कोल्हापूर : प्रतिनिधी : लोकसभेत बुधवारी मध्यरात्री वक्फ संशोधन विधेयक मंजूर झाले. या विधेयकांवरील चर्चेत सर्वपक्षीय नेत्यांनी भाग घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या चर्चेत कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे गावातील प्रकरणाचा उल्लेख केला. वडणगेतील शंभु महादेवाच्या मंदिरावर वक्फ बोर्डाने दावा केला होता असा उल्लेख केला. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून अमित शहांना चुकीची माहिती मिळाली असल्याने त्यांनी चुकीचा उल्लेख केल्याचे वडणगेच्या बहुतांशी ग्रामस्थानी उल्लेख केला. मुस्लीम समाजाने कधीही महादेव मंदिरावर दावा केलेला नाही. जी जागा मुस्लीम समाजाची आहे त्या जागेसाठी न्यायालयीन लढाई लढत आहे असे मुस्लीम समाजाचे म्हणणे आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून गावात हिंदू मुस्लीम एकोप्याने राहतात असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. (Vadange)
कुठे आहे वडणगे
कोल्हापूर शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर पंचगंगा नदीच्या काठावर वडणगे गाव आहे. या गावात शंभु महादेव आणि पार्वती देवीचे वेगवेगळी मंदिरे आहेत. दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. यात्रेत हिंदू मुस्लीमांसह सर्व धर्मीय एकोप्याने राहतात. महादेव मंदिर आणि मशिद जवळजवळ आहेत. मंदिर आणि मशिदीच्या मोकळ्या जागेत बांधण्यात आलेल्या गाळामुळे ही जागा ग्रामपंचायतीची की मुस्लीम समुदायची यावर न्यायालयात वाद सुरू आहे. (Vadange)
काय आहे वाद
महादेव मंदिराजवळच मशिद आहे. तसेच मोकळी जागा आहे. त्या परिसरात मुस्लिमांची दफनभूमीही आहे. सिटी सर्व्हेनंबर ८९ नंबरवर मुस्लीम समाज मशिद आणि ग्रामपंचायत वडणगे अशी नोंद आहे. सिटी सर्व्हे नंबर ८९ मधील एका गट नंबर दुकानगाळे बांधले आहेत. या दुकानगाळ्याचे भाडे मुस्लीम समाजाकडे जमा होत असे. सिटी सर्व्हेनंबरवर वडणगे ग्रामपंचायतीचे नाव असताना मुस्लीम मशिदीला भाडे का द्यायचे यावरुन काही वर्षापूर्वी वाद सुरू झाला. गाळेधारक आणि मशिद प्रशासन यांच्यात गेली अनेक वर्षे दावे सुरू आहेत. सर्वच दाव्यात मशिदीच्या बाजूने निकाल लागला आहे. (Vadange)
भूमी अभिलेख कार्यालयाचा निकाल
वडणगे ग्रामपंचायतीने भाडे आपल्याला हवे असा दावा केला. त्यानंतर जागा कुणाची यावर वडणगे ग्रामपंचायतीने करवीर भूमी अभिलेख कार्यालयात दाद मागण्यात आली. तिथे ही जागा मुस्लीम मशिदीची आहे असा निकाल देण्यात आला. त्यावर पुन्हा दाद मागण्यात आली. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, आयुक्त भूमीअभिलेख कार्यालयात झालेल्या सुनावणीत ही जागा मुस्लीम मशिदीची असल्याचा निकाल लागला. पण या निकालाला गतवर्षी २०२४ मध्ये महसूल मंत्र्यांनी स्थगिती दिली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. (Vadange)
मुस्लीम मशिदीकडून वक्फ बोर्डाला दिली जमीन
मुस्लीम मशिदीने त्यांची जमिन वक्फ बोर्डाकडे हस्तांतरीत केली आहे. त्यामुळे वक्फ बोर्डाने या जमिनीवर दावा केला. पण वक्फ बोर्डाने कधीही महादेव मंदिरावर दावा केलेला नाही, असे हिदायत मुल्लांनी पत्रकारांशी बोलताना दिली. अमित शहा यांना चुकीची माहिती मिळाली असावी हिदायत मुल्लांनी सांगितले. सिटी सर्वे क्रमांक ८९ मधील जागेवर मुस्लीम मशिद आणि ग्रामपंचायत वडणगे अशी दोघांची नावे होती. मुस्लीम मशिदीने ही जागा वक्फ बोर्डाकडे हस्तांतरीत केल्याने सध्या वक्फ बोर्ड आणि ग्रामपंचायत वडणगे या नावावर जमिन आहे. (Vadange)
मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम मशिदीच्या जागेतच
वडणगेतील महादेव मंदिराचा २००५ मध्ये जिर्णोद्धार झाला. यावेळी दगड घडवणे, बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी मशिदीच्या जागेचाच वापर केला गेला. पण मुस्लीम समाजाने त्याला कधीच विरोध केला नाही. मंदिराचे जिर्णोद्धाराला मशिदीकडून जमिनीची वापर करण्यास पूर्ण परवानगी दिली. महाशिवरात्रीची यात्राही मशिदीच्या जागेत भरते. पण जमिनीची मालकी कुणाची यावरुन हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. पण त्याला हिंदू मुस्लीम स्वरुप दिले जात आहे, असे अनेक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. (Vadange)
ही जागेची लढाई आहे
वक्फच्या चर्चेत वडणगे नावाचा उल्लेख करुन आमच्या मागणी दखल घेतली असे मत काही युवकांनी व्यक्त केले. ही लढाई जागेची आहे. ही जागा मशिदीची नसून ग्रामपंचायतीची आहे असे अनेक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या जागेवर महाशिवरात्रीची यात्रा भरते. त्यामुळे या जागेवर ग्रामपंचायतीची मालकी आहे. आणि ही लढाई यापुढे सुरू राहिल असे काही युवकांनी सांगितले. (Vadange)
हेही वाचा :
एकही गैर-मुस्लिम वक्फमध्ये नसेल