दोहा : जागतिक अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेमध्ये भारताच्या यशस्विनी घोरपडे आणि दिया चितळे या जोडीने महिला दुहेरीत तिसरी फेरी गाठली. या स्पर्धेच्या अन्य प्रकारांमध्ये मात्र भारतीय टेबल टेनिसपटूंचे आव्हान दुसऱ्या फेरीतच संपुष्टात आले. (Table Tennis)
यशस्विनी-दिया जोडीला या स्पर्धेत बारावे मानांकन आहे. दुसऱ्या फेरीमध्ये यशस्विनी-दिया यांनी सिंगापूरच्या जियान झेंग-लिन क्विआन सेर या जोडीचा अर्ध्या तासात ३-१(६-११, ११-६, ११-६, ११-९) असा पराभव केला. या सामन्यात पहिला गेम गमावल्यामुळे भारतीय जोडी पिछाडीवर पडली होती. परंतु, दुसऱ्या गेमपासून आपला खेळ उंचावत त्यांनी सलग तीन गेम जिंकले आणि विजय निश्चित केला. तिसऱ्या फेरीत यशस्विनी-दिया यांचा सामना जपानच्या मिवा हरिमोतो-मियू किहारा या चौथ्या मानांकित जोडीशी होईल. भारताच्या अयाहिका मुखर्जी-सुतीर्था मुखर्जी या चौदाव्या मानांकित जोडीला मात्र दुसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. जर्मनीच्या अनेट कॉफमन-झियाओना शान या जोडीने अयाहिका-सुतीर्था या जोडीचा ३-०(११-१, १३-११, ११-७) असा पराभव केला. (Table Tennis)
पुरुष एकेरीमध्ये मानुष शाह आणि मानव ठक्कर हे भारताचे दोन्ही खेळाडू दुसऱ्या फेरीत पराभूत झाले. फ्रान्सच्या सहाव्या मानांकित फेलिक्स लेब्रुनने मानुषला ४-०(११-५, ११-६, ११-६, ११-९) असे नमवले. दुसऱ्या सामन्यात मानवने जपानच्या चतुर्थ मानांकित तोमोकाझू हारिमोतोला कडवी लढत दिली. परंतु, अखेर हारिमोतोने मानवचा ४-२(१३-११, ११-३, ९-११, ११-६, ९-११, ११-३) असा पराभव केला. पुरुष दुहेरीमध्ये मानव-मानुष जोडीला आठवे मानांकन होते जर्मनीच्या डँग क्वियू-बेनेडिक्ट डुडा जोडीने त्यांच्यावर ३-१(११-५, ११-९, ८-११, ११-५) अशी मात केली. (Table Tennis)
महिला एकेरीमध्ये तैवानच्या दहाव्या मानांकित चेंग ई-चिंगने दियाला ४-१(११-३, ११-७, ६-११, ११-६, ११-५) असे पराभूत केले. भारताची आघाडीची टेबलटेनिसपटू मनिका बात्रालाही दुसऱ्या फेरीत पराभ पत्करावा लागला. दक्षिण कोरियाच्या गाहयोन पार्कने बाविसाव्या मानांकित मनिकाचा ४-०(११-८, ११-७, ११-५, ११-८) असा धुव्वा उडवला.
हेही वाचा :
मयंक यादव आयपीएलबाहेर