मुंबई : प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील ‘ठाणे की रिक्षा’ या गाण्याने वादग्रस्त ठरलेल्या स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने विधीमंडळाच्या विशेषाधिकार समितीसमोर साक्ष नोंदवली. आपण कोणतीही चूक केली नसल्याचे ठामपणे सांगत हे गाणे आपल्या व्यावसायिक क्षेत्राचा भाग असून त्यातून व्यंग मांडण्यात आल्याची साक्ष कामरांनी नोंदवली. (Kunal Kamra testifies before the Committee of Privileges)
विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांच्यासमोर गुरुवारी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान मराठीतून मांडलेले मुद्दे कळावेत यासाठी कुणाल कामराने भाषांतरकारही आणला होता. विशेषाधिकारी समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आपण कोणतीही चूक केलेली नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. यावेळी कामराला बिनशर्त माफी मागण्यास सांगितले असता त्याने आपल्या वकिलामार्फत उत्तर देणार असल्याचे सांगितले. (Kunal Kamra testifies before the Committee of Privileges)
सुनावणीबाबत बोलताना प्रसाद लाड म्हणाले, सुनावणीदरम्यान ते पूर्णपणे नम्र होते. मराठीत विचारलेल्या प्रश्नांचे अचूक आकलन होण्यासाठी त्यांनी भाषांतरकाराची मदत घेतली. आता समिती सादर केलेल्या कागदपत्रांचा आढावा घेऊन कामरा यांचे कृत्य विशेषाधिकार भंगात मोडते की व्यावसायिक व्यंगात्मक अभिव्यक्तीचा भाग आहे यावर अंतिम निर्णय घेणार असल्याचे प्रसाद लाड यांनी सांगितले. (Kunal Kamra testifies before the Committee of Privileges)
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात हक्कभंग प्रकरणाची सुनावणी आठवडाभर होणार आहे. त्या आजारी असून त्यांच्या सुनावणीची तारीख नंतर ठरवली जाणार असल्याचे प्रसाद लाड यांनी सांगितले.