चेन्नई : साकेत मायनेनी आणि रामकुमार रामनाथन या भारताच्या जोडीला चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. जपानच्या शिंतारो मोचिझुकी-काइतो उएसुगी या जोडीने गतविजेत्या साकेत-रामकुमार जोडीवर ६-४, ६-४ अशी सरळ सेटमध्ये मात केली. (Tennis doubles)
साकेत-रामकुमार या जोडीला या स्पर्धेसाठी पुरुष दुहेरीच्या गटात तृतीय मानांकन होते, तर जपानची जोडी बिगरमानांकित होती. त्याचबरोबर गतविजेते असल्याने साहजिकच साकेत-रामकुमार यांचे पारडे अंतिम फेरीत जड मानले जात होते. तथापि, अंतिम सामन्यामध्ये त्यांना लौकिकास साजेसा खेळ करता आला नाही. पहिला सेट शिंतारो-काइतो जोडीने ६-४ असा जिंकून सामन्यात आघाडी घेतल्यानंतर साकेत-रामकुमार दुसऱ्या सेटमध्ये जोरदार पुनरागमन करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, दुसऱ्या सेटमध्येही जपानच्या जोडीने त्यांना वरचढ होण्याची संधी दिली नाही. हा सेटसुद्धा ६-४ असा जिंकत शिंतारो-काइतो जोडीने १ तास ७ मिनिटांमध्ये विजयावर शिक्कामोर्तब केले. (Tennis doubles)
दरम्यान, या स्पर्धेच्या पुरुष एकेरीमध्ये स्वीडनचा एलियस वायमर आणि फ्रान्सचा कायरियन जॅकेट यांच्यामध्ये रविवारी विजेतेपदासाठी लढत होईल. उपांत्य फेरीमध्ये वायमरने ब्रिटनचा अग्रमानांकित बिली हॅरिसला ७-६(७-५), ७-६(७-२) असा पराभवाचा धक्का देत अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात जॅकेटने चेक प्रजासत्ताकच्या डॅलिबोर स्विर्सिनाला ६-४, ६-१ असे नमवले. (Tennis doubles)
हेही वाचा :