भुवनेश्वर : पेनल्टी शूटआउटपर्यंत रंगलेल्या प्रो हॉकी लीग स्पर्धेतील सामन्यात रविवारी इंग्लंडने भारतावर २-१ अशा गोलफरकाने मात केली. निर्धारित वेळेत दोन्ही संघांमध्ये २-२ अशी गोलबरोबरी झाली होती. (England)
भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियमवर प्रो-हॉकी लीगचे भारतातील टप्प्याचे सामने खेळवण्यात येत आहेत. शनिवारी प्रो-हॉकी लीगमधील सलामीच्या सामन्यात भारताने इंग्लंडवर ३-२ असा विजय मिळवला होता. रविवारी, याच दोन संघांदरम्यानचा दुसरा सामनाही चुरशीचा झाला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांमध्ये गोलशून्य बरोबरी होती. पहिल्या दोन सत्रांमध्ये दोन्ही संघांना प्रत्येकी एक पेनल्टी कॉर्नर मिळाले होते. तथापि, दोन्ही संघांना गोल करण्यात यश आले नाही. तिसऱ्या सत्रामध्येही भारताला मिळालेला पेनल्टी कॉर्नर वाया गेला. इंग्लंडच्या मॅडी ॲक्सफर्डने मात्र या सत्रात पेनल्टी कॉर्नरवर अचूकपणे गोलजाळ्याचा वेध घेत संघाला १-० ने आघाडी मिळवून दिली. (England)
अखेरच्या सत्रामध्ये भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. या स्ट्रोकवर नवनीत कौरने यशस्वीपणे गोल करून भारताला बरोबरी साधून दिली. त्यानंतर, सामना संपण्यास चार मिनिटे शिल्लक असताना टेसा हॉवर्डने इंग्लंडतर्फे पेनल्टी कॉर्नरवर दुसरा गोल नोंदवला. मात्र, मिनिटभरातच भारताकडून ऋतुजा पिसाळने मैदानी गोल करून २-२ अशी बरोबरी साधली. ऋतुजाचा हा आंतरराष्ट्रीय हॉकीमधील पदार्पणाचा सामना होता. ही बरोबरी अखेरपर्यंत कायम राहिल्याने निकालासाठी पेनल्टी शूटआउटचा अवलंब करण्यात आला. (England)
पेनल्टी शूटआउटमधील पहिल्याच स्ट्रोकवर नवनीत कौरने गोल केला. तथापि त्यानंतर, सलीमा टेटे, सुनीता टोप्पो, लालरेमसियामी आणि नेहा या भारताच्या चौघींनाही गोल करण्यात अपयश आले. दुसरीकडे, इंग्लंडतर्फे टेसा हॉवार्ड, डार्सी बॉर्न, सोफी हॅमिल्टन, फिओना क्रॅकल्स या चौघींच्या संधी वाया गेल्या. अखेरच्या प्रयत्नात लिली वॉकरला गोल करण्यात यश आले. पहिल्या शूटआउटअखेरही १-१ अशी बरोबरी राहिल्याने ‘सडन-डेथ’चा अवलंब करण्यात आला. त्यामध्ये, पहिल्या संधीमध्ये भारताकडून नवनीत कौर व इंग्लंडकडून टेसा हॉवार्ड या दोघीही गोल करू शकल्या नाहीत. दुसऱ्या प्रयत्नात, भारताच्या लालरेमसियामीला गोल करण्यात अपयश आले. मात्र, त्याचवेळी सोफी हॅमिल्टनने गोल करून इंग्लंडला २-१ असा विजय मिळवून दिला. दरम्यान, शनिवारी रात्री उशीरा झालेल्या पुरुष गटातील सामन्यात स्पेनने भारताचा ३-१ असा पराभव केला.
हेही वाचा :