मुंबई; प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षांची सरकारे घोडेबाजार करून पाडली, हा देशाच्या इतिहासातील काळा अध्याय आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्रात भाजपाने घोडेबाजार करून सरकार स्थापन केली. राजस्थानातही भाजपाने प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार भाजपाने चोरले, त्याचा बदला घेण्याची वेळ आता आली आहे. भाजपाला विधानसभेच्या निवडणुकीत धडा शिकवून घरी बसवा आणि काँग्रेस मविआचे सरकार विजयी करा, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले आहे. (Ashok Gehlot)
राजीव गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवण्याचे काम केले आहे. या भूमीतून अनेक मोठे नेते होऊन गेले. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्र देशातील आघाडीचे राज्य आहे. विधानसभेची ही निवडणूक देशाची दिशा आणि दशा ठरवणारी आहे. काँग्रेस-मविआकडे अनेक अनुभवी नेते आहेत. त्यांनी सरकार चांगल्या प्रकारे चालवले आहे. काँग्रेसच्या ५ गॅरंटी आणि मविआने महाराष्ट्रनामामधून जनतेच्या हिताचे वचन दिले आहे. महिलांना प्रति महिना ३००० रुपये, मोफत बस प्रवास, २५ लाख रुपयांचा आरोग्य विमा, शेतकऱ्यांना ३ लाखांची कर्जमाफी यारख्या लोकोपयोगी योजनांचे आश्वासन दिले आहे. भारतीय जनता पक्ष फक्त जाहिरताबाजी करून जनतेची दिशाभूल करत असते. पण त्याला आता महाराष्ट्रातील जनता भूलणार नाही.
भाजपा एक मुख्यमंत्री ‘बटोंगे तो कटोंगे’ असा नारा देत आहे तर दुसरीकडे पंतप्रधान ‘एक हैं तो सेफ हैं’,चा नारा देत आहेत. पण निवडणूक आयोग त्यावर काहीच कारवाई करत नाही. निवडणूक आयोगही सरकारच्या दबावाखाली काम करत आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या तारखा ज्या पद्धतीने जाहीर करण्यात आल्या आहेत त्यामागेही मोठे षडयंत्र आहे, असा आरोपही गेहलोत म्हणाले.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यावेळी म्हणाल्या की, महाराष्ट्रातील भाजपा युती सरकारच्या काळात आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. मुंबईत २७ टक्के वैद्यकीय कर्मचारी कमी आहेत. मशिनरी बंद आहेत, औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. याउलट राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारने आरोग्य सेवा सुलभ व वाजवी दरात मिळावी यासाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या. (Ashok Gehlot)
पत्रकार परिषदेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया व पब्लिसिटी विभागाचे चेअरमन पवन खेरा, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते युवराज मोहिते आदी उपस्थित होते.