नवी दिल्ली : भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने दिल्लीच्या रणजी संघासोबत मंगळवारी सराव केला. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये ३० जानेवारीपासून दिल्ली आणि रेल्वे यांच्यात रंगणाऱ्या सामन्यामध्ये विराट दिल्लीकडून खेळणार आहे. (Virat Kohli)
विराट तब्बल १२ वर्षांनंतर देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील सामन्यामध्ये सहभागी होणार आहे. मंगळवारी अरुण जेटली स्टेडियमवर त्याला सराव करताना पाहण्यासाठी गर्दी जमली होती. विराटने फुटबॉल खेळण्यापासून सरावसत्राची सुरुवात केली. त्यानंतर, प्रशिक्षक सरणदीप सिंग यांच्याशी चर्चा करून तो फलंदाजीच्या सरावासाठी उतरला. प्रथम सुमीत माथूर, हर्ष त्यागी आणि शिवम शर्मा या फिरकीपटूंनी विराटला गोलंदाजी केली. त्यानंतर, वेगवान गोलंदाज नवदीप सैनीनेही विराटला काही चेंडू टाकले. (Virat Kohli)
फलंदाजीच्या सरावानंतर विराटने त्याचा बालपणीचा मित्र शाहझेबची भेट घेतली. यावेळी, शाहझेबच्या मुलाने काढलेल्या विराटच्या रेखाचित्रावर विराटने स्वाक्षरीही केली. त्यानंतर, काही वेळ विराटने क्षेत्ररक्षणाचा सराव केला. रणजीमध्ये दिल्लीचा संघ आयुष बदोनीच्या नेतृत्वाखाली खेळतो आहे. मागील वर्षभरात विराटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेत विराटला केवळ १९१ धावा करता आल्या होत्या. पुढील महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी ही महत्त्वाची स्पर्धा होणार असल्याने त्याअगोदर विराटला सूर गवसणे भारतीय संघासाठी आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर विराटच्या रणजीतील कामगिरीकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे. (Virat Kohli)
दुसरीकडे, भारताचा कर्णधार रोहित शर्मासह यशस्वी जैस्वाल आणि श्रेयस अय्यर यांनी मुंबईकडून पुढील रणजी सामन्यात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडविरुद्धच्या आगामी वन-डे मालिकेच्या तयारीसाठी वेळ हवा असल्याने हे तिघे ३० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या मुंबई-मेघालय सामन्यात खेळणार नाहीत. भारत-इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेस ६ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे, रोहित, यशस्वी आणि श्रेयस या तिघांनाही नुकत्याच झालेल्या मुंबई-जम्मू आणि काश्मीर सामन्यामध्ये मोठी खेळी करता आली नव्हती. (Virat Kohli)
हेही वाचा :
ज्योती याराजीचे विक्रमासह सुवर्ण