Home » Blog » Vikhe Patil Award : सुनीलकुमार लवटे, मीनाक्षी पाटील यांना विखे पाटील साहित्य पुरस्कार

Vikhe Patil Award : सुनीलकुमार लवटे, मीनाक्षी पाटील यांना विखे पाटील साहित्य पुरस्कार

by प्रतिनिधी
0 comments
Vikhe Patil Award

शिर्डी : यंदाचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार डॉ. सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर) यांना जाहीर झाला आहे. डॉ. मीनाक्षी पाटील (मुंबई) यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला. (Vikhe Patil Award)

डॉ. एच. व्ही. देशपांडे (कोल्हापूर) यांना पद्मश्री राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार, संतोष भालेराव (संगमनेर) यांना अहिल्यानगर जिल्हा साहित्य पुरस्कार, श्रीकांत कासट (संगमनेर) यांना जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार, दिलीप जगताप (सातारा) यांना राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार, तर अतांबर शिरढोणकर (सांगली) आणि प्रसाद अंतरवेलीकर (निफाड) यांना राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार अशा पुरस्कारांची घोषणाही करण्यात आली आहे. (Vikhe Patil Award)

सहकारी साखर कारखानदारीचे जनक व सहकारी चळवळीचे अध्वर्यू पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२५ व्या जयंती निमित्त आयोजित समारंभात आठ ऑगस्टला पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. विखे पाटील पुरस्कारांचे हे ३५ वे वर्ष आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या हस्ते व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार व डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे.

डॉ. सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर) यांना दिल्या जाणाऱ्या जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार (रुपये ५१ हजार व स्मृतिचिन्ह) डॉ. मीनाक्षी पाटील (मुंबई) यांच्या `उत्तर आधुनिकता आणि मराठी कविता` या संशोधन ग्रंथासाठी देण्यात येणार आहे. राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार (रुपये २५ हजार व स्मृतिचिन्ह) डॉ. एच. व्ही. देशपांडे (कोल्हापूर) यांच्या `मराठी नव समीक्षा: उद्गम आणि विकास` या संशोधन ग्रंथासाठी देण्यात येणार आहे. (Vikhe Patil Award)

राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार तसेच कलागौरव पुरस्कार प्रत्येकी रुपये २५ हजार व स्मृतिचिन्ह असे आहेत. अन्य पुरस्कार प्रत्येकी दहा हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह अशा स्वरुपाचे आहेत. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

याबरोबरच संदीप तपासे यांच्या `काठावरची माणसं` या कथासंग्रहाला डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा परिसर पुरस्कार जाहीर केला असून, ‘सहकाराचा कल्पवृक्ष: विठ्ठलराव विखे पाटील’ या पुस्तकाचे लेखक डॉ. वसंतराव ठोंबरे यांचा रुपये १० हजार व स्मृतिचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

पुरस्कार निवड समितीमध्ये डॉ. रावसाहेब कसबे यांच्यासह डॉ. एकनाथ पगार, डॉ. दिलीप धोंडगे आणि डॉ. राजेंद्र सलालकर यांनी काम पाहिले.

हेही वाचा :
‘ऑपरेशन सिंदूर’वर सोमवारी चर्चा
मागासवर्गीयांच्या जागा जाणूनबुजून रिकाम्या ठेवण्याचे षडयंत्र : राहुल गांधी

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00