मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा फलंदाज विराट कोहलीने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला. त्याने १७ धावा करताच त्याच्या टी-२०मध्ये १३ हजार धावा पूर्ण झाल्या असून अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिलाच फलंदाज आहे. (Virat Kohli)
विराटने एकूण ४०३ टी-२० सामन्यांत तेरा हजार धावांचा टप्पा गाठला. त्याने ४१.४७च्या सरासरीने या धावा जमवल्या असून त्यामध्ये ९ शतके व ९८ अर्धशतकांचा समावेश आहे. एप्रिल, २००७ मध्ये विराट दिल्लीकडून हिमाचलविरुद्ध पहिला टी-२० सामना खेळला होता. या तेरा हजारांपैकी आठ हजारपेक्षा अधिक धावा विराटने आयपीएलमध्ये बेंगळुरूकडून खेळताना काढल्या आहेत. आयपीएलच्या अठरा मोसमांमध्ये विराट केवळ बेंगळुरू संघाकडूनच खेळला आहेत. मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याच्या नावावर २५६ सामन्यांत ८,१०१ धावा झाल्या असून त्यामध्ये ८ शतके व ५६ अर्धशतके आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत विराट अग्रस्थानी असून त्याच्याखालोखाल शिखर धवन ६,७६९ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. (Virat Kohli)
जागतिक स्तरावर टी-२० क्रिकेटमध्ये तेरा हजार धावा करणारा विराट हा एकूण पाचवा फलंदाज ठरला आहे. टी-२०मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर असून त्याने १४,५६२ धावा केल्या आहेत. त्याखालोखाल ॲलेक्स हेल्स, शोएब मलिक आणि कायरन पोलार्ड यांनीही यापूर्वी १३,००० धावांचा टप्पा ओलांडला आहे. (Virat Kohli)
