-
संजीव चांदोरकर
डोनाल्ड ट्रम्प जाहीर करत असलेल्या आर्थिक धोरणांकडे एक व्यक्ती म्हणून न बघता “अमेरिका” देश म्हणून बघितले कि बरेच अर्थ लागतील आधीच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी घेतलेले निर्णय आणि डोनाल्ड ट्रम्प हे घेऊ पाहत असलेले निर्णय यात जणू काही द्वंद्व असल्याचे भासवले जाते. तसे ते नाही. त्यात एक रनिंग थ्रेड आहे. (Donald Trump)
तो थ्रेड आहे बदलत्या संदर्भात अमेरिकेचे आर्थिक / जागतिक हितसंबंध केंद्रस्थानी ठेवणे. जागतिक संदर्भ बदलेले कि अमेरीकेची धोरणे बदलतात.
ऐंशीच्या दशकात याच अमेरिकेने (रिगन राष्ट्राध्यक्ष होते , पण ते अनुषंगिक आहे), तिच्या पुठ्ठ्याखाली असलेल्या जागतिक बँक आणि नाणेनिधीला वापरून विकसनशील देशांना स्ट्रक्चरल ऍडजस्टमेन्ट प्रोग्रॅम च्या नावाखाली नवउदारमतवादी आर्थिक धोरणे अमलात आणण्यासाठी हात पिरगळले.
त्याकाळात सर्व जगभर झालेल्या जन lआंदोलनात जागतिक बँक / नाणेनिधी वर प्रचंड टीका व्हायची ;
गेल्या १५-२० वर्षात जागतिक भांडवलाचा अजेंडा हिरीरीने राबवला जात आहे,
पण जागतिक बँकेचे नाव कोठे आहे ?
कारण ?
कारण मधल्या काळात अमेरिका सहीत इतर विकसित देशातील महाकाय कॉर्पोरेट / औद्योगिक घराण्यांनी ताकद कमावली. अनेक आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार संस्था खाजगी बँका , प्रायव्हेट इक्विटी , व्हेंचर कॅपिटल, हेज फंड , सोव्हेरीन वेल्थ फंड, विमा आणि पेन्शन फंड तगडे झाले, तेच आता अटी घालतात.(Donald Trump)
त्याशिवाय मधल्या ३०-४० वर्षात गरीब / विकसनशील देशात तयार झालेला राज्यकर्ता वर्ग ग्लोबल एलिट क्लब मध्ये सामील झाला. त्याने स्वतःच नवउदारमतवादी आर्थिक तत्वज्ञान आत्मसात केले. हात पिरगाळण्याची गरज उरली नाही
जागतिक बँकेने भूमी नांगरून दिली आणि ती बाजूला झाली.
जागतिक व्यापार संघटना
आता तीच गोष्ट जागतिक व्यापार संघटनेची.
अमेरिकादी विकसित देशांना आपल्या अर्थव्यवस्थेतील वर्षानुवर्षांच्या मंदीवर मात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय आयात निर्यात वेगाने वाढायला हवी होती. अमेरिकेने किंवा एका देशाने दादागिरी करून गरीब राष्ट्रांना सांगण्याचे राजकीय दुषपरिणाम होणार होते
त्याऐवजी एक जणूकाही स्वतंत्र / निष्पक्ष , नियमावर आधारित आंतरराष्टीय व्यापार स्थापित करणे गरजेचे होते. ती नियम वही सभासद राष्ट्रांच्या सहमतीने बनवली आहे हे स्थापित करणे गरजेचे होते. त्यातून डब्ल्यूटीओ स्थापन केली गेली.(Donald Trump)
अमेरिकेची गोची विकसनशील राष्ट्रांनी , विशेषतः चीनने केली. अमेरिकेने बनवलेल्या पीचवर चीनने अमेरिकेच्या गोलंदाजीवर प्रचंड फटकेबाजी केली. त्याला भारतासकट, फक्त ब्रिक्स नाही अगदी इंडोनेशिया , व्हियेतनाम यांनी देखील हातभार लावला. हे असे होऊ शकते याचा अंदाज अमेरिकेला आला नाही. आता वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन अडचणीची ठरू लागली.
आता अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपन्या एवढ्या ताकदवर झाल्या आहेत कि त्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष कोण होणार यावर निर्णायक प्रभाव पाडत आहेत. आता त्या चीनसकट सर्वच राष्ट्रांशी समोरासमोर वाटाघाटी करू शकतात. वेळ पडेल त्यावेळी अमेरिकन नेशन स्टेटचे रिव्हॉलव्हर वाटाघाटींच्या टेबलवर ठेवू शकतात.(Donald Trump)
ट्रम्प चीनला देत असलेली धमकी हि वाटाघाटींच्या टेबलवर निगोटिएटिंग चिप्स म्हणून वापरली जाणार हे नक्की. डोनाल्ड ट्रम्प राजकारणी नंतर , बिझिनेसमन आधी आहेत.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन वर अमेरिकन औषध निर्माण कंपन्याची जबरदस्त पकड होती. त्यांनी त्याचा फायदा करून घेतला. कोविडवरील लस बनवून कोणत्या अमेरिकन कम्पनीने बिलियन्स डॉलर्सचा धंदा केला हे गुगल सांगेल. डब्लूएचओ मधून अमेरिका बाहेर पडल्यावर अमेरिकन औषध कंपन्यांच्या आंतरराष्ट्रीय धंद्यावर काहीही परिणाम होणारा नाही.(Donald Trump)
आंतरराष्ट्रीय क्लायमेट चेंज परिषदेतून अनेक कारणांमुळे कार्बन ट्रेडिंगचे मार्केट उभे राहू शकले नाही. नाहीतर अमेरिकन वित्त भांडवलाने ते व्यासपीठ सहजपणे सोडले नसते. (Donald Trump)
व्यक्ती सिस्टिमला चेहरे पुरवतात; त्या त्या काळातील पोलिटिकल इकॉनॉमी काय आणि त्याचे ड्रायव्हर्स / ढकलशक्ती कोणत्या आहेत हे शोधून काढले कि वरकरणी गुंतागुंतीची प्रकरणे थोडी बहुत कळू लागतात.
(२३ जानेवारी २०२५)
हेही वाचा :
ट्रम्प यांचा अनिवासी भारतीयांना दणका