Home » Blog » Varun : वरुण चक्रवर्तीला ‘प्रमोशन’

Varun : वरुण चक्रवर्तीला ‘प्रमोशन’

इंग्लंडविरुद्धच्या वन-डे मालिकेसाठी भारतीय संघात समावेश

by प्रतिनिधी
0 comments
Varun Chakravarthy

नागपूर : इग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेमध्ये प्रभावी कामगिरी करणारा भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला या कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. बुधवारपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेसाठी वरुणचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. (Varun)

नागपूर येथे या मालिकेतील पहिली वन-डे खेळवली जाणार असून सध्या येथील व्हीसीए स्टेडियमवर भारतीय संघाचे सराव शिबिर सुरू आहे. मंगळवारी वरुण या शिबिरात दाखल झाला. ३३ वर्षीय वरुणने नुकत्याच संपलेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ९.८६ च्या सरासरीने १४ विकेट घेतल्या होत्या. राजकोट येथे रंगलेल्या तिसऱ्या सामन्यात त्याने इंग्लंडचा निम्मा संघ गारद केला होता. ही मालिका भारताने ४-१ अशी जिंकण्यामध्ये मोलाची भूमिका बजावणारा वरुण मालिकावीरही ठरला होता. तत्पूर्वी, विजय हजारे करंडक या देशांतर्गत वन-डे स्पर्धेमध्येही त्याने सहा सामन्यांत १८ विकेट घेतल्या. ही कामगिरी विचारात घेता त्याचा समावेश भारतीय वन-डे संघात करण्यात आला. (Varun)

वरुणला प्रथमच वन-डे संघामध्ये स्थान मिळाले असून अंतिम अकरा जणांमध्ये निवड झाल्यास ते वरुणचे आंतरराष्ट्रीय वन-डेमधील पदार्पण ठरेल. अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करलेला भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विननेही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी वरुणचा समावेश वन-डे संघामध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. आतापर्यंत आयसीसीला सादर केलेला संघ हा प्राथमिक आहे. त्यामुळे, त्यामध्ये बदल केला जाऊ शकतो. “वरुण चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात स्थान मिळवेल, असे मला वाटते,” असे अश्विनने एका यू ट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले होते.

हेही वाचा :

करुणरत्नेची निवृत्तीची घोषणा
आयसीसी अंडर-१९ संघामध्ये भारताच्या चौघी
 मायकेल बेव्हन ‘हॉल ऑफ फेम’मध्ये

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00