नागपूर; प्रतिनिधी : ‘भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटते की आमचाच मुख्यमंत्री व्हावा, तीच स्थिती शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची आहे. सरकार महायुतीचेच येईल. मात्र मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार सर्वसहमतीने ठरवला जाईल,’ असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, राज्यात भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार शंभर टक्के येणार आहे. कारण, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा फायदा ज्या-ज्या वर्गाला झाला आहे किंवा होणार आहे, तो वर्ग आमच्या बाजूने आहे. वीजबिल माफीमुळे शेतकरी, लाडक्या बहिणी आमच्या बाजूने आहेत. गरिबांना अन्नधान्याचा पुरवठा, यामुळे जनता आमच्यासोबत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या ५८-५९ योजना सुरू आहेत. त्यामुळे, शहरी वर्गालाही केंद्र आणि राज्य सरकार एकत्र राहिले, तर महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य होईल, असे वाटते, असे बावनकुळे म्हणाले.
अनेक भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे फडवीस हेच मुख्यमंत्री असावेत, असा सवाल केला असता ते म्हणाले, आमचाच नेता मुख्यमंत्री व्हावा, असे वाटणे स्वाभाविक आहे. राष्ट्रवादीलाही अजित पवार आणि शिवसेनेला एकनाथ शिंदे व्हावेत. शेवटी निर्णय केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्वाने बसून करायचा असतो, असे बावनकुळे म्हणाले.