Home » Blog » ही निवडणूक जनता विरुद्ध क्षीरसागर : सतेज पाटील

ही निवडणूक जनता विरुद्ध क्षीरसागर : सतेज पाटील

लाटकर यांच्या प्रचारसभेत महाविकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन

by प्रतिनिधी
0 comments
Satej Patil

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीवरुन स्थित्यंतरे घडली. पण या गोष्टी मागे टाकून ताकदीने पुढे जायचे आहे. संकटावर मात करुन पुढे जाण्याचा कोल्हापूरचा गुण आहे. ही निवडणूक राजेश लाटकर यांची एकट्याची नसून कोल्हापूरचा स्वाभिमान, अभिमान आणि जनता विरुध्द राजेश क्षीरसागर यांच्यात असून कोल्हापूरची जनता विजयी होईल, असा विश्वास विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. मिरजकर तिकटी येथे लाटकर यांच्या प्रचार शुभारंभ सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार शाहू महाराज यांनीही राजू लाटकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

सभेत महाविकास आघाडीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले, राजेश लाटकर यांना निवडून आणण्याचा निर्धार सभेत करण्यात आला. मिरजकर तिकटी येथील सभेत लाटकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते आणि विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, सरोज (माई) पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. सभेला महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे गट, डाव्या पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकत्यांची  मोठी गर्दी केली होती.

शिवसेनेचे उपनेते संजय पवार म्हणाले, शिवसैनिक विधानसभा निवडणुकीकडे गद्दार विरुद्ध निष्ठावंत शिवसेना असे पाहतो. गद्दारांच्या विरुद्ध युद्ध जिंकण्यासाठी शिवसैनिक जिवाचे रान करणार आहेत. कोल्हापुरातील दादागिरी मोडून काढण्यासाठी राजेश लाटकरांना विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले.  शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे म्हणाले, कोल्हापूरची जनता दडपशाहीच्या विरोधात कायम लढाई करते. कोल्हापूर उत्तरची लढाई श्रीमंत उमेदवार आणि सर्वसामान्य उमेदवार अशी राहणार असून कोल्हापूरचे मतदार लाटकर यांच्या मागे राहतील.  शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी राजेश लाटकर यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला संधी दिल्याबद्दल काँग्रेस पक्षाचे कौतुक केले.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सरोज पाटील म्हणाल्या, भाजप ही विषवल्ली असून त्यांनी संपूर्ण देश नासवला आहे. हुकूमशाहीला विरोध करण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी लाटकर यांना विजयी करा. सुखवंत ब्रार, आपचे प्रदेश सदस्य संदीप देसाई, सुनील मोदी, सचिन चकाण, आर. के. पोवार, कॉ. चंद्रकांत यादव उपस्थित होते.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00