान पेलवले नाही. (West Indies)

ॲलिक अथानेझ वगळता विंडीजच्या अन्य सर्व फलंदाजांनी पाकच्या फिरकीपटूंपुढे शरणागती पत्करली. अथानेझने एकाकी लढत देत ६८ चेंडूंमध्ये ७ चौकारांसह ५५ धावा केल्या. साजिद खानने ५० धावांत विंडीजचा निम्मा संघ गारद केला, तर अबरार अहमदने २७ धावा देत ४ विकेट घेतल्या. या सामन्यात दोन्ही डावांतील विंडीजच्या वीसही विकेट पाकच्या फिरकीपटूंनी काढल्या. दोन्ही डावांत मिळून ९ विकेट घेणारा साजिद खान सामनावीर ठरला. मालिकेतील दुसरी कसोटी २५ जानेवारीपासून मुलतान येथे खेळवली जाणार आहे. (West Indies)

संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान – पहिला डाव २३० आणि दुसरा डाव ४६.४ षटकांत सर्वबाद १५७ (शान मसूद ५७, महंमद हुरायरा २९, कामरान गुलाम २७, जोमेल वॉरिकन ७-३२, गुडाकेश मोती १-४८) विजयी विरुद्ध वेस्ट इंडिज – पहिला डाव १३७ आणि दुसरा डाव ३६.३ षटकांत सर्वबाद १२३ (ॲलिक अथानेझ ५५, साजिद खान ५-५०, अबरार अहमद ४-२७, नोमान अली १-४२).

हेही वाचा :
भारताच्या मुलींची विजयी सलामी

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00