मुंबई : भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समितीने या स्पर्धेसाठी आयसीसीकडे पाठवलेल्या भारतीय संघातून बुमराहला दुखापतीमुळे वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर, प्राथमिक संघात नसलेल्या वरुण चक्रवर्तीचा इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील कामगिरीच्या आधारे या संघात समावेश करण्यात आला. (Team Selection)
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अखेरच्या कसोटीदरम्यान बुमराहला पाठदुखीचा त्रास जाणवू लागला होता. या कसोटीच्या दुसऱ्या डावामध्ये त्याने गोलंदाजीही केली नव्हती. तेव्हापासून बुमराह क्रिकेटपासून दूर आहे. सध्या सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या वन-डे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी त्याला विश्रांती देण्यात आली होती. जानेवारी महिन्यात आयसीसीकडे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाठवलेल्या प्राथमिक संघामध्ये बुमराहचा समावेश असला, तरी त्याच्या फिटनेसवरच त्याचे अंतिम संघातील स्थान अवलंबून होते.(Team Selection)
मागील आठवड्यात बीसीसीआयच्या बेंगळुरू येथील सेंटर फॉर एक्सलन्स येथे बुमराहची वैद्यकीय चाचणी आणि स्कॅन्स करण्यात आले. त्यानंतर, वैद्यकीय पथकाने यासंबंधीचा अहवाल निवड समितीला सादर केला असून त्यामध्ये बुमराह अद्याप पूर्णपणे फिट नसल्याचे म्हटले आहे. परिणामी, त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याच्याजागी हर्षित राणाचा संघात समावेश करण्यात आला. दरम्यान, हर्षितला अंतिम संघात स्थान देऊन अनुभवी महंमद सिराजला राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्याच्या निवड समितीच्या निर्णयाबाबतही आश्चर्य व्यक्त होत आहे. तथापि, चेंडू जुना झाल्यावर सिराजच्या गोलंदाजीतील भेदकता कमी होत असल्याचे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी संघनिवड जाहीर करताना कर्णधार रोहित शर्माने सांगितले होते. याच मुद्द्यावरून त्याचा अंतिम संघात समावेश झाला नसल्याचा अंदाज आहे.
फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला संघात स्थान देताना प्राथमिक संघातील यशस्वी जैस्वालला वगळून राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले आहे. वरुणने नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत १४ विकेट घेतल्या होत्या. या कामगिरीच्या आधारे त्याची वन-डे संघात निवड करून इंग्लंडविरुद्धच्या कटक येथील दुसऱ्या सामन्यात त्याला वन-डे पदार्पणाची संधीही देण्यात आली. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याचा संघात समावेश करताना वॉशिंग्टन सुंदरला वगळले जाईल, असा अंदाज होता. तथापि, हा अंदाज निवडकर्त्यांनी फोल ठरवला. हे दोन बदल वगळता प्राथमिक संघातील उर्वरित खेळाडूच अंतिम संघातही कायम आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होत असून भारताचा सलामीचा सामना २० फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे. (Team Selection)
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, महंमद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.
राखीव खेळाडू – महंमद सिराज, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे.
हेही वाचा :
Team Selection : बुमराह ‘आउट’, चक्रवर्ती ‘इन’
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड
73