Home » Blog » Virat Kohli : परदेश दौऱ्यांमध्ये कुटुंबीय हवेतच!

Virat Kohli : परदेश दौऱ्यांमध्ये कुटुंबीय हवेतच!

बीसीसीआयच्या नव्या नियमावर विराट कोहलीची टीका

by प्रतिनिधी
0 comments
Virat Kohli

बेंगळुरू : भारतीय संघाच्या परदेश दौऱ्यामध्ये खेळाडूंच्या कुटुंबियांच्या वास्तव्यावर निर्बंध आणणाऱ्या बीसीसीआयच्या नियमावर अनुभवी फलंदाज विराट कोहलीने टीका केली आहे. खेळाडू कठीण काळातून जात असताना कुटुंबियांच्या सोबत असण्याने समतोल राखण्यास मदत होते, असे कोहली म्हणाला. (Virat Kohli)

या वर्षाच्या सुरुवातीस भारताला ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये अपयश आल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खेळाडूंसाठी काही कठोर नियम अवलंबले. ४५ दिवसांपेक्षा दीर्घ दौऱ्यांमध्ये खेळाडूंच्या कुटुंबियांचे वास्तव्य १४ दिवसांहून अधिक नसेल, हा नियमही यावेळी लागू करण्यात आला. याबरोबरच, ४५ दिवसांहून कमी कालावधीच्या दौऱ्यांमध्ये कुटुंबियांच्या वास्तव्यावर ७ दिवसांची मर्यादा घालण्यात आली आहे. रविवारी, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघातर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना विराटने यांबाबत मतप्रदर्शन केले. मैदानावरील अटीतटीच्या खेळानंतर दिवसाअखेरीस कुटुंबियांजवळ येणे हे किती दिलासादायक असते, हे शब्दांतून समजावून सांगता येणे कठीण आहे. कुटुंबाचे महत्त्व लोकांना समजले आहे, असे मला वाटत नाही. प्रत्यक्ष खेळाशी संबंध नसणाऱ्या कुटुंबियांना चर्चेत आणले जाते आणि त्यांना दूर ठेवण्याचा निर्णय होतो, हे निराशाजनक आहे, असे विराटने सांगितले. (Virat Kohli)

परदेशी दौऱ्यामध्ये एखाद्या खेळाडूचे प्रदर्शन वाईट असेल, तर एकट्याने बसून स्वत:ला दोष देणे कोणालाच आवडत नाही. मला पुन्हा सामान्य मन:स्थितीत यायचे असते. मग तुम्ही खेळाकडे जबाबदारी म्हणून पाहू शकता. तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडली, आता पुन्हा तुम्हाला सामान्य आयुष्यात परतायचे असते. यासाठीच कुटुंबियांचे सोबत असणे आवश्यक आहे, असे मत विराटने मांडले. या वर्षी जूनमध्ये भारतीय संघ दोन महिन्यांच्या इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विराटचे हे मत म्हणजे अप्रत्यक्षपणे बीसीसीआयला केलेली सूचना असल्याचे समजले जात आहे. (Virat Kohli)

हेही वाचा :

पाक ‘टी-२०’मध्येही पराभूत

अल्कारेझला हरवून ड्रेपर अंतिम फेरीत

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00