नागपूर : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात अंतिम फेरी गाठण्यासाठी गतविजेत्या मुंबईला अखेरच्या दिवशी ३२३ धावांची गरज आहे. त्याचवेळी सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्यासाठी विदर्भाला ७ विकेट हव्या आहेत. विजयासाठी ४०६ धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबईने चौथ्या दिवसअखेर ३ बाद ८३ धावा केल्या होत्या. (Semi-Final)
नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर सुरू असणाऱ्या या सामन्यामध्ये गुरुवारी विदर्भाने दुसऱ्या डावात २९२ धावांपर्यंत मजल मारली. तिसऱ्या दिवशी नाबाद राहिलेल्या यश राठोड, अक्षय वाडकर यांनी पाचव्या विकेटसाठी दीडशतकी भागीदारी रचून संघाला दोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. कर्णधार वाडकरने २०५ चेंडूंमध्ये ५२ धावा केल्या. यशने अखेरच्या जोडीपर्यंत खेळपट्टीवर राहत २५२ चेंडूंमध्ये ११ चौकारांसह १५१ धावांची खेळी केली. प्रथमश्रेणी क्रिकेटमधील त्याची ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. मुंबईकडून शम्स मुलाणीने ८५ धावांमध्ये ६ विकेट घेतल्या. तनुष कोटियनने तीन विकेट घेतल्या.(Semi-Final)
विदर्भाच्या पहिल्या डावातील ११३ धावांच्या आघाडीमुळे मुंबईसमोर विजयासाठी ४०६ धावांचे आव्हान होते. मुंबईचा सलामीवीर आयुष म्हात्रे दुसऱ्या डावातही अपयशी ठरला. त्याचा १२ धावांवर त्रिफळा उडवून हर्ष दुबेने मुंबईला पहिला धक्का दिला. त्यानंतर हर्षने सिद्धेश लाडलाही बाद केले, तर पार्थ रेखाडेने कर्णधार अजिंक्य रहाणेला पायचीत पकडले. त्यामुळे २५ व्या षटकात मुंबईची स्थिती ३ बाद ६५ अशी झाली होती. पहिल्या डावातील शतकवीर आकाश आनंद आणि शिवम दुबे यांनी दिवसातील अखेरची सहा षटके सावधपणे खेळून काढली. खेळ थांबला तेव्हा मुंबईच्या ३ बाद ८३ धावा झाल्या होत्या. आकाश २७, तर शिवम १२ धावांवर खेळत होते.(Semi-Final)
दरम्यान, केरळ-गुजरात यांच्यातील दुसरा उपांत्य सामना अनिर्णित राहणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. गुरुवारी चौथ्या दिवसअखेर गुजरातचा पहिला डावच अद्याप पूर्ण झालेला नाही. केरळच्या पहिल्या डावातील ४५७ धावांना प्रत्युत्तर देताना गुजरातने आतापर्यंत ७ बाद ४२९ धावा केल्या आहेत. गुजरातकडून सलामीवीर प्रियांक पांचालने २३७ चेंडूंमध्ये १८ चौकार व एका षटकारासह १४८ धावा फटकावल्या. जयमीत पटेल १६१ चेंडूंमध्ये २ चौकारांसह नाबाद ७४ धावांवर खेळत आहे. सामना अनिर्णित राहिल्यास पहिल्या डावात आघाडी घेणारा संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. गुजरातला पहिल्या डावातील आघाडीसाठी आणखी २९ धावांची गरज आहे.(Semi-Final)
संक्षिप्त धावफलक : विदर्भ – पहिला डाव ३८३ आणि दुसरा डाव ११०.१ षटकांत सर्वबाद २९२ (यश राठोड १५१, अक्षय वाडकर ५२, पार्थ रेखाडे २०, शम्स मुलाणी ६-८५, तनुष कोटियन ३-८१) विरुद्ध मुंबई – पहिला डाव २७० आणि दुसरा डाव ३१ षटकांत ३ बाद ८३ (आकाश आनंद खेळत आहे २७, आयुष म्हात्रे १८, शिवम दुबे खेळत आहे १२, हर्ष दुबे २-२६).
हेही वाचा :