नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या शिरपेचात सोमवारी आणखी एक तुरा खोवला गेला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (आयसीसी) २०२४चा ‘टेस्ट क्रिकेटर ऑफ दि इयर’ (सर्वोत्कृष्ट कसोटीपटू) म्हणून बुमराहची निवड करण्यात आली. भारताची स्मृती मानधना २०२४ मधील सर्वोत्कृष्ट महिला वन-डे क्रिकेटपटू ठरली आहे. (Test Cricketer)
वर्षभरात कसोटी क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी करणाऱ्या खेळाडूची ‘टेस्ट क्रिकेटर ऑफ दि इयर’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. बुमराहने मागील वर्षी १३ कसोटी सामन्यांत ७१ विकेट घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर २०२४ मध्ये तो कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेमध्ये बुमराह ५ सामन्यांत ३२ विकेट घेऊन मालिकावीर ठरला होता. या मालिकेतील भारताने एकमेव विजय मिळवलेल्या पर्थ येथील कसोटीत त्याने संघाचे नेतृत्व केले होते. बुमराहने २०२४ या वर्षी कसोटी कारकिर्दीतील २०० विकेटचा टप्पाही पूर्ण केला. त्याने १९.४च्या सरासरीने हा टप्पा गाठला असून कसोटी क्रिकेटमध्ये तो सर्वांत कमी सरासरीसह २०० विकेट घेणारा गोलंदाज ठरला. (Test Cricketer)
बुमराहसह इंग्लंडचे जो रूट व हॅरी ब्रुक आणि श्रीलंकेचा कमिंदू मेंडिस यांना २०२४ मधील सर्वोत्कृष्ट कसोटीपटूसाठी नामांकन होते. त्यामध्ये बुमराहने बाजी मारली. बुमराहमुळे तब्बल सहा वर्षांनी भारतीय क्रिकेटपटूची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यापूर्वी, २०१८ मध्ये भारताच्या विराट कोहलीने या पुरस्कारावर नाव कोरले होते. २०२४ साठी आयसीसीने जाहीर केलेल्या जागतिक कसोटी संघातही बुमराहला स्थान देण्यात आले आहे. याशिवाय २०२४ मधील सर्व प्रकारांमधील कामगिरीच्या आधारे निवडण्यात येणाऱ्या ‘क्रिकेटर ऑफ दि इयर’ पुरस्कारासाठीही बुमराहला आयसीसीचे नामांकन मिळाले आहे. (Test Cricketer)
भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाने २०२४ मध्ये १३ वन-डे सामन्यांत ५७.४६ च्या सरासरीने ७४७ धावा केल्या होत्या. यांमध्ये ४ शतके आणि ३ अर्धशतकांचाही समावेश होता. महिला वन-डे क्रिकेटमध्ये २०२४ या वर्षात ७०० धावांचा टप्पा ओलांडणारी ती जगातील एकमेव फलंदाज आहे. आयसीसीच्या २०२४ च्या जागतिक महिला वन-डे संघामध्येही तिचा समावेश आहे. स्मृतीने कारकिर्दीत दुसऱ्यांदा आयसीसीचा सर्वोत्कृष्ट महिला वन-डे क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला आहे. यापूर्वी, २०१८ मध्ये ती या पुरस्काराची मानकरी ठरली होती. (Test Cricketer)
‘Game Changer’ Jasprit Bumrah is awarded the ICC Men’s Test Cricketer of the Year 2024
Bumrah took 71 wickets at a stunning average of 14.92, finishing as the highest wicket taker in Test cricket in 2024.#TeamIndia | @Jaspritbumrah93 pic.twitter.com/WHUciUK2Qb
— BCCI (@BCCI) January 27, 2025
हेही वाचा :
अर्शदीप आयसीसीचा सर्वोत्कृष्ट टी-२०पटू
आयसीसी संघाच्या कर्णधारपदी रोहित