नवी दिल्ली : भारताची सर्वांत अनुभवी महिला हॉकीपटू वंदना कटारियाने १५ वर्षांच्या कारकिर्दीनंतर मंगळवारी आंतरराष्ट्रीय हॉकीतून निवृत्ती जाहीर केली. ३२ वर्षीय वंदनाने भारताकडून ३२० सामने खेळले असून तिच्या नावावर १५८ गोल जमा आहेत. (Vandana)
हरिद्वारजवळील रोशनाबादमधून आलेल्या वंदनाने २००९ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी भारतीय संघातर्फे पदार्पण केले होते. २०१३ मध्ये ज्युनियर हॉकी वर्ल्ड कपमध्ये भारताने ब्राँझपदक जिंकण्यात वंदनाचा महत्त्वाचा वाटा होता. या स्पर्धेत तिने भारतातर्फे सर्वाधिक ५ गोल केले होते. टोकियो ऑलिंपिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने प्रथमच चौथ्या स्थानापर्यंत मजल मारली. वंदनाच्या कारकिर्दीतील हे सर्वोच्च यश ठरले. या ऑलिंपिकमध्ये तिने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात गोलची हॅटट्रिक नोंदवली होती. भारताकडून ऑलिंपिकमध्ये गोल हॅटट्रिक नोंदवणारी ती पहिली महिला हॉकीपटू ठरली. (Vandana)
“प्रत्येक गोल नोंदवण्याचा थरार आणि भारताची जर्सी परिधान करण्याचा अभिमान हा सदैव माझ्या मनावर कोरलेला राहील,” असे वंदनाने इन्स्टाग्रामवर म्हटले. हॉकी इंडियाने वंदनाच्या गौरवार्थ एक्सवर (ट्विटर) पोस्ट लिहिली आहे. “टोकियोमधील हॅटट्रिसारख्या अगणित क्षणांद्वारे वंदनाने भारतीय हॉकीच्या गुणवत्तेला नवे आयाम दिले आहे,” असे हॉकी इंडियाने म्हटले आहे. वंदनाच्या कारकिर्दीत भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई स्पर्धेमध्ये २०१४, २०१८ आणि २०२३ मध्ये अनुक्रमे ब्राँझ, रौप्य आणि ब्राँझ जिंकले. (Vandana) वंदनाने कारकिर्दीत भारतीय महिला हॉकी संघाचे कर्णधारपदही भूषवले. २०१६ च्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेमध्ये वंदनाच्या नेतृत्वाखाली भारताने सुवर्णपदकावर नाव कोरले होते. २०१८ मध्ये याच स्पर्धेत भारताने रौप्यपदकाची कमाई केली, तेव्हा वंदनाने स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार पटकावला होता. २०२२ च्या बर्मिंघम राष्ट्रकुल स्पर्धेत ब्राँझपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचीही ती सदस्य होती. भारत सरकारने २०२२ मध्ये वंदनाला पद्मश्रीने सन्मानित केले आहे.
हेही वाचा :
पदार्पणातच ‘मोहाली बॉय’ चा विक्रम