आज संपूर्ण जगाचा धांडोळा घेतला तर प्रकर्षाने जाणवते की जग हे सर्व प्रकारच्या अस्थिरतेने गांजलेले आहे. या अस्थिरतेच्या मध्यभागी चार देशांचे प्रमुख मुख्यतः कार्यरत आहेत. अमेरिका – ट्रम्प, रशिया – पुतीन, चीन – जिनपिंग आणि इस्राएल – नेत्यान्याहू. बाकी परिघावर असणारे सौदी अरेबिया, इराण, उत्तर कोरिया, तैवान, टर्की, सीरिया, युक्रेन, फ्रान्स, ब्रिटन, व्हेनेझुएला, पाकिस्तान हे आहेतच. (World’s political scenario)
-डॉ. गिरीश जाखोटिया
आर्थिक – सामाजिक – वैज्ञानिक उन्नतीवर विश्वास असणारे व त्याकरीता लोकशाही मार्गाने पुढे जाणारे बरेच देश आहेत, जसे की – भारत, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, द.आफ्रिका, द. कोरिया,न्यूझीलंड, इंडोनेशिया, व्हिएतनाम, मलेशिया, थायलंड, अर्जेंटिना, कॅनडा इ. हे सारेच देश अस्थिरतेच्या मध्यभागी असणाऱ्या या मातब्बर चौघांशी आपापल्या परीने राजकीय – व्यावहारिक मुत्सद्देगिरी सध्या वापरताहेत आणि शांततामय सुधारणेची वाट पहाताहेत. गोंधळ मात्र इतका आहे की, सुधारणेच्या प्रक्रियेत आपला सहभाग काय, कसा व किती असावा हे कुणालाही नीटपणे माहीत नाही. जगाची संपूर्ण ‘‘इको सिस्टीम’’ आज धोक्यात आली आहे. विविध ‘‘सप्लाय चेन्स’’ या अडचणीत सापडल्या आहेत. एकमेकांबद्दलची साशंकता ही खूप वाढली आहे. (World’s political scenario)
दुसऱ्या महायुद्धाचा काळ
दुसऱ्या महायुद्धात अमेरिका, रशिया, चीन इ. देश हे “दोस्त राष्ट्र” होते. विरुद्ध बाजूला होते जर्मनी, इटली आणि जपान. आज ऐंशी वर्षानंतर रशिया व चीन अमेरिकेच्या विरुद्ध बाजूला आहेत. जपान व जर्मनी अमेरिकेच्या गोटात आहेत. साधारणपणे सन १९८० च्या दरम्यान रशियाच्या साम्यवादाला नामोहरम करण्यासाठी अमेरिकेने चीनच्या साम्यवादी अर्थव्यवस्थेला जागतिक बाजारपेठेत व नंतर जागतिक व्यापार संघटनेत बरीच मदत केली. “सॉफ्ट थिअरी” म्हणजे आपले विद्यार्थी व व्यवस्थापक अमेरिकन विद्यापीठांमध्ये पाठवत चीनने अनेक अमेरिकी संशोधने, व्यापार पद्धती व राजकीय नेटवर्किंगच्या गोष्टी हस्तगत केल्या. अमेरिकेच्याच खांद्यावर स्वार होत चीनने भविष्यकाळातील जागतिक स्पर्धेची तयारी केली. दुसऱ्या महायुद्धानंतर जपाननेही अमेरिकी आश्रयाचा पुरेपूर फायदा उठवत आपल्या अर्थव्यवस्थेस बळकट केले होते. कोणत्याही बलवान राष्ट्राची एक कमकुवत बाजू असते, ती म्हणजे त्या राष्ट्राचा अहंकार. या अहंकारातून निर्माण होतो “Over Confidence”. याच अहंकारामुळे तीन दशके लढूनही अमेरिका कम्युनिस्ट व्हिएतनामला पराभूत करू शकली नाही. सन १९७१ च्या युद्धातही पाकिस्तानची बाजू घेत अमेरिकेने सातवे आरमार पाठवले होते. अमेरिकेच्या या उद्दामपणाला इंदिरा गांधींनी भीक घातली नाही. अर्थात समाजवादी सोव्हिएट रशियाने भारताला सक्रीय पाठिंबा जाहीर केला होता. त्याच रशियाशी आम्ही आजही मैत्री निभावतो आहोत. सन २०१० नंतर मात्र एक मोठा आकार प्राप्त केलेल्या चिनी अर्थव्यवस्थेने अमेरिकेस आमनेसामने आव्हान द्यायला सुरुवात केली. अहंकारी अमेरिकन नेत्यांसाठी हा खूप मोठा धडा होता. या तीन दशकांत अमेरिकन अर्थव्यवस्थेची बरीच अंतर्गत पडझड झाली जी अमेरिकन अभिजनांच्या एकंदर मूर्खपणाची परिणती होती. जगाचा रागरंग पाहता आम्ही सुद्धा रशिया व अमेरिका या दोन भिन्न प्रवृत्तीच्या देशांशी मैत्री सांभाळू लागलो जी एक मोठीच कसरत आहे. “सहकारी अर्थकारण” या आमच्या मध्यममार्गी “सामाजिक उद्योजकते”च्या ढाच्यामुळे आजही आम्ही अमेरिकन भांडवलशाही व रशियन साम्यवाद (जो आज सामंतवादात बदललाय) या दोन भिन्न विचारसरणींमधला दुवा होऊ शकतोय. (आमच्या राजकारण्यांना मात्र आमच्या या ताकदीचा अधेमधे चांगलाच विसर पडतो.) (World’s political scenario)
जागतिक राजकारणातील असंतुलन
आंतरराष्ट्रीय राजकारणात व अर्थकारणात कुणी दूरपर्यंतचा शत्रू किंवा मित्र नसतो हे जरी खरे असले तरी काही चिरंतन मूल्ये ही सांभाळावीच लागतात. या मूल्यांमुळेच जग मैत्रीचा हात पुढे करते व आदर बाळगू लागते आणि भरोसा करु लागते. अमेरिका, चीन, रशिया व इस्राएल या देशांनी सुरुवातीला ही अशीच स्वतःची आंतरराष्ट्रीय प्रतिमा उभी केली होती. पेरोस्रोयका व ग्लासनोस्त या मूलगामी तत्वांनुसार गोर्बाचेव्ह यांनी “यूएसएसआर” ला छोटे करत त्याचा ‘रशिया’ बनवला व यातून काही युक्रेनसारखे देश स्वतंत्र झाले. अमेरिका – रशियामधील शीतयुद्ध बहुतांशाने संपले. “अब्राहम करार” (मुस्लीम ईब्राहिम व ख्रिश्चन अब्राहम हे जेरुसलेमशी निगडित आहेत.) करीत व अमेरिकेचे पाठबळ वापरीत इस्राएलने शेजारी मुस्लीम देशांशी मैत्री केली. या मुस्लीम देशांना आपल्या फिलिस्तानी बंधूंसाठी इस्राएल काही भरीव कार्य करेल, अशी आशा वाटू लागली. चीनने सुद्धा “बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह” (BRI) सारखा अवाढव्य आंतरराष्ट्रीय प्रकल्प राबवीत अनेक गरीब व दुर्बळ देशांना त्यात सहभागी करून घेतले. या देशांना चीनने कर्ज, तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ इ. अनेक गोष्टी देत आपले ‘अंकित’ बनवले. बराक ओबामा व ज्यो बायडन यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेने मुस्लीम जगत, गरीब – अविकसित देश, जागतिक व्यापार व सवलती इ. बाबत समजूतदार भूमिका घेत व आपली आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी वापरत काही एक प्रमाणात जगातील आर्थिक, राजकीय व सामरिक अस्थैर्य कमी करण्याचा प्रयत्न केला. हे करताना आपली जागतिक पोलिसगिरी कमी करून आपले घर सावरण्यावर अमेरिका भर देऊ लागली. यासाठी युरोपियन युनियन, सौदी अरेबिया इ. मित्रांच्या संरक्षणाची आपली पारंपरिक जबाबदारी अमेरिकेने कमी करून घेतली. अफगाणिस्तान, द. आफ्रिका, व्हेनेझुएला, इंडोनेशिया इ. देशांच्या प्रांतिक घडामोडींमधून अमेरिका आस्तेकदम बाहेर पडू लागली. दुसऱ्या बाजूला बहुतेक प्रगत देशांना जागतिक व्यापार परिषदेचा हवा तो फायदा मिळेनासा झाल्याने व चीनची आंतरराष्ट्रीय नेतृत्वाची महत्त्वाकांक्षा वाढल्याने जागतिक अर्थकारणातील अमेरिकेचे महत्त्व थोडे कमी झाले. (परंतु अमेरिकन डॉलरची एक जागतिक चलन म्हणून असणारी प्रतिष्ठा मात्र टिकून राहिली.) अमेरिकेच्या या निवृत्तीच्या गोंधळी संदेशामुळे जागतिक राजकारणातील संतुलन वेगाने बिघडू लागले, असे आपण आज काही अंशी म्हणू शकतो. आपल्या उद्याच्या ‘‘भूराजकीय महत्वाकांक्षां’’ची छुपी तयारी करणारे तीन नेते सहजपणे मग जगासमोर आले – पुतीन, जिनपिंग आणि नेत्यान्याहू. (World’s political scenario)
त्रिकुटाला हवे वर्चस्व
या तिन्ही नायकांची भूराजकीय महत्त्वाकांक्षा आपापल्या परीघात समान असली तरी यांचा राजकीय – आर्थिक आवेश मात्र वेगवेगळ्या पद्धतीने वधारत गेला नि जागतिक अस्थिरता वाढवत गेला. गेल्या काही महिन्यांत या त्रिकुटामध्ये ट्रम्प सामील झालेले दिसतात. (यांच्या आताच्या प्रारंभिक दिवसांतच अमेरिका काही आर्थिक परीमाणांवर धीमी झाली आहे.) या चौघांनी आपली आक्रमकता भिन्न भिन्न कोंदणात बसवली. “MAGA” म्हणजे “Make America Great Again” ही भावनिक व तितकीच राष्ट्रवादी घोषणा देत आणि “America First” अशी आपली भूमिका जाहीर करत ट्रम्प एकदम आक्रमक झाले. (त्यांच्या निवडून येण्याचा हाच मंत्र होता.) “यहुदी संस्कृती व लोक” खूप सहन करत आलेत. आता यहूदी (ज्यू) मागे हटणार नाहीत असा जयघोष करत नेत्यानाहू इस्राएलच्या सत्तापदावर (भ्रष्टाचाराचे अनेक आरोप होऊनही) आज विराजमान आहेत. “दी बिग चायना ड्रीम” आणि “कन्फ्यूशियन” या प्राचीन चिनी संस्कृतीचा भावनिक हवाला देत झी जिनपिंगनी सन २०१२ पासून आपल्या हुकूमशाहीचे तख्त बळकट केले. पुतीन साहेबांनी जुन्या महाकाय “युनियन ऑफ सोव्हिएट सोशालिस्ट रिपब्लिक्स” (USSR)ची आठवण काढत आपला भूराजकीय पसारा वाढविण्यास सुरूवात केली. पुतीनना युक्रेनची खनिजे हवी आहेत. चीनला सागरी महत्त्व असलेला तैवान हवा आहे. तिबेट व हॉंगकॉंग आधीच चीनचा हिस्सा बनलेत. लडाख व अरुणाचलवर चीनची वक्रदृष्टी आहेच. दक्षिण चिनी समुद्राचेही एकतर्फी नियंत्रण त्याला हवे आहे. इस्राएलने फिलिस्तानींच्या गाझा पट्टीमधील बराच भाग बळकावला आहे. ट्रम्प काही दिवसांपूर्वी कॅनडाला अमेरिकेत सामील होण्याचा “उद्दाम सल्ला” देत होते. थोडक्यात असे की वेगवेगळ्या पद्धतींनी व प्रयोजनांनी या नायकांना आपले वर्चस्व गाजवायचे आहे. दुर्दैवी वास्तव असे की आपल्या प्रजेचे दूरगामी हित लक्षात न घेता ही मंडळी आततायी झाली आहेत. या चारही देशांच्या अर्थव्यवस्था आज गंभीर अडचणीत आहेत. छुपी गरीबी, बेकारी, उत्पादन क्षेत्रातील घटती उत्पादकता, ढासळणारे संशोधन, शिक्षणाचा एकूण बिघडलेला स्तर व कमजोर कार्यकुशलता, वाढलेले राष्ट्रीय कर्ज, बिघडलेले इंन्फ्रास्ट्रक्चर, घटती निर्यात, घटती बचत, वाढता भ्रष्टाचार, संस्थात्मक व प्रक्रियात्मक असे वाढते असंतुलन, पर्यावरणाचा वाढता र्हास, पाण्याचे वाढते दुर्भिक्ष, भांडवली बाजारातील अस्थिरता, महागाई वरील डळमळलेले नियंत्रण इ. अनेक समस्यांनी हे चारही मातब्बर देश आज ग्रस्त आहेत. अर्थात “हुकूमशाही” प्रवृत्ती असलेले राष्ट्रप्रमुख हे अंतर्गत असणाऱ्या आर्थिक व सामाजिक अशा गंभीर समस्यांवर जेव्हा तोडगा काढत नाहीत तेव्हा ते बहिर्गत राजकारणात खूप आक्रमक होतात. (World’s political scenario)
आंतरराष्ट्रीय क्रांतिकारी मसीहा
रशिया व चीन हे इराण, पाकिस्तान, टर्की आणि उ. कोरियाला सोबत घेत एक मोठा मोर्चा बनवताहेत. अमेरिका, इस्राएल, जपान, ऑस्ट्रेलिया व द. कोरिया हा गटही आक्रमक होतोय. परंतु हे होत असताना “उद्योगपती ट्रम्प” हे वेगळीच परंतु घातक अशी चाल खेळताहेत. युक्रेनला वाऱ्यावर सोडत ते पुतीनला मैत्रीचा गाजर दाखवताहेत. असे करताना जुन्या युरोपियन मित्रांची त्यांना फिकीर वाटत नाही. अमेरिकन गॅस मुबलक सापडताच या “व्यापारी” देशाने सौदी अरेबिया या आपल्या जुन्या मित्राची साथ सोडली. आता राष्ट्रप्रमुखच व्यापारी पार्श्वभूमीचा असेल तर दूरगामी आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीपेक्षा अल्पकालीन व्यापारी हितसंबंधांनाच महत्त्व दिले जाणार. चीन, रशिया व इस्राएलच्या नायकांनीही आपल्या येथील “मोठ्या उद्योजकीय समूहां”ना बहुतेक फायदे मिळवून दिले आहेत. ट्रम्प हाच ढाचा वापरताहेत, यात आश्चर्य ते कसले? या चारही ढाच्यांमध्ये एक पारंपरिक साधर्म्य दिसते ते जुन्या युरोपियन “त्रिकोणी रचने”चे. पुरोहित वर्ग, शासक व त्याचे सेनापती आणि मोठे उद्योगपती – हे तिघेही (वर्ण) एकमेकांचे हित सांभाळत रहातात. चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे अध्वर्यू हेच “कम्युनिस्ट पुरोहित” म्हणून वावरतात. कम्युनिझम हाच चीनचा सार्वजनिक धर्म आहे. रशियात पुतीनने पोसलेले “सामंतशाह उद्योगपती” हे धार्मिक प्रक्रियांना धनाधार देतात. रशियन त्रिकोणात शासक व त्याची चौकडी आज तरी शीर्षस्थानी आहे. इस्राएलमध्ये बहुसंख्य असलेले ज्यू धर्मीय हे भौतिक विकासावर व संशोधनावर अधिक भर देतात. त्यांना अल्पसंख्याक असलेल्या अरबांसोबत शांतीपूर्ण साहचर्य हवे आहे. परंतु राजकीय सत्ताकारणासाठी मात्र राजकारणी मंडळी फिलिस्तानी अरबांना त्यांच्या सुयोग्य वाट्याची जमीन देत नाहीत. याबाबतीत मोठा भाऊ असलेल्या अमेरिकेने लोकलाजेस्तव इस्राएलला बऱ्याच वेळा (फक्त) दटावले ! “निधर्मी” होण्याचा कल इस्राएली जनतेत वाढतोय. अमेरिकेतील मध्यम व कनिष्ठ मध्यमवर्गीय जनतेला आर्थिक संपन्नतेची ग्वाही देऊन ट्रम्प निवडून आले तर खरे, परंतु “व्यापारी वृत्ती”मुळे ते येत्या चार वर्षात फारशी आश्वासक कामगिरी करणार नाहीत, असाच सामान्य अंदाज आहे. या चार वर्षांच्या दुसऱ्या कारकिर्दीनंतर ते निवडणूक लढवू शकणार नाहीत. यामुळे “लोक काय म्हणतात” याची त्यांना फारशी फिकीर नाही. असलीच फिकीर तर एक “आंतरराष्ट्रीय क्रांतिकारी मसीहा” होण्याची आहे. भारत-पाकिस्तान युद्धसमाप्तीचं तथाकथित श्रेय ते याच कारणासाठी घेऊ इच्छितात! त्यांना आपल्या वर्चस्वासाठी अमेरिकी व्यापाराचे अस्त्र वापरायचे आहे जे बहुदा बुमरँग होऊ शकते. चीनच्या व अन्य देशांच्या आयातीवर वाढविलेल्या करांमुळे अमेरिकेतील स्थानिक महागाई वाढत चालली आहे. याचमुळे अमेरिकी जनता रस्त्यावर येऊन आता आपल्या अध्यक्षांचा निषेध करु लागली आहे. शी जिनपिंग यांचे सारे राजकीय करियर त्यांच्या वडिलांनंतर कम्युनिस्ट पक्षातच तयार झाले. आर्थिक, सामाजिक व राजकीय हालअपेष्टा सहन केलेले शी यामुळे स्वतःच्या वर्चस्वाबाबत खूपच कडवे बनले आहेत. काही असो, आज या चौघांभोवती जागतिक अस्थिरता फिरते आहे. युक्रेन – रशिया , इस्राएल – इराण, उ. कोरिया – द. कोरिया – जपान, दक्षिण चिनी सागर व भोवतालचे देश, तैवान – चीन – अमेरिका, व्हेनेझुएला – चीन – अमेरिका इ. प्रांतीय व आंतरराष्ट्रीय तणावाचे संबंध हे तिसऱ्या महायुद्धाची संभाव्य संघर्ष – स्थाने बनली आहेत.
दांडग्यांचा आश्वासनांना हरताळ
या चौघांच्या देशांत कष्टकरी व शेतकरी इतरांच्या तुलनेत बरेच दुर्लक्षित राहिले आहेत. इथे स्रियांचा राजकारण व अर्थकारणातील सहभाग हा मर्यादितच दिसून येतो. या चारही नायकांनी आपल्या स्वार्थासाठी छोट्या देशांना दिलेली आश्वासने कधी चलाखीने तर कधी निष्ठूरपणे मोडली आहेत. यांनी आपली शस्त्रास्त्रे छोट्यांच्या लढायांत प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे जोखून घेतली आहेत. चीनची कर्जे घेणारे देश आज पश्चाताप व्यक्त करताहेत. आपण दिलेल्या कर्जांच्या भरपाईपोटी चीन या ऋणको देशांकडून अगदी अवास्तव फायद्यांची व वर्चस्वाची अपेक्षा करतो आहे. युरोपियन युनियन, आफ्रिकी देश, दक्षिण – पूर्वेकडील देश, लॅटिन अमेरिकन देश आज यांच्या दादागिरीकडे फक्त प्रेक्षक म्हणून बघताहेत कारण प्रत्येकाचाच हात दगडाखाली सापडलेला आहे. या चौघांच्या गोंधळाला सामोरे जाताना आमच्या एकूणच मुत्सद्देगिरीच्या परीक्षेचे हे दिवस आहेत. चीन पाकिस्तानच्या आडून आमच्यावर कुरघोडी करतो आहे. पाकिस्तान – व्याप्त काश्मीरमध्ये चीनची गुंतवणूक व हस्तक्षेप वाढत चाललाय. नेपाळ, म्यानमार, श्रीलंका इ. आमच्या शेजारी देशांमध्ये आपला वावर वाढवत चीन आम्हाला घेरण्याचा प्रयत्न करतोय. फक्त स्वतःचा स्वार्थ प्रामुख्याने बघणारे अमेरिका व रशिया हे देश पाकिस्तानशी वेगवेगळ्या कारणांसाठी आपली मैत्री टिकवून आहेत. टर्की (तुर्कस्तान) व अझरबैजान या दोन्ही देशांना गेल्या वर्षी लाखो भारतीय पर्यटकांनी भेटी दिल्या होत्या. टर्की हा युरोप व आशियाला सांस्कृतिकदृष्ट्या जोडणारा एक प्रगतीशील देश आहे जिथे मुस्लीम बहुसंख्याक आहेत. या दोन्ही देशांनी आत्ताच झालेल्या आमच्या संघर्षात दरिद्री अर्थव्यवस्था असलेल्या पाकिस्तानला पाठिंबा व्यक्त केला होता. हे असे का झाले असावे? पाकिस्तानने भारतातील बहुतेक मुस्लीमांच्या बदललेल्या धारणा सांगत या दोन मुस्लीम देशांचा पाठिंबा मागितला असेल का? धार्मिक राष्ट्रवादाच्या उन्मादात आम्ही हे विसरलो की बावीस कोटी भारतीय मुस्लीम इथल्याच मातीत जन्मलेले-वाढलेले आहेत. माहितीच्या अद्ययावत साधनांमुळे स्थानिक घटनांचा वेध सारे जग घेते. जागतिक व्यापारामुळे व भूराजकीय अस्थिरतेमुळे बहुतेक देशांचे एकमेकांवरील विसंबून राहणे वाढले आहे. शहामृगाप्रमाणे मातीत तोंड खुपसून काही झालेच नाही असा आव आता कोणताही देश आणू शकत नाही. एकतर्फी माहिती पुरविणाऱ्या व्हाट्सएपच्या अर्धसत्य संदेशांवर ज्यांचे मेंदू आज पोसले जाताहेत ते परिस्थितीचे गांभीर्य जाणायला असमर्थ आहेत. भारतातील जवळपास बहुतेक मुस्लीम हे कालचे “हिंदू शूद्र” होते जे चातुर्वर्ण्यव्यवस्थेतील जाचाला कंटाळून मुसलमान बनले. (हीच कारणमीमांसा स्वामी विवेकानंदांनीही मांडली आहे.) जगातील वेगवेगळ्या भागांत अस्तित्वात असणाऱ्या युरोपियन वर्णव्यवस्थेत मूलतः तीनच वर्ण असताना अत्यंत निघृणपणे इथे “शूद्र” हा चौथा वर्ण निर्माण केला गेला ज्याने तब्बल ९०% भारतीयांना दास्यत्व चिटकवले. काही कमनशिबी शूद्रांनी धर्म बदलल्याने त्यांचे राष्ट्रीयत्व बदलत नाही, हे वैश्विक सत्य आहे. वर्चस्ववादी जागतिक नायकांच्या गोंधळाला खंबीरपणे सामोरे जाताना व जग भरवशाचे फारसे राहिलेले नसताना आमचे संपूर्ण कुटुंब हे अभेद्य आणि आनंदी असायला हवे ! जागतिक बँक व अमेरिकेने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला सावरण्याचा (व आम्हाला अनाकलनीय असणारा !) प्रयत्न केला आहे. अगदी कालपर्यंत मोठा शत्रू असणाऱ्या पुतीनना आज ट्रम्प चुचकारताहेत. रशिया हा इस्लामिक इराण व व्यापारी अमेरिका दरम्यानचे संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करु इच्छितो आहे. चीन नव्याने मुस्लीम देशांना आपल्या गोटात खेचण्याचा भरकस प्रयत्न करतो आहे. इस्राएलने आपल्या शेजारी असणाऱ्या मुस्लीम देशांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी पॅलेस्टिनी लोकांची बळकावलेली भूमी परत करावी यासाठी अमेरिका त्यावर मोठा दबाव टाकतोय. दिवसागणिक चीन व रशियाची मैत्री वाढते आहे. म्हणजे आम्हाला आमच्याच ताकदीवर बराच भरोसा ठेवावा लागणार आहे. उद्या संभाव्य असणाऱ्या भयंकर अशा तिसऱ्या महायुद्धात आमची भूमिका काय असणार आहे हे आम्ही आज ठरवू शकत नाही परंतू निस्पृह दिसण्यासाठी, सक्षम होण्यासाठी व अजातशत्रू बनण्यासाठी आम्ही आमचे कुटुंब अभेद्य ठेवावयास हवे. आजची अत्यंत गंभीर वैश्विक अस्थिरता आम्हाला जागतिक मुत्सद्देगिरीत “सावध आपुल्या पुढच्या चाली” असाच धडा शिकवून जाते ! उन्मादाने अपघात व उत्पात होऊ शकतो परंतु सावधानतेने व सामंजस्याने निसरड्या जागतिक राजकारणात आम्ही स्वतःला सावरू शकतो. ट्रम्प, पुतीन, नेत्यान्याहू व शी यांच्या स्वकेंद्रित कारवायांनी निर्माण केलेल्या अस्थिरतेने आम्हाला नव्याने जागतिक संबंधांच्या व्यूहात्मक चाली रचण्याची परिस्थिती निर्माण केली आहे हे आजचे मोठे व दृश्य असे सत्य आहे.
हेही वाचा :
पहलगामची घटना इन्सानियतवरील हल्ला : मोदी
अब्दुल्लांनी मोदींसमोर मांडला राज्याच्या दर्जाचा मुद्दा